स्वामी आमच्या आमच्या देव्हार्यातील सर्व देवी देवतांसह नवीन देव्हाऱ्यात उद्या प्रस्थान करण्यास आमच्या एवढेच उत्सुक असतील का?
त्यांनीच तर ठरवलं सगळं! नाहीतर मी तर अगदी साफ विसरून गेलो होतो असा मोठा देव्हारा पण मिळतो. खास करून इथे कर्नाटकात पारंपरिक पद्धतीने बांधलेल्या घरात फडताळात केलेलं देवघर नेहमी दृष्टीस पडतं. त्यामुळे आता आधुनिक पद्धतीने घरांत असं सुंदर मोठं देवघर घ्यायची पद्धत दिसते.
स्वामींची सर्व देवी देवतांसोबत छान व्यवस्था करावी म्हणून फर्निचर पहायला म्हणून बाहेर पडलो खरा. पण डोळ्यासमोर काय आणि कसं घायच आहे याचं वेगळंच काही चित्र होतं. कोणकोणती दुकान धुंडाळायची आहेत हे मात्र डोक्यात होतं. ठरवलेल्या पहिल्याच दुकानासमोर आलो दुकानाच्या बाहेरच स्तब्ध उभा राहिलो! काचेच्या भिंती मागून ६ फूट उंच, ३ ½ फूट रुंद देव्हारा माझ्या डोळ्यात असा काही उभा राहिला की जणू विटेवरी पांडुरंग!
फार काही विचार करायला जागा राहिलीच नव्हती! त्यात काही बदल सुचवून नवीन देव्हारा बनवायला दिला. आपण कितीही मूर्ख असलो तरी 'तो' आहे सांभाळायला म्हंटल्यावर सगळ त्याच्या त्याच्या शिरावर सोपवून मोकळ व्हायचं असतं असं अलीकडे ऐकत वाचत आलोय त्याचीच ही काय ती प्रचिती! कारण मी तयार आहे माझं नियत कर्म करायला! पण भगवंता मार्ग तूच दाखवायचा आहे! तुलाच तर विराजमान व्हायचं आहे तिथे! आहे का ?
बघा गदिमा काय म्हणतात खाली -
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या जड देही देव भरूनिया राही
देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही
गीतकार : ग. दि. माडगूळकर, मूळ गायक : सुधीर फडके, संगीतकार : सुधीर फडके, चित्रपट : झाला महार पंढरीनाथ (१९७०)
याच सुधीर फडके यांनी गायलेले गीत तर आहेच सुंदर -
पण अर्चीता भट्टाचार्य यांनी गायलेले गीत पण मला खूप भावलं -
पण काही झालं तरी श्रीकृष्ण सांगतोच त्याच्या अर्चाविग्रहाच महत्त्व भागवतात. आपल्या अंतरीचे भाव सगळे त्या देव्हाऱ्यातील मूर्तीत उतरतात. मूर्तीच सगुण साकार रूप घडतं. मूर्तीरूपात तो आपल्याकडे बघतो, हसतो, रुसतो, ओरडतो, मार्गदर्शन करतो, लाड करतो आणि करवून पण घेतो. म्हंटल तर सगळे मनाचे खेळ आणि म्हंटल तर सगळ्या त्याच्या लीला. सगळ्यांना दिसायच्या नाहीत त्या! ते त्याचं आणि आपलं गुपीत असतं. म्हणून तर भगवद्गीते मधील भक्तियोगात श्रीकृष्ण म्हणतो -
श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते। श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥
श्रीभगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत.
या लेखाची आणि या गाण्याची गंमत अशी की हे गाणं आजच्या पूर्वी मला कधीही ऐकल्याच आठवतं नाही. पण रिकामा देव्हारा समोर पाहिला आणि हे गाणं आठवलं, YouTube वर ऐकण्यास सुरुवात केली आणि एकीकडे लिहिण्यास....
श्री स्वामी समर्थ 🙏
Beautifully expressed👌👍