एप्रिल २०२१ मध्ये स्वामींचा प्रकटदिनाचा सोहळा आटोपून आम्ही ताबडतोब परतीच्या मार्गाला निघालो. रस्त्यात सदगुरू श्री शंकर दत्तात्रेय चिले महाराजांची समाधी असलेलं स्थान लागतं जे कासव मंदिर, पैजारवाडी म्हणून प्रख्यात आहे. आम्ही एकंदरच या अध्यात्म मार्गात नवीन असल्यामुळे दत्त संप्रदाय आणि त्यात होऊन गेलेल्या दत्तावतारी महापुरुषांची आम्हाला ओळख अजून झालेली नव्हती. या समाधी स्थानावरून आमची चौथी खेप होती पण आतापर्यंत जसे कधीच थांबलो नव्हतो तसेच यावेळी सुद्धा न थांबताच आम्ही पुढे जाऊ पाहत होतो. कारण शक्य तितक्या लौकर महाराष्ट्र हद्द गाठायची होती आणि काळोख व्हायच्या आत हुबळी पर्यंत पोहचण आवश्यक होतं. आकांक्षा मठातून निघाल्यापासून अस्वस्थ होती. आम्ही सांगलीच्या गजानन कुलकर्णी आणि विश्वनाथ कानिटकर यांच्या गाडीच्या मागे मागे जात होतो. त्यांनी गाडी कासव मंदिरापाशी गाडी थांबवली पण कोविड मुळे महाराष्ट्र बंद होणार म्हणून आम्हाला फारसा वेळ दवडवून चालणार नव्हतं. आम्ही या चवथ्या खेपेस पण न थांबताच पुढे निघालो.
दिवसामागून दिवस, आठवडे, महिने उलटले. चिले महाराजांबद्दल माहिती मिळत गेली. आता वेळ आली होती प्रचितीची. आंबा घाट संपला की चिले महाराजांच्या समाधीकडे जाताना रस्त्यात मधोमध एक झाड आहे. रस्त्याच्या मधोमध असूनही हे झाड न कापण्याच कारण म्हणजे तिथल्या झाडाखाली असलेला दत्त महाराजांचा वास. त्या झाडाखाली असलेल्या मंदिर / देव्हाऱ्यात असलेली दत्त महाराजांची मूर्ती आजपर्यंत तिथून जाताना नेहमी पाहिली असून ते ठिकाण माझ्या चांगलेच लक्षात आहे.
यावेळी आकांक्षा गाडी चालवत होती आणि जशी आमची गाडी त्या वळणाच्या जवळ येऊन पोहचली तशी मी माझ्या स्मरणशक्तीला चालना देत म्हणालो - "बघ आता ते दत्तात्रेयांचे मंदिर येईल". गाडी वळली, मंदिर दिसलं. गाडी मंदिराच्या जवळ पोहचली. पण तिथे सद्गुरू दत्तात्रेयांची मूर्ती नव्हती. तिथे होते सद्गुरू श्री शंकर दत्तात्रेय चिले महाराजांचे दोन फोटो. धनकवडीच्या श्री शंकर महाराजांच्या मुद्रेत गुडघ्यांभोवती हात गुंडाळून बसलेले. हास्य करून जणू आमच्याकडे पाहत होते. आकांक्षा आणि माझी त्यावेळेची जी काही अवस्था होती ती शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे!
३० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता कासव मंदिर, पैजारवाडी येथे पोहचलो आणि इतक्यात आरती सुरु झाली. आम्ही आत शिरलो आणि आम्हाला पुढे जाऊन उभे राहण्यास सांगण्यात आले.
Kommentare