घरात शंकर महाराज मुर्तीरुपात विराजमान आहे म्हंटल्यावर त्यांच्या बोबड्या बोलीच अनुसरण करणारा त्यांचा आमच्या घरातील छोटासा भक्त "दिगंबरा" अजून तितकसं नीट बोलता न आल्याने त्यांना "दिंबगना दिंबगना श्रीपाद वल्लभ दिंबगना" म्हणतो. दोघांचं काय नातं आहे ते त्यांनाच माहिती. अजूनही अक्कलकोटला स्वामींच्या समाधी मंदिरातला तो "स्वामी जय जय" प्रथमच म्हणालेला क्षण आठवतो. एकीकडे गाड्यांशी खेळता खेळता कपाळाला आठ्या पाडून स्वतःच्याच तंद्रीत गुरफटलेल्या त्याच्या मुखातून निघणाऱ्या "दिंबगना दिंबगना श्रीपाद वल्लभ दिगंबना" चा गोडवा वेगळा आहे. प्रातःकाळी किंवा सायंकाळी दिवे लागताना टीव्ही वर चालू असलेला जप पाहून, ऐकून हळू हळू तो अयांशच्याही मुखात रुळला. टीव्हीवर दिसणाऱ्या त्रिमूर्ती दत्त प्रभूंकडे कधी कधी तो कुतूहलाने पहात असतो. त्याला नक्की कसलं कुतुहुल वाटत हे सांगणं कठीण आहे.
खर तर स्वामी सगळी तयारी करून घेत आहेत याची कुठेतरी जाणीव आहे. अवधूतानंद जगन्नाथ कुंटे यांची पुस्तक वाचताना त्यांनी एक गोष्ट मनात चांगली ठासून भरली ती म्हणजे "देवाला का घाबरायचं?" तो आपला आहे. देवाचं देवपण त्याच्या भक्तामुळे आहे आणि कोणी कशी भक्ती करावी याचे नियम कोणी सांगावे?
माझ्या मते तरी आमची परीक्षाच घ्यायची म्हणून स्वामी आणि शंकर महाराज घरात मूर्ती आणि पादुका रूपात स्थापन झाले. कारण तशा त्यांच्या लीला पण सुरू झाल्या. आमच्या देवघरात दत्तगुरूंची एक छोटीशी मूर्ती आहे. गाणगापूरहून प्रसादासोबत ते आमच्या घरी आले आणि देवघरात विराजमान झाले. अयांशला का कुणास ठाऊक त्या आकाराने सर्वात लहान असणाऱ्या "दिंबगनाबद्दल" खूप प्रेम उफाळुन आलं. त्याने सरळ ती मूर्ती उचलून तिचे लाड करण्यास सुरुवात केली. त्याच्या बोबड्या बोलीत तो त्यांच्याशी गप्पा मारताना पाहून त्याला नक्की कसं समजवावं हा विचार करून आमची मती गुंग होऊन बसते. समजवावं तर काय समजवावं? आणि का? कधी वाटतं पूजा करताना आम्ही फक्त कर्मकांड करतो आणि आमच्या सोबत बसून खरी पूजा कशी करावी, सद्गुरूंवर प्रेम कसं करावं हे तो तीन वर्षांचा चिमुरडा आम्हाला सांगतो. "लौकर दिवा लावा" म्हणून हट्ट धरून बसतो. देव हा देव्हारा, मूर्ती यांच्या पालिकडला आहे. आपल्याला सेवा करण्याचा आनंद घेता यावा म्हणून मूर्ती रूपात येऊन समोर उभा ठाकला आहे. दत्तगुरूंची उपासना करताना सोवळं ओवळं खूप पाळावं म्हणतात. पण कर्ता करविता तेच असताना आम्ही त्यांच्या आणि त्यांचा लळा लागलेल्या भक्ताच्या मध्ये येणारे आम्ही कोण?
आधी मला हे सगळं किंवा यातलं काहीच लिहायची ईच्छा नव्हती. पण काही गोष्टी या माझ्या पलीकडच्या आहेत. एक गोष्ट स्वामी स्पष्ट सांगत आहेत - "तुम्हाला कोरी पाटी दिली आहे. किती वेळा ती लिहिली गेली, पुसली गेली. पुन्हा कोरी झाली. कितीही पुसली तरी पूर्वीचे काही ओरखडे दिसणारच. ती पाटी नव्यासारखी कोरी परत कधीही होणार नाही. तुमचा ज्याच्याशी शाश्वत सबंध आहे त्याच्या नावाचा कित्ता पुन्हा गिरवायचा आहे. तुमच्या मुलांना घडवायची हीच वेळ आहे. अध्यात्माचा मार्ग हा म्हातारपणी नाही तर शक्य तितक्या लहान वयात धरायचा असतो. "भगवंताचे नाव मुखात नाही आलं तो दिवस वाया गेला!" हे जेवढं लौकर कळेल तेवढं त्यांचं पुढचं आयुष्य सुकर होणार आहे. दुनियादारीत कितीही गुरफटले तरी त्यांना त्यांचा मार्ग मोकळा मिळणार आहे. तुमच्यापेक्षा ते खऱ्या अर्थाने जास्त सुखी आणि समाधानी राहणार आहेत. त्याला लहानपणापासूनच नसत्या शर्यतीत अडकवू नका. त्याला स्वतःपासून हरवू देवू नका. त्यांना त्यांची नियत कर्म करताना नामस्मरण करण्याचं लक्षात राहिलं की त्यांचा कर्मयोग आपोआप पूर्ण होणार आहे.
आजकालची जीवनपद्धती एकंदर बदलल्यामुळे नको त्या कितीतरी गोष्टी काळानुरूप आपोआप आजच्या पिढीकडून आत्मसात केल्या जात आहेत. पण ही नवीन पिढी त्याच अवलोकन खूप वेगळ्या पद्धतीने करते आहे. तेंव्हा ही कोरी पाटी भरताना ती खरंच आजूबाजूच्या प्रत्येकाप्रमाणे भरण आवश्यक आहे का? याचा विचार करा!"
आम्ही अयांशचे जन्मदाते आई वडील असलो तरी, सांभाळ करणारे म्हणून त्याच्याकडे बघून एवढच म्हणतो "...नको घाबरु तू असे बाळ त्यांचा!".
खालील फोटो अयांशच्या शाळेने मला काल व्हॉट्सॲप वर पाठवला.
खुप छान लिहिलय नयनेश....
अयांशला खुप शुभाशीर्वाद☺
⚘श्री गुरुदेव दत्त ⚘श्री स्वामी समर्थ ⚘जय शंकर महाराज⚘
Blessed are the children who have parents like you, The right upbringing. 🙌👌