"तुला आज स्वप्न पडलं का ?" हा प्रश्न माझ्यासाठी "तू आज दात घासलेस का?" विचारण्या इतकाच विचित्र आहे. त्यामुळे पूर्वी साहजिकच सगळ्यांना रोज स्वप्न पडतातच असं मी गृहीत धरून होतो. नंतर नंतर ही गोष्ट बाकीच्यांसाठी तितकीशी साहजिक आणि नित्य नियमाने घडणारी नाही हे लक्षात आलं.
या स्वप्नांची एक गंमत असते. रोज काहीतरी नवीन खेळ. मेंदू कुठल्या घटना, पात्र आणि विषय एकत्र येऊन जोडतो याचा काही भरवसा नाही. पण या स्वप्नांची एवढी सवय झाली आहे की ते चांगलं असो किंवा वाईट आता त्याच तितकसं काही वाटत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला स्वप्न पडलं हे आठवत पण बऱ्याचदा नक्की काय पडलं आठवत नाही. ही पण गोष्ट कधी कधी आश्चर्यकारक वाटते. कारण जसं आपल्याला आपण जगलेला प्रत्येक दिवस आठवत नाही पण काही ठराविक दिवस आठवतात तसचं काही स्वप्न अशी पण आहेत जी १०-१५ वर्षांपूर्वीची असूनही अजूनही आठवतात.
बरं, हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा की काही जणं त्यांना पडणाऱ्या वाईट स्वप्नांबद्दल खूप चिंतीत होतात. असच काहीसं एक दोन दिवसांपूर्वी आकांक्षाच्या बाबतीत घडलं. साहजिकच उठल्यावर ती थोडी वैतागलेली होती. तिने स्वप्न सांगितल्यावर धीर गंभीर चेहरा होण्या ऐवजी माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. नाही! आसुरी आनंद नव्हता तो! त्याला कारण आहे. गेल्या वर्षभरात जेवढं काही वाचनातून ज्ञान आत्मसात करून घेऊन मेंदूत खोलवर रुजाव म्हणून प्रयत्न केला आहे त्याची कुठेतरी परीक्षा सुद्धा आहे.
मी आकांक्षाला म्हणालो की "तू खर तर नशीबवान आहेस की तू जे काही घडताना पाहिलंस ते स्वप्नात पाहिलंस आणि प्रत्यक्षात नाही. तुझी स्वामींवर श्रद्धा आहे आणि ते त्यांच्या भक्ताची काळजी कशी घेणार नाहीत?!!" श्रीपाद प्रभू हे त्याचेच पूर्व अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या अक्षरसत्य ग्रंथात वाचलेला हा पुढील उतारा जशाच्या तसा -
''श्रीकृष्णाने कर्माचे फळ भोगल्या शिवाय चुकत नाही असे म्हटले खरे, पण ते कर्मफल जागृतावस्थेत भोगावे असे म्हटले नाही. ते स्वप्नावस्थेत सुध्दा भोगू शकता. स्थूल शरीराने १० वर्ष भोगावयाचे कर्म, मानसिक त्रासामुळे, स्वप्नामधिल मानसिक व्यथेमुळे कांही घटिकेत भोगून कर्मराहित्य प्राप्त करू शकतो, सत्पुरुषांस, योगियांस दान-धर्म केल्याने, दैवी कृपे मुळे पाप कर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप असून त्यांच्या ठाई करुणा असल्या कारणाने, आपले पाप कर्मफल त्यांच्यावर ओढून घेतात व त्यांचे पुण्य आपणास देतात.''
मग असं असेल तर, आपण जर कोणाचं काही वाईट चिंतीत नसताना आपल्याला स्वतःविषयी जेंव्हा कधी वाईट स्वप्न पडतील तेंव्हा कोणत्यातरी पूर्व कर्मातून स्वामी आपली मुक्ती घडवून आणत आहेत असं ठामपणे आपण म्हणू शकतोच की. म्हणजेच ही खरोखर आनंदाची बाब आहे! कारण "न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती!"
Comments