२१ वेळा क्षत्रियांचा निःपात करून नंतर कश्यपांना भारत भूमी दान दिली आणि आपण दान दिलेल्या भूमीचा लाभ घेऊ नये म्हणून परशुरामांनी निर्माण केलेली ही कोकणची पवित्र तपोभूमी. तिच्या स्वच्छ निर्मळ वाळूवर 'त्याच्या' लाटा उसळत तिच्याशी लडिवाळपणे खेळत राहतात.
अलीकडे त्याला तशी निर्जन किनाऱ्याची सवय होतीच. स्वयंभू गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येणारे भावूक भक्तगण तर कधी पर्यटनासाठी आलेले पर्यटक कितीतरी वेळ तिथे रेंगाळतात, त्याच्या लाटांमध्ये डुबकी मारतात, समद्रस्नान करतात आणि त्याच्यात लुप्त होणाऱ्या मावळत्या सूर्याचे विलोभनीय दर्शन घेउन परत जातात, तेंव्हा ते आकाश गोकुळात रंगपंचमीने रंगात न्हाऊन राधा जशी अखेरीस त्या श्याम रंगात बुडून जाते तसे भासते. त्या राधेचा आरसा बनून ते हलतं डुलतं प्रतिबिंब मिरवत तो सूर्यास्तानंतर एकटाच आपल्या लाटांचा मंद आवाज करत शांत पडून असतो. त्याच्यावर तरंगणाऱ्या होड्यांना पाळण्याला द्यावा तसा हलकेच झोके देत राहतो.
आजची रात्र मात्र त्याच्या जवळ आलेल्या कोणासाठी तरी विशेष होती. मिट्ट काळोखात सुद्धा कोणत्याही भयाला न जुमानता तो साधक त्याच्या काठावर ठाम उभा होता. त्या उबदार पाण्यामध्ये हलकेच पाय ओले करून, लाटांच कर्णमधुर संगीत तो ऐकत होता. तो मनाशी काहीतरी ठरवून आला होता. ही भेट अनपेक्षित होती पण त्याच्या मनातली ही खूप सुप्त ईच्छा होती. आज ती अशी अचानक पूर्ण होईल असा विचार सुद्धा त्याच्या मनात आला नव्हता.
त्या पहाटेच्या काळोखातच त्याने समुद्र स्नान उरकून घेतले. मग बाहेर येऊन ओल्या आणि कठीण झालेल्या वाळूवर आसन हंतरले. समुद्राकडे एक कटाक्ष टाकत तो आसनावर सुखासनात शांत बसला. डोळे अर्धे मिटलेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून त्याने गुरुवर्यांना वंदन केले आणि जप चालू झाला - "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"....
हा सगळा कल्पनाविलास बरं!
गणपतीपुळेला बहुधा एमटीडीसीच रिसॉर्टच एक असं आहे ज्याला स्वतःचा स्वतंत्र भला मोठ्ठा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे तिथे रात्रीच्या वेळी चिटपाखरू सुद्धा नव्हतं. मला मिळालेली बांबू कॉटेज एका माणसासाठी पुरेशी होईल इतकीच होती. जवळपास १५ तासांच्या प्रवासानंतर थकून भागून आल्यानंतर डाळ खिचडी, लोणचं, दही खाऊन मी लाटांचा आवाज ऐकत शांत बसलो होतो आणि विचार करत होतो. की का हा सगळा प्रवास? का भटकतो आहे आपण? घडून येणाऱ्या प्रवासाबद्दल समाधान वाटत असलं तरी. एक प्रश्न सारखा भेडसावत होता ही त्या कृष्णाची माया म्हणावी का?
आपल्या डोक्यावर त्याचा हात आहे असा उगाच खुळा समज करून आपण कोणी आहोत असा विचार मनाला शिवता सुद्धा कामा नये. ही प्रकृती त्याच्या अधीन आहे त्यामुळे एकंदर या सृष्टीत घडणारी प्रत्येक घटनाच त्याच्या संकल्पाने घडत असते. असे असताना आपण या सृष्टीतले एक क्षुल्लक जीव आहोत. आपलं अस्तित्व या अथांग सागरापुढे किती नगण्य आहे. श्रीपाद प्रभू म्हणतात मी निर्गुण निराकार आहे. आपल्याला परब्रह्म समजावा म्हणून ही सर्व अवतारकार्य. दत्त माहात्म्य वाचताना पण जेंव्हा दत्तप्रभू आणि परशुराम यांचा संवाद सप्तर्षी ऐकतात तेंव्हा ते देखील हेच म्हणतात. "काय ही लीला! उपदेश करणारे पण आपण आणि ऐकणारे पण आपणच!"
गणपतीपुळेचा स्वयंभू गणपती हा सुद्धा जेंव्हा प्रकटला तेंव्हा त्याने दृष्टांत देताना हेच म्हंटल की ज्या टेकडीच्या पायथ्याशी तो प्रकटला ती टेकडी त्याचं निर्गुण निराकार रूप आहे. म्हणजे कदाचित त्याला म्हणायचं असावं की जशी ही टेकडी पाना फुलांनी, झाडांनी बहरलेली आहे, त्यावरील प्रत्येक जीव, पाखरं, पक्षी, दगड, या सर्व चराचरात व्यापलेल चैतन्य मीच आहे. या संपूर्ण सृष्टीच ही टेकडी एक छोटंसं प्रतीक आहे. पण हे सगळे माझे तर्क! कारण एक विश्वव्यापक शक्ती एखादी गोष्ट आपल्याला सांगते तेंव्हा त्यात दडलेले अर्थ हे सरळ सोपे कसे असतील?
भगवद्गीता सांगताना सुद्धा श्रीकृष्ण हेच म्हणतो मी सगळ्यात असूनही मी कशातच नाही. म्हणजे या चराचरात व्यापलेल्या तो या सगळ्या भौतिक पसाऱ्याबाबत मात्र अनासक्त आहे, अलिप्त आहे. भक्तीने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला की द्वैता कडून अद्वैताकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग कळू शकतो. किमान माझी तरी या शब्दांचा अर्थ उकलून घेण्यात गेली काही वर्ष गेली पण अजूनही पूर्ण कळलं आहे असं म्हणू शकतं नाही.
असो, सकाळी ७ वाजता मी राहत असलेल्या कॉटेज समोरून वाळूतून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने चालण्यास सुरूवात केली. गणपतीपुळे मंदिर अगदी समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे अर्धा किमी अंतर तसचं अनवाणी चालत चालत मी मंदिरात पोहचलो. तो दिवस हरताळकेचा होता. बाप्पाला हात जोडून नमस्कार केला, प्रार्थना केली आणि गुरुजींना अभिषेक करता येईल का म्हणून विचारलं. त्यांनी लगेच सोवळ नेसून मला बसायला सांगितलं. अभिषेक अगदी छान पार पडला. तेथील सगळ्यात वयस्कर गुरुजी म्हणाले - "आजचा तुमचा अभिषेक पहिलाच. फार छान पार पडला. कसलीही घाई नाही काही नाही!". मी फक्त स्मित हास्य करून उठलो. परत तेच प्रश्न मनात. हे असे खेळ का खेळावेत मनाशी. आपण कोणी नाही, जो कोणी आहे तूच आहेस - तत्त्वमसी!
तिथून बाहेर पडलो. त्या निर्गुण निराकार रुपातल्या बाप्पाला प्रदक्षिणा घातली. परत निघताना दुपारी महाप्रसाद आहे म्हणून कळलं. महाप्रसाद जेऊन मग रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल गाठायच ठरलं. त्याप्रमाणे जेऊन दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचलो. गाडी लावली आणि स्वाती ताईला फोन केला. तिने सिनकर काकांना बाजूच्या टीबी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. मी ऐकून एक क्षण तसाच थांबलो. मग विचारत विचारत काकांपाशी पोहचलो. आता त्यांना पाहून अजून धक्का बसला. जेमे तेमे २५ किलोची त्यांची शरीरयष्टी म्हणजे हाडांना झाकण्यापूर्ती कातडी अंगावर पांघरावी तशी त्यांची अवस्था बघवत नव्हती. या अवस्थेतही त्यांना स्वामींना सोडून मठातून जायचं नव्हतं. त्यांना हॉस्पिटललाजाण्याबद्दल विचारले असता त्यांची तयारी होत नव्हती. फोनवर बोलताना कितीवेळा ते म्हणत - "माझं काय व्हायचं ते स्वामी बघून घेतील."
हॉस्पिटल मध्ये त्यांचे दोन बंधू, स्वाती ताई आणि दाभोळे मठाची जागा आजही ज्यांच्या मालकीची आहे ते वल्लभ पानवलकर असे तिथे सोबत उपस्थित होते. मला समोर उभे करून स्वाती ताईने प्रश्न विचारला - " ओळखलं का?". समाधानाने त्यांच्या सुरुकुतलेल्या चेहऱ्यावरच्या रेषा स्मित हास्यात बदलल्या. अतिशय मंद, चिरक्या आवाजात त्यांनी प्रश्नार्थक नजरेने शब्द उच्चारला "आकांक्षा?". "ती माहेरी आहे." एवढंच म्हणून मी शांत झालो. तिथल्या उपस्थित बाकी चौघांशी सिनकर काकांविषयी संवाद साधला. नंतर तिथल्या नर्सशी रिपोर्ट्स संबंधात विचारपूस केली तेंव्हा त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये टीबी असल्याचं निश्चित झाल्याचं कळलं.
४ वाजेपर्यंत तिथे बसून होतो. त्यांचे एक बंधू नंदू काका तिथे रात्री थांबणार होते. त्यातही सिनकर काका स्वाती ताईला म्हणाले "यांना मठात घेऊन जा!" स्वाती ताईला सोडायला मी दाभोळे जायचं ठरवलं. निघता निघता त्यांना म्हणालो - "काळजी घ्या आणि बाकीच्यांना तुमची काळजी घेऊ द्या. तुम्ही बरं होण्यासाठी तुमचं सहकार्य आवश्यक आहे." तेंव्हा पुन्हा एकदा समाधानाने त्यांनी मंद स्मितहास्य केलं.
मठात पोहचलो तेंव्हा सिनकर काकांशिवाय ओस पडलेल्या त्या मठात पाय ठेवताना मनात कितीतरी प्रश्न पडले होते. का आणलं होतं स्वामींनी आम्हाला इथे? पुढे काय आहे स्वामींच्या मनात? दत्त महाराजांच्या पादुकांवर आणि स्वामींच्या पादुकांवर डोकं ठेवलं. औदुंबराला प्रदक्षिणा घातली. गावातल्या एका ताईंनी तिथे चहा दिला. थोडा वेळ बसलो होतो. स्वाती ताई सांगत होती - "गणपती निमित्त तुम्ही येणार म्हणून भाऊंनी झाडलोट करून घेतली होती. सगळ्या गावाला सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून." मी आवंढा गिळला. जड अंतःकरणाने तिथून परत गणपतीपुळे जण्यासाठी निघाव म्हणून गाडीपाशी आलो. तेंव्हा गावातल्या लोकांनी मला गराडा घातला. सिनकर काकांची चौकशी केली. सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्नचिन्ह होतं, आतापर्यंत एवढ्या लोकांना ज्यांनी धावपळ करून ॲम्ब्युलन्स मधून योग्य वेळी हॉस्पिटल मध्ये पोहचवून त्यांचे प्राण वाचवले होते ते सिनकर काका आता स्वतःच ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटल मध्ये दाखल झाले होते. "येतील ना ते परत?". "हो!" म्हणून मी तिथून निघालो. परत भरदाव वेगाने गाडी गणपतीपुळेकडे निघाली.
रात्री उशिरापर्यंत त्या मिट्ट काळोखात किनाऱ्यावर वाळूवर चांदण्यांकडे पहात पडून होतो. धुकं दाटलं होतं. एमटीडीसी रिसॉर्टचे दिवे लांब कुठेतरी धुक्यात मंद होऊन हरवून गेले होते. डोक्यावर विजा कडाडल्या. आकाशाकडे डोळे लावून बसलो असताना तो प्रकाश म्हणजे काळोखात तोंडावर फ्लॅश मारून फोटो काढावा तसा काहीसा भासत होता. डोळे मिटत होते. लाटांच संगीत वाजतच होतं...
श्रीकृष्णार्पणमस्तु
تعليقات