॥अवधूत चिंतन गुरुदेव दत्त॥ ॥श्री स्वामी समर्थ॥
आजची पूजा काही वेगळीच झाली. का कुणास ठाऊक पण शंकर महाराज खूप अस्वस्थ वाटले. खरं तर त्यांचे डोळे उन्मनी अवस्थेत दिसतात पण आज पाणवलेले दिसले. रोज सर्व देवांना अभिषेक करत असलो तरी शक्यतो शंकर महाराज आणि स्वामींची मूर्ती हलवत नाही. पण आज संपूर्ण देवघर मोकळं केलं. त्या पाणावलेल्या डोळ्यांच्या शंकर महाराजांच्या मूर्तीला मांडीवरील वस्त्रावर ठेवलं. त्यांना म्हणालो सर्व घडवून आणणारे तुम्हीच आहात ना? मग आता ही आसव ज्यासाठी आहेत ती काळजी पण तुम्हीच घ्यायची आहे. मी काय करू शकतो?
नाहीतर रोजची देवपूजा जरा वेगळी रंगते. प्रत्येक मूर्तीला ताम्हणात घेऊन अभिषेक करताना त्यांच्याशी गप्पा मारतो. त्यांची विचारपूस करतो, आदल्या दिवशी पूजा करताना काही राहिलं असेल, चुकलं असेल तर माफी मागतो. याच सगळ्यातून जाताना अन्नपूर्णा माई विषयी खूप वेगळी आस्था निर्माण झाली. आधी कारण काही कळलं नाही. लग्नात सप्तपदी घालून आकांक्षासोबत तिने पण गृहप्रवेश केला आणि बरच काही बदललं. भोग हे भोगून संपवावे म्हणतात ते मी स्वतः अनुभवलं आहे. इंजिनिअरिंग करताना प्रवासामुळे आणि अभ्यासाच्या ताणामुळे खूप हाल झाले. पित्ताचा त्रास जडला. सकाळी उठलो की सगळं पित्त उलटून पडत असे. हा त्रास एकदा तर एवढा वाढला की ICU ची पायरी सुद्धा गाठली. जवळपास १० वर्ष हा त्रास भोगला. या दरम्यान सर्व पद्धतींचे औषध उपचार पद्धती करून झाली. पण त्रास काही गेला नाही. २०१८ नंतर हळूहळू खाण्यापिण्यात फरक पडला. तब्येत सुधारली. वजन लाजिरवाण्या आकड्यांवरून योग्य वजनाच्या कक्षेत आलं आणि स्थिरावल. पित्ताचा त्रास काही न करताच पूर्ण बंद झाला. अन्नपूर्णेची पूजा करताना हे सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. मनोमन तिला धन्यवाद देतो आणि जीच्यासोबत तिने गृहप्रवेश त्या माझ्या सुगरण अन्नपूर्णेला पण.
अशाच गप्पा रंगतात. कधी कधी काही प्रश्नांची उकल त्यांच्यासमोर बसून पूजा करतानाच सापडते. विचार करताना काही चूक झाली की ते सुद्धा पूजा करतानाच तिथल्या तिथे स्पष्ट करतात. मागे जेंव्हा स्वामींच्या पादुकांना अत्तरलेपन करत होतो तेंव्हा मनात फक्त विचार डोकावला की रोज अत्तरलेपन करावं की काही ठराविक दिवस. काही ठराविक दिवसच करावं असं मनात यायला आणि नंतर शिवलिंग आडव पडल, महालक्ष्मीची मूर्ती पडली, अजूनही काही मुर्तींसोबत तेच आणि तेही विचार आल्याच्या दुसऱ्या क्षणाला. ताबडतोब कान पकडले. "स्वामी रोज करतो अत्तरलेपन! चुकलं माझं. माझी काही हरकत असण्याचा प्रश्नच येत नाही."
आपण म्हणतो खरे की कर्ता करविता भगवंत असतो. पण या वाक्यात बरच काही दडल आहे. माझ्याकडून पूजा करवून घेणारा पण माझा श्रीकृष्णच पण भगवद्गीता सांगताना तो हे सुद्धा सांगतो की - "कधी कधी लोक त्यांच्या कृत्यांना माझं नाव देऊन लोक भ्रमिष्ट होतात. त्यांना हे कळत नाही की "करविता" म्हणजे करवून घेणारा. मी त्रिगुणातीत असलो तरी सत्त्व, रज आणि तम या माझ्या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी कार्य घडवून घेत असतो. तू माझी पूजा करतोस तेंव्हा मला शरण येऊन करतोस म्हणून तू सत्त्व गुणात स्थित असतोस. तुझ्या मनातले शुद्ध विचार हे माझ्या प्रेरणेने कंप पावत असतात. हे फक्त कर्मकांड नाही हे लक्षात ठेव. तसं असतं तर मी तुझ्या निवासस्थानी न मूर्ती स्वरूपात आलो असतो न तुला पादुका पूजन करण्याची संधी दिली असती. तुझ्या विचारांची आणि तुझ्या सर्व पूर्व कर्मांची शुद्धी करून घेणं हे काम माझं आहे. कारण तू माझा भक्त आहेस. तू तुझ नियत कर्म करत रहा आणि बाकी सर्व माझावर सोपव."
मी पुन्हा गहिवरलो, दुःखात सुखाला हसलो. परत विचारलं, "पण महाराज ही आसवं ?". हसले... म्हणाले "मी स्थितप्रज्ञ आहेच रे! पण आपला कोणी भक्त चुकतोय हे पाहून वाईट वाटतंच. चालायचंच! संध्याकाळ झाली की वासरू येईल परत गोठ्यात आईकडे. जाणार कुठे ? तू काळजी नको करुस.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "
ता. क. :
या महिन्यात लिहिलेला हा १३ वा लेख शंकर महाराज तुम्हाला अर्पण.
सब कुछ तेरा, कुछ नही मेरा!
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Comments