गेल्या २ दिवसांत स्वामींनी पुन्हा एकदा आम्हाला निमित्तमात्र करून त्यांची सेवा घडवून घेतली. कारण आधीच्या "स्वामी सर्व देवी देवतांसह आणि सर्व देवी देवतांच्या साक्षीने विराजमान झाले." या लेखातील देव्हारा, त्यात विराजमान स्वामी आणि त्यांच्या आजबाजूला विराजमान त्यांचीच विविध रूप पाहून कित्येक जणांना प्रसन्न वाटले तर किती जणांचे मन भरून आले. स्वामी म्हणजे ब्रम्हांडनायक, कित्येक ब्रम्हांडांची निर्मिती होण्यापूर्वीचे हिरण्यगर्भ. नुसत्या छायाचित्रांकडे पाहून त्यातून जाणवणारी सकारात्मक ऊर्जा किती जणांनी अनुभवली. न्यूटन त्याचा "लॉ ऑफ कन्सर्वेशन ऑफ एनर्जी" सांगताना म्हणाला होता - "ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे फक्त एका माध्यामातून दुसऱ्या माध्यमात रूपांतरण होते." बरोबरच आहे! कशी नष्ट होईल ती? ही ऊर्जा म्हणजे एक चैतन्य आहे जे सृष्टीच्या निर्मिती अगोदरही होते आणि नंतरही राहणार आणि हे चराचरात भरलेले चैतन्य म्हणजेच आहेत ते - "श्री स्वामी समर्थ!"
शेवटचा लेख त्यातील छायाचित्रांसह विविध ग्रुप आणि माध्यमातून २ दिवसांत १५०० हून अधिक लोकांपर्यंत पोहोचला. कित्येक स्वामी भक्तांशी आम्ही जोडले गेलो. कोणी ४ नवीन गोष्टी सांगितल्या तर कोणाला ४ नवीन गोष्टी कळल्या. स्वामींना ज्या गोष्टी ज्यांच्यापर्यंत पोहचवायच्या होत्या त्या त्यांनी पोहोचवल्या. बरेच वैचारिक आदान प्रदान पार पडले. त्या विचारांतील प्रत्येक वाक्यात त्यांचे नाम होते. "तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम" याचे प्रत्यंतर येत होते. स्वामींचे आशीर्वाद घरोघरी पोहोचले. आम्ही धन्य झालो.
स्वामींची अशी कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना! 🙏🏽
॥श्री स्वामी समर्थ ॥ ॥हरे कृष्ण ॥
Comments