top of page
Writer's pictureNayanesh Gupte

देह मंदिर, चित्त मंदिर


गेल्या शनिवारी हे छायाचित्र इंस्टाग्रामवर सुद्धा पोस्ट केले तेंव्हा कल्पना नव्हती की यापुढे नक्की काय होणार आहे. आज एक आठवडा उलटला पण त्यावर येणारा प्रतिसाद अजूनही चालूच आहे. एरवी फार फार तर एक ४०-५० लाईक ने प्रतिसाद मिळणाऱ्या इंस्टाग्राम वरील छायाचित्रावर अचानक हजारोंच्या संख्येने मिळणारा प्रतिसाद पाहून मी भांबावून गेलो. नक्की काय चाललंय काही कळतं नव्हत. १,७०० हून अधिक लाईक, ३२,००० हून अधिक लोकांनी ते उघडून पाहिलं आहे तर जवळपास २०० जणांनी ते सेव्ह करून ठेवलं आहे. छायाचित्राखाली आणि मेसेजेस मधून येणारे अभिप्राय "मंदिर छान आहे आणि कुठून घेतलं?" म्हणून विचारणा करू लागले. हे सगळं कशासाठी? म्हटलं तर सगळा त्या श्रीकृष्णाच्या मायेचा पसारा!


पण स्वामी तुमच्या आयुष्यात आले की प्रत्येक अनपेक्षित घटना तुम्हाला काहीतरी नवीन बोध देण्यासाठीच असते. इथे दोन मंदिरं अपेक्षित आहेत. एक मंदिर लाकडाचं आणि दुसरं देह आणि चित्ताचं. या देहावर चढवलं सोवळ कारण त्या लाकडी मंदिरात बसलेल्या सगुण रूपातील परब्रम्हाच पावित्र्य या देहाकडून भंग होऊ नव्हतं द्यायचं. पण चित्ताच काय? खरं तर या देहाचं शुचिर्भूत होणं संपूर्णपणे त्या चित्तावर अवलंबून आहे. चित्त सुद्धा हळू हळू त्याच्या सगुण साकार रूपावर स्थिर होण्याचा प्रयत्न करतं आहे. देहाच्या आत कुठेतरी स्थिरावलेल्या निर्गुण आत्म्याला पण साद घातली, "बाबारे! हा देह आज आहे उद्या नाही. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत हेच तुझ मंदिर आहे!". त्यामुळे या देह आणि चित्ताच पावित्र्य राखायचच आहे. म्हणजे नक्की काय करायचं आहे? वसंत बापट त्यांच्या या खालील प्रार्थनेतून ते खूप सुंदर रीतीने मांडतात.


देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


शाळेत असताना खूप तालासुरात ही प्रार्थना फारसा अर्थ न समजताच म्हंटली होती. पण आता कुठे जाऊन अंतरीचा मागोवा घ्यायला सुरुवात झाली आहे. भावना, संवेदना जागृत व्हायला लागल्या आहेत. खऱ्या सत्याची ओढ लागली आहे. वासनांची जाणीव व्हायला लागली आहे. इतर साधकांशी जोडले जातोय तेंव्हा आपण सगळे त्या परमात्म्याचे अंश आहोत या अर्थाने एकतेची जाणीव होत आहे. आता स्वामी सगळी जन्मो जन्माची उजळणी करून घेत आहेत. खरं सत्य किती सुंदर आणि मंगल आहे याची जाणीव होऊ लागली आहे. आता कुठे मंदिरातील सगुण स्वामींसोबत अंतरीच्या निर्गुण स्वामींची आराधना पण तेवढीच जाणीवपूर्वक होऊ लागली आहे.

श्रीकृष्णार्पणमस्तु!


श्री स्वामी समर्थ हरे कृष्ण

31 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page