साधारण एक ३ आठवड्यांपूर्वी आकांक्षा आणि अयांश देहराडून जाण्यासाठी निघाले तेंव्हा मी त्यांना निरोप द्यायला म्हणून एअरपोर्टवर गेलो होतो. त्यांची फ्लाईटची वेळ झाली तशी ते पुढे निघाले आणि मी परत घरी येण्यास निघालो. जेमे तेमे २ पाऊल पुढे आलो असेन आणि विचारांच काहूर माजलं. काय क्षण असेल तो जेंव्हा आपल्या हसत्या खेळत्या परिवाराचा निरोप घेऊन माणसं पुढच्या प्रवासाला निघतात. कायमची!
खरं तर आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो पण तरीही ही येण्याजाण्याची प्रक्रिया किती जटिल आहे!
वेळ पुढे सरकत होता. मधल्या काळात आकांक्षाला तिचा मुक्काम ३ आठवड्यांसाठी वाढवावा लागला. मी कामात व्यस्त होतोच पण तरी स्वामी सोबत असल्यामुळे जेवढा वेळ घरी होतो तो सुद्धा शक्य तितका सदुपयोगी लावावा अशी त्यांची ईच्छा असावी.
दिनक्रम ४:३०-५:०० वाजता सुरू होऊ लागला. आधी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आणि मग श्री दत्त माहात्म्य त्यांनी वाचून घेतलं. अजूनही हे ग्रंथ पूर्ण कळत नाहीत पण त्यातल्या बोधप्रद कथा आणि त्यांचं कथासार कितीही वेळा वाचलं तरी मन तृप्त होतं नाही.
श्री समर्थ रामदास स्वामी दासबोध सांगताना म्हणतात
आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका । येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥
या वचनानुसार आपण एकटे आलो तरी आपल्याला प्रपंच करणं आणि तो करता करता परमार्थ करणं भाग आहे. पांडुरंगाचे कितीतरी निस्सीम भक्त असेच प्रपंचाच रहाटगाडगे ओढत पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले.
हा वरील एवढा भाग मी ३० ऑगस्ट, २०२२ रोजी रात्री १ वाजता झोपेतून उठलो आणि लिहून परत झोपी गेलो.
६ ऑगस्ट रोजी आकांक्षा आणि अयांशला सोडून एअरपोर्टहून ड्राईव्ह करत घराकडे येत होतो. एकीकडे YouTube Music वर गाणी वाजत होती. "तुज मागतो मी आता..." लता दीदींच्या सुरेल आवाजात सुरू झालं. लहानपणापासून कित्येकदा ऐकलं आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवात तर जास्तच. पण त्यावेळी ऐकताना जे जाणवलं ते फार वेगळं होतं.
देवाकडे काय मागावे? या प्रश्नाचे प्रत्येक जण प्रत्येकाच्या मनात नक्कीच वेगळे असले तरी देवाकडे कायम मागतच रहायचे का? देव हा देण्यासाठी असतो असा काहीसा समज बऱ्याच लोकांच्या मनात असतो. पण असो, मला मुळात कोणावर इथे टीका करायची नाही.
ध्रुव बाळाची गोष्ट खूप लहानपणी शालेय अभ्यासक्रमात वाचली होती. मध्ये कधीतरी भागवत पुराण वाचताना त्याच गोष्टीचं सविस्तर वाचन झालं. आपल्या सावत्र आईच्या जाचाला कंटाळून अढळ पद मिळवण्याच्या इच्छेने ध्रुव बाळ भगवंतांची आराधना करतो. त्याच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंत त्याच्या समोर प्रकट होतात. ध्रुव बाळास फक्त स्पर्शाने आत्मसाक्षात्कार घडवून आणतात. त्याला ब्रम्ह म्हणजे काय याचं सविस्तर ज्ञान त्या बालवयात होतं. ज्या भगवंताकडे आपण मोक्ष मागू शकतो त्याला प्रसन्न करून आपण एक अढळ पद मिळाव अशा क्षुल्लक भौतिक गोष्टीची मनोकामना ठेवली याच त्याला अत्यंत वाईट वाटतं. पण त्या मनकवड्या भगवंताने ध्रुव बाळाच्या मनातील ईच्छा जाणून त्याला आधीच त्याला ब्रम्हलोकाहूनही उच्च अशा अढळ पदाची ईच्छा पुर्ण केलेली असते. कारण साक्षात भगवंताची तशी ईच्छा असते. भविष्यातील अनेक गोष्टी त्यावर अवलंबून असतात.
"तुज मागतो मी आता...." ऐकता ऐकता "तुलाच मागतो मी आता" हाच खरा अर्थ अभिप्रेत असावा असं अगदी माझ्या मनात पक्क बसलं. मग आठवलं ते शंकरलीला. आठवलं ते शंकर महाराज, त्यांचे भक्त प्रधान आणि डॉ. धनेश्वर या गुरू शिष्यातील प्रेम. महाराज ऐश्वर्य, वैभव द्यायला तयार असतानाही त्यांनी मागितलं ते फक्त महाराजांना. त्यांचं अखंड सानिध्य लाभलं की अजून कशाची आवश्यकता ती काय?
एका मागोमाग एक गाणी वाजत होती. त्या मागोमाग सुरू झाला तो हा अभंग, "याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा क्षण गोड व्हावा...". पंडित भीमसेन जोशींच्या आवाजातला तो अभंग सरळ हृदयाला जाऊन भिडला. हे सगळं काही संकेत देत होते. फक्त मला कळत नव्हते.
श्रावण सुरू झाला तेंव्हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण करायला घेतलं आणि ते पूर्ण झाल्यावर परत ठेवताना हातात श्री दत्त माहात्म्य आलं. दत्तप्रभुंची ईच्छा म्हणून ते सुद्धा वाचण्यास घेतलं. वाचताना कधी कधी तीव्र स्पंदन जाणवतं तर कधी कधी मन भरून येई. पिठोरी अमावस्येच्या दिवशी श्री दत्त माहात्म्य पूर्ण झालं.
दुसऱ्या दिवशी पहाटे गणपतीच्या निमित्ताने कोकणातील दाभोळे मठात जाऊन यावं अशी ईच्छा होती आणि तिथून पुढे पुण्याला जाऊन यावं असं मनात होतं. जाण्याआधी एवढं श्री दत्त माहात्म्य पूर्ण करूनच निघ असं महाराज सांगत असावे अस सारखं वाटतं होतं.
पण एकंदर मुसळधार पाऊस बघता कितपत प्रवास शक्य होईल याची थोडी शंकाच होती. बँगलोर ते दाभोळे हे अंतर साधारण ८५० किमी असून कोल्हापूरच्या पुढे रस्ता बराचसा घाटाचा असल्यामुळे गती मंदावते. त्यात मी एकटाच प्रवास करणार असल्याने कोल्हापूर येथे थांबून महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाव असा विचार करून २८ ऑगस्ट, रोजी पहाटे घर सोडलं आणि "दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा नामाचा गजर करत दुपारी १:३० वाजताच कोल्हापूरला पोहचलो. आता खरं तर दाभोळे अवघ्या २-२:३० तासांवर राहिलं होतं. ठरवलं असतं तर पुढे जाणं सहज शक्य होतं. पण दत्त प्रभूंची ईच्छा काही वेगळी होती.
क्रमशः
Comments