किर्र अंधार. घनदाट अरण्य. मधूनच वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सळसळणारी पानं. रातकिड्यांचा आवाज. आकाशात अष्टमीच्या चंद्राची प्रभा फाकली होती. त्या आकाशात पलीकडे मार्गशीर्ष महिन्यातला मृग विस्तीर्ण पसरलेला. तर त्या घनदाट अरण्यात कस्तुरी मृग कस्तुरीचा वासाने कावरा बावरा झालेला. दिवसभर त्या कस्तुरीचा मागोवा घेत थकून कुठे विसावलेला. त्यात त्या रात्रीला खुलवणारी रात्रीची राणी सुगंध वाटतं होती. मध्येच लुकलुकणारे मंद काजवे एकत्र कळपाने दिसत होते. तेवढाच काय तो प्रकाश. पण त्या घनदाट अरण्यात झाडांनी चंद्राच्या प्रकाशाला झाकून टाकले असल्यामुळे त्या काजाव्यांसारखं तेज त्या क्षणाला तरी अन्य कोणाकडे असणं शक्यच नव्हतं.
जसं एक एक पाऊल पुढे पडत होत, तसं त्या सुकलेल्या पालापाचोळ्याचा कच कच आवाज होत होता आणि त्या मागोमाग वाजत होत ते पैजण. छुम छुम छुम! कधीही न संपणारी भयाण रात्र होती खर तर ती. तिचा शेवट कधी आणि कसा आहे हे कोणी सांगू शकेल असं वाटतं नव्हत. कधी सुरू झाली तेही आठवत नाही. पण स्मृती आहे तेंव्हापासून फक्त आणि फक्त हा अंधारच आठवतो. जणू काही त्या न संपणाऱ्या रात्रीचा चकवा लागला होता.
कधी त्या रात्रीच्या अंधारात कोणाशी भेट होई पण ती सुद्धा तात्पुरती. ते काजव्यांचा मागोवा घेत त्यांच्या प्रकाशाची मदत घेऊन पुढे पुढे अंतर कापत राहत. "नक्की कुठे जायचं आहे?" विचारलं तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं. "तिथे पोहचला की पुढे काय?" याच उत्तर सुद्धा कोणी खात्रीने देऊ शकल नव्हत. सगळीच संभ्रमित अवस्था. बरं ते काजवे थोड्या वेळा पुरतीचे वाटाडे. कालांतराने त्यांचं तेज पण त्या अंधारात विरून जाई. जणू काही जशी ज्याची वेळ येईल तसं तो अंधार प्रत्येकाला गिळंकृत करत होता. पण आता सगळ्यांना त्याची सवय झाली असावी. काही जण त्याला आता अंधारात एकरूप होऊन अंधारापसून मुक्त होऊ म्हणून हसत हसत सामोरे जात तर कोणी आपण हे काजवे असतो तर किती बरं झालं असतं म्हणून खंत करत त्या काजव्यांचा मागोवा घेत खाली न बघताच चालत राहत. कधी कधी त्या कजव्यांच्या नादात दगडावर पाय आपटून चांगलीच ठेच लागत असे. डोळ्यासमोर चमकेलेल्या काजव्यांतून सावरे पर्यंत चाल मंदावली की, तोपर्यंत काजवे दूर निघून गेलेले असतं. परत तो भयाण अंधार, ठेच खाऊन जखमा झालेलं शरीर आणि पुन्हा काजव्यांचा मागोवा घेत पुढचा प्रवास चालूच राहतं होता. कधी कधी या धडपडत जाणाऱ्या लोकांकडे बघून वाटायचं की अंधारात कसल्या मृगजळाच्या मागे धावतात हे!
परत प्रश्न! "पण आपलं काय? आपल्याला कुठे जायचंय? ते काही नाही. आज मला उत्तर हवंय. कोण देणार ? माहिती नाही. कसं? माहिती नाही." डोळे मिटले. वर वर बघता फार काही फरक पडलाच नाही. बाहेरच्या अंधारापासून स्वतःला अलिप्त करून अंतरीच्या अंधारात लुप्त झाले. आता नाक आणि कान माझी ईच्छा असो वा नसो त्यांचं कार्य करतच होते. आता रातराणीचा सुगंध अजून प्रकर्षाने जाणवत होता. तो आधीही होता फक्त मी लक्ष देत नव्हते. मंद वारा अंगाला स्पर्श करून जाताना सुखावत होता. आता प्रसन्न वाटत होतं. अंधार कशाला म्हणतात या गोष्टीची जाणीवच राहिली नव्हती. पण अंतरीची ओढ खुणावत होती. कोणीतरी साद घालतंय सांगत होती. इतक्यात कानावर मधुर स्वर उमटले. त्या किर्र अंधारात आज रातकिडे, पान, काजवे यांच्या पलीकडे पहिल्यांदाच हा स्वर कानी पडला होता. कसला आहे ? आधी कधी नाही ऐकला. काय करावं ? शोधावं का या मधुर स्वराचा उगम. जीव कासावीस होऊ लागला. मन बावरल. ताडकन उठून उभी राहिले. पण डोळे उघडायची ईच्छा होत नव्हती. त्या बाहेरच्या अंधाराकडे परत पहायचं नव्हत. अंतरीचा दिवा प्रज्वलित झाला होता. तोच काय तो मार्ग दाखवेल याची खात्री झाली होती. आता ते मधुर स्वर अजून आर्ततेने जवळ बोलवत आहेत याची खात्री वाटू लागली. व्याकुळता वाढत चालली होती. डोळे बंद होते पाय पुढे पडत होते. ठेच लागण्याची भीती पळून गेली होती. हे स्वर ज्याचे आहेत तो आपली काळजी घेईल असं मनाशी पक्कं करून प्रत्येक पाऊल पडत होत. आता आत्मविश्वास वाढू लागला, तशी पावलं झपाझप पडू लागली. आता वेगळाच संशय येऊ लागला. फक्त आपण त्या स्वरांकडे चालत नाही आहोत तर ते स्वर त्याहून जलद गतीने आपल्या जवळ येत आहेत. पण कधी वाटत होत, "छे! ते कसं शक्य आहे! आपण स्वरांचा मागोवा घेऊ शकतो पण त्याला आपल्याबद्दल कसं कळणार? जाऊदे आपण चालत राहू."
आता ते स्वर अतिशय तीव्र झाले. जणू माझ्या समोरच आता ते उमटत होते. डोळे बंद होते पण त्या बंद डोळ्यांच्या पलीकडे आता अंधार नाही याची जाणीव होत होती. डोळे उघडू की नको अशी अजूनही संभ्रमित अवस्था. कारण तेज काय असतं ते कधी अनुभवलच नव्हतं. स्वर थांबले. रातराणीला लाजवेल असा सुगंध दरवळत होता. दोन्ही खांद्यावर कोणीतरी मऊ मखमली हातांनी स्पर्श केला. अंगात रोमांच उठत होते. सळसळत होते. अजूनही डोळे उघडण्याची परवानगी मिळाली नाही असं वाटतं होतं.
त्या एका हातात काहीतरी वस्तू होती. लाकडी असावी. पातळ काठीसारखी. समोरचा प्रकाश मंद झाला. सुगंध कमी झाला. खांद्यावरचा ती स्पर्श पण नाहीसा झाला. त्याच्या हातातली ती काठी पटकन पायाजवळ पडण्याचा आवाज झाला तेंव्हा ती खूप हलकी असावी म्हणून जाणवत होतं. हळूच किलकिल्या डोळ्यांनी समोर पाहण्याचा प्रयत्न करत डोळे उघडू लागले. विश्वास बसत नव्हता. अंधार नाहीसा झाला होता. समोर विशाल जलाशय, त्यावर पौर्णिमेच सुंदर चांदणं पडल होत. त्याचं निखळ सौंदर्य पाण्यावर प्रतिबिंबात पण एवढं उठून दिसत होत की त्याच्या शीतल प्रकाशने आणि त्या तेजाने ती निशा लाजली होती. अंधाराला आवरत घेऊन ती पांगली होती. पायाजवळ लक्ष गेलं. ती काठीसदृष्य दुसरं तिसरं काही नाही तर बासरी होती! तो बासरी वाजविणारा अजून कोणी नाही तर मुकुंद होता!
मी ती बासरी हातात घेऊन तिथेच बसले. आजू बाजूला नजर फिरवली पण कोणीच दिसेना. त्या चंद्राला, त्या पाण्याला, आजूबाजूच्या झाडांना आणि त्यावर निजणाऱ्या पक्षांना पाहून विचारलं - हा मुकुंद कोणी पाहिला ? हा मुकुंद कोणी पाहिला?
Comments