top of page
Writer's pictureNayanesh Gupte

दुरून डोंगर साजरे

सर्व तयारी झाली होती. दोन दिवसांत द्वारका - सोमनाथ - गिरनार असा सगळा प्रवास करण्यासाठी म्हणून निघायचं होत. नवीन वर्षातली (ग्रेगरियन कॅलेंडर प्रमाणे) पहिली एकादशी ज्या दिवशी आली होती त्या दिवशी आम्ही द्वारकेत श्रीकृष्णासमोर असणार होतो तर संक्रातीच्या वेळी गिरनारी. सोबत गौरी ताई, तिचं कटुंब आणि मित्रपरिवार पण गिरनारी भेटणार होते. अजून काही साधक ज्यांच्याशी ऋणानुबंध जुळले आहेत असे काही जण पहिल्यांदाच गिरनारी भेटणार होते. पहिलीच भेट असणार होती या सगळ्याच ठिकाणी. उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती.


पण म्हणतात तसं जोपर्यंत "त्याची" ईच्छा होत नाही तोपर्यंत काही शक्य नाही. इकडे आई बाबा सर्दी पडसे तापाने आजारी असल्याचं त्यांनी कानावर घातल. मी सगळी लक्षण नीट ऐकून घेतली. हा दुसरा तिसरा काही नाही कोविड आहे याची मला संपूर्ण खात्री झाली. हालचाली वेगात सुरू झाल्या. मेट्रोपोलीस लॅबला कळवून प्रथम बाबांची RTPCR करून घेतली. अजून पर्यंत आई ठीकठाक होती पण तरी कुठेतरी आईची काळजी जास्त वाटत होतीच. दुसऱ्या दिवशी आईची सुद्धा वाढती सर्दी बघता तिची सुद्धा चाचणी करून घेतली. दुर्दैवाने दोघांच्याही चाचण्या positive आल्या. दुसरीकडे सासू सासरे सुद्धा कोविड चाचणीत positive आल्याचे कळलं. या दरम्यान चाचणीचा निकाल यायची वाट न पाहता डॉक्टरांशी बोलून आई बाबांच्या आवश्यक ती औषध आधीच सुरू करून दिली. सासू सासरे सुद्धा त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेतच होते.


आता अशा परिस्थितीत माझा पाय प्रवासासाठी म्हणून घरातून निघेना. "आम्ही द्वारकेत पाऊल पाऊल ठेवायला आणि इथे माझी आवश्यकता लागली तर?" आणि नेमकं तसच झालं. आई बाबांची प्रकृती खालावली. इथे घरी अयांश सर्दीने हैराण झाला. त्याला सुद्धा या परिस्थीतीत घेऊन जाणं अशक्य होऊन बसलं होतं. मी ताबडतोब काही फोना-फोनी करून आई बाबांना अंबरनाथमधील घरा जवळच्या संजीवनी इस्पितळामध्ये दाखल व्हायची सोय केली. आई बाबांची तब्येत बघून डॉक्टरांनी मला स्वतः ताबडतोब फोन केला आणि त्यांना आतापासून लगेचच इस्पितळात दाखल करून घ्यायची गरज असल्याचं कळवले. आतापर्यंत आईचा आवाज कफाने बंद झाला असल्याने डॉक्टर असच काहीसं सांगतील याची मला पूर्ण खात्रीच होती. डॉक्टरांना म्हणालो "मी बँगलोरहून निघणं आवश्यक असल्यास मला तसं स्पष्टच सांगाल." पण त्यांनी सुद्धा मला न येण्याबाबत सल्ला दिला. एकीकडे सासू सासरे सुद्धा तशाच काही कठीण परिस्थितीतून जात होते पण त्यांची प्रकृती तशी स्थिर स्थावर होती. औषध चालू होती. ते घरातच उपचार घेत होते. कर्मधर्मसंयोगाने त्यांनाही काही जवळची आपुलकीने चौकशी करून, वाटेल ती मदत करणारी माणसं सोबत मिळाल्याने ते तसे निश्चिंत होते.

एक गोष्ट माझ्या चांगली ध्यानात होती ती म्हणजे आम्ही जर प्रवासासाठी बाहेर पडलो असतो तर कदाचित आई बाबांनी ताकास तुर लागू दिला नसता पण तसं न केल्याने काय झालं असतं याची कल्पना पण करता येत नाही. कारण आई बाबा इस्पितळात पोहचले तोपर्यंत इन्फेक्शन आतपर्यंत पोहचलं होतं. आईची ऑक्सिजनची पातळी खाली गेली होती. तिला ऑक्सिजन लावायची आणि दोघांना रेमडिव्हीसिर देण्याचीही आवश्यकता होती.


३-४ दिवसांत आई बाबा आणि सासू सासरे यांची प्रकृती आता हळू हळू स्थिर स्थावर होऊ लागली. अयांश सुद्धा सर्दितून थोडा बरा होत आला होता. तोपर्यंत आकांक्षाला डोकेदुखी, घसा खवखवणे, हुडहुडी भरणे, अंग ठणकणे इत्यादी लक्षणं सुरू झाली. आम्ही पण जास्त वेळ न काढता ताबडतोब औषध उपचार सुरू केला. दुसऱ्या दिवशी हीच परिस्थिती माझी. तोपर्यंत आकांक्षाची तब्येत थोडी सुधारू लागली होती. मी सुद्धा तापाने फणफणलो. जागेवरून उठताही येईना. बाबांना डिस्चार्ज मिळाला होता. आईला अजून २ दिवस तरी इस्पितळामध्ये थांबूनच औषध उपचार पूर्ण करणं आवश्यक होतं. त्यामुळे आमच्या या परिस्थितीबद्दल मी त्यांच्याकडे काही वाच्यताच केली नाही. असेच औषध उपचार घेण्यात काही दिवस उलटले. आम्ही सर्वच या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडलो.


"कठीण समय येता कोण कामास येतो?"- माझा श्रीकृष्ण! वेगवेगळ्या रूपांत धाऊन येणारा. या दिवसांत आई बाबा सासू सासरे आम्हाला सगळ्यांनाच आधार होता स्वामींच्या तारक मंत्राचा! आईला व्हिडिओ कॉल केला की ती तारक मंत्र ऐकत असल्याचे सांगायला विसरत नसे. "त्याने" भले आमचा प्रवास रद्द करवला असेल पण कदाचित त्यावेळी तेच योग्य होतं. प्रारब्धाचे भोग कोणाला चुकत नाहीत? ते भोगण्यासाठीच हा जन्म! नाहीतर आधीच मोक्ष मिळाला असता तर आज इथे बसून हे का लिहीत असतो? संकट येतात आणि जातात. हा देह प्रपंचाचा दास आहे तर मन श्रीकृष्णाचे. अगदी निघायच्या दिवशी सगळं काही रद्द करताना सुद्धा मनात खूप चलबिचल चालू होती. "त्याच्यावर श्रद्धा आणि प्रेम आहे तर तो घेईलच सगळं सांभाळून. आपण जाऊया का?" पण त्याने जाऊ न देण्याचेच काय ते तीव्र संकेत दिले. तो म्हणाला - "वेळ आली की तू येशिलच. जाऊन जाऊन जाशील कुठे? माझ्याकडेच यायचं आहे. पण तूर्तास शक्य नाही."


हा अनुभव विशेष करून लिहावासा वाटला. कारण "आम्ही किती स्वामी कृपांकित आहोत!" असं खूप जणांचं म्हणणं असतं. पण प्रारब्धाचे भोग भोगताना खरी कसोटी असते. सोशल मीडियाच विश्व हे खूप भ्रामक आहे. त्यावर जे चित्र दिसतं ते पाहून कधी हुरळून जाऊ नये. आयुष्यातल दुःख माणूस सोशल मीडियावर वाटतं फिरत नाही आणि तसं करूही नये.


गिरनारचा डोंगर अजून दूरच राहिला आहे. इथे घर बसल्या सोशल मीडियावर दिसणाऱ्या त्याचा छायाचित्रांतून सांगतोय - दुरून डोंगर साजरे!

मी काढा घेताना, तर अयांशला बाबा आयताच सापडला म्हणून तो सुद्धा ताणून देताना!

श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽

84 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Aishwarya Kamath
Aishwarya Kamath
Feb 01, 2022

Jai Shree Krishna 🙏🌹

Shree Swami Samartha 🙏🌹. Take care of yours and your family's health.. U will definitely complete the yatra u had planned.

Jai Shree Gurudeva Dutta 🙏🌹.

Like
bottom of page