मला सूर्यास्ताकडे पहात बसण्याच जेवढं कुतूहल आहे तेवढंच कुतूहल सूर्योदय पाहत बसण्याच पण आहे. पण असा सूर्योदय शहरात रोज पाहणं तेवढं काही नशिबात नाही.
सूर्योदयापूर्वीचा १-१:३० तासापूर्वीची वेळ हा ब्रम्हमुहुर्त पकडला जातो. साधारण पहाटे २-६ च्या दरम्यानची वेळ ढोबळपणे म्हटली जाऊ शकते. या वेळी उठून साधना, ध्यान, नामस्मरण करण्याचं विशेष महत्त्व सांगितलं जातं आणि त्याची कारणं पण तशीच आहेत. ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी पाहतो असे पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या गृहस्थाश्रमात ही गोष्ट कटाक्षाने पाळत, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो.
सांगण्याचा मुद्दा असा की आज सकाळचा ब्रम्हमुहुर्त फार विशेष होता. सकाळी या वेळेत बऱ्याचदा उठलो आहे आणि साधना करण्याचा प्रयत्न पण केला आहे पण ते घराच्या ४ भिंतींच्या आत.
सकाळी ५:१५-५:३० ची वेळ. सकाळी ताजातवाना होऊन आज पहिल्यांदाच या ४ भिंतींच्या पलीकडे हिमालयीन पर्वतरांगांकडे डोळे लावून बसलो होतो. त्याच्या आगमनाची चाहूल लागली असल्याने लगबगीने झोपेतून जागा होणारा निसर्ग अनुभवणं म्हणजे एक पर्वणी होती. हिमालयाला आणि त्या डोंगर दऱ्यांना जेंव्हा जाग येते आणिआळोखे पिळोखे देऊन जेंव्हा ते उठू लागतात, तेंव्हा, वाहणाऱ्या मंद वाऱ्याने सळसळणाऱ्या पानांद्वारे ते एकमेकांशी हितगुज साधतात. पक्षी किलबिलाट करत उंच आकाशात झेप घेतात, त्या उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य वाहून, परत झाडा झुडपात मुसंडी मारतात. वासरांचा हंबरडा ऐकू येत होता. त्यांना भूक लागली असावी. सुरवंटाची झालेली फुलपाखरे उडण्याच्या प्रक्रियेला अजूनही रुळली नव्हती. वाऱ्यावर हेलकावे खात ते नुकत्याच उमललेल्या कळीच्या फुलाचा वेध घेत त्या दिशेने कूच करण्याचा गमितिशीर प्रयत्न करत होते. कळ्यांची झालेली फुलं आपल्या खुललेल्या सौंदर्यामुळे लाजत मुरडत होती. रात्रभर ऊसाटून दमलेली कुत्री आता पेंगली होती. पण तरी दऱ्या खोऱ्यातून येणारा त्यांच्याच भूंकण्याच्या प्रतिध्वनीमुळे गांगरून गेली होती. अशा कित्येक हालचाली त्याच्या एकत्रपणे चालल्या होत्या. तो बोलत होता आणि मी ऐकण्याचा प्रयत्न करत होतो.
ध्यान लावण्यासाठी डोळे बंद करून, हाताची कोणतीतरी मुद्रा करून सुखासनात किंवा पद्मासनात बसावचं लागत हा गैरसमज आहे. ध्यान ही मनाची एक अवस्था आहे शरीराची नाही. ते उघड्या डोळ्यांनी पण करता येतं. फक्त त्या उघड्या डोळ्यांनी पण तुम्हाला त्या परमेश्वराला जिकडे तिकडे बघता आलं पाहिजे, मुखी त्याचं नाव घेता आलं पाहिजे. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेला आणि तथाकथित सर्वच गुरूंनी मान्य केलेला सर्वश्रेष्ठ योग किंवा त्याला आळवणी घालण्याचा मार्ग म्हणजे भक्तीयोग. या भक्तीयोगात श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ होऊन त्याच्या साकार रुपावर मन स्थिर करण्यास सांगतात.
टीहरीला येण्यापूर्वी माझा परत एकदा भगवद्गीते मधला भक्तीयोग वाचून पूर्ण झालेला. त्याच्याकडे पोहोचण्याचा मार्ग हा तितकासा सोप्पा नाही. टीहरी नावातदेखील हरी आहे. देहरादून ते टीहरी पर्यंतच्या घाटाच्या प्रवासात आतून बाहेरून पार घुसळून निघालो होतो.
तिथे पोहचलो तेंव्हा कोणीतरी सांगितलं की समोरच्या हिमालयाच्या पर्वतरांगांत बद्रिनाथाच दर्शन होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे २:३० वाजल्यापासून डोळे सताड उघडे होते. ४:०० वाजता पांघरूण बाजूला सारून ताडकन उठलो, आवरून शुचिर्भूत होऊन बाहेर पाऊल टाकलं. एकीकडे फोनवर मंद आवाजात भूपाळी वाजत होती. बद्रीनाथाच दर्शन झालं खरं पण डोंगराआड मिणमिणत्या दिव्यात नाही तर चराचरात दिसणाऱ्या चैतन्य स्वरूपात. "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल..." अशी काहीशी अवस्था. मन मंत्रमुग्ध होऊन मधुराष्टकम् ऐकत होतं... तर कधी अखंड विठ्ठल विठ्ठल गुणगुणत होतं...
काही फोटो आणि व्हिडिओ इथे खाली देत आहे. व्हिडिओवर आणि फोटोवर क्लिक करून ते पाहता येतील.
Nayanesh
The way you write is absolutely amazing....how do you get time to do this...but really likes your posts...and images are amazing.
If you permit can i share the post and images excluding the last of your family in my groups.
Shekhar Kulkarni
Pune