"अक्षरब्रह्म - मृत्यूपूर्वीचा मोक्ष" या मागच्या लेखात "नामस्मरण" या बद्दल पुसटसा उल्लेख करून तिथेच सोडलं खर. पण आज त्याबद्दल लिहिण्यात एक विशेष महत्त्व लक्षात आलं. त्याला कारण पण तसचं आहे. आज श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी. सोमवार, मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५, (इ.स.२२ डिसेंबर १९१३) या दिवशी, पहाटे ५.५५ वाजता ‘जेथें नाम, तेथें माझे प्राण, ही सांभाळावी खूण.’ हे शेवटचे शब्द उच्चारून, या महापुरुषाने आपला देह ठेवला.
नामस्मरण या विषयावर भरभरून लिहिण्याइतका मी मोठा नाही आणि माझी पात्रता पण नाही. पण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी नामा बद्दल भरभरून प्रेम वाटलं आहे आणि ते या प्रवचन रूपातील ग्रंथातून उपलब्ध आहे. मला खर तर प्रवचन हा शब्द पण खूप नकोसा होतो, कारण त्याचा मूळ अर्थ खूप सुंदर असला तरी आजकाल "मला तुझ प्रवचन नको!" अशा काही वाक्यांनी त्यातली सकारात्मकता पार लयाला जाऊन ठेवली आहे.
या पुस्तकातून श्री महाराज "नाम सर्वोत्तम का?" याबद्दल विस्तृतपणे मांडतात. "पण नाम सर्वोत्तम का ?" याच उत्तर एकाच प्रवचनातून दिलं तर कदाचित ते मनात तेवढं खोलवर रुजणार नाही. जसं आंब्याची कोय पेरून दुसऱ्या दिवशी आपण त्यापासून उगवलेल्या झाडाचे आंबे खाऊ शकत नाही तशीच काहीशी या नामाची महती आहे. ही महती सुद्धा आपल्याला क्रमाक्रमाने कळावी म्हणून आपण आपल्या मनाला रोज थोड खत पाणी घातलं तर पाहिजेच ना! तेंव्हा कुठे त्याला थोडासा अंकुर फुटेल आणि मग त्याचा वृक्ष होईपर्यंत त्याची वाट तर पहावीच लागणार. कोणत्याही कृत्रिम पद्धतीने बी चा वृक्ष करता आला असता तर सध्या "ग्लोबल वॉर्मिग" च्या नावाने जी बोंब मारली जात आहे तिचा प्रश्नच आला नसता. पेरा बी, वाढवा झाड की मिळाली फळं. परत त्या फळांतून अजून बी मिळतिलच की! किती सोप्प नाही का ? पण होतं का असं?
म्हणून मागच्या लेखात आधीच कृष्णाने सांगितलं होतं, इथे पळवाटा नाहीत. भगवंताच दर्शन घ्यायचं असेल भक्तीचा दिवा अखंड प्रज्वलित रहावा म्हणून त्याला नामस्मरण रुपी तेल / तूप हे आवश्यकच आहे. भगवद्गीता सांगताना श्रीकृष्ण म्हणतो की मला "यथार्थ" रूपात जाणण्याची ईच्छा असेल तर भक्ती हा सर्वात सुलभ आणि श्रेष्ठ मार्ग आहे. हे यथार्थ रूप सगुण मी निर्गुण हे तेंव्हाच कळेल जेंव्हा त्याची प्राप्ती होईल. पण जेंव्हा प्रश्न पडतो की आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्याला फारस काहीच जमणार नाही आणि तरीही अंतर्मनात कुठेतरी ईच्छा असते, की मलाही थोड फार अध्यात्म कळावं, या धक्का धक्कीच्या आयुष्यातून खऱ्या अर्थाने शांतता मिळावी तेंव्हा तो भगवंत स्वतः तो मार्ग आपल्याला उपलब्ध करून देत असतो. आपल्याला त्याची ओढ असते तशी त्यालाही आपली असतेच. फरक एवढाच की आपण धरसोड वृत्तीने तरी वागतो किंवा अधीर तरी होतो. पण तो मात्र स्थितप्रज्ञ आहे.
म्हणून "नाम सर्वोत्तम का?" हे एका फटक्यात न सांगता श्री महाराज यांची प्रवचने संकलित केलेल्या या ग्रंथात "नित्य उपासना" म्हणा किंवा काही म्हणा पण १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या ३६५ दिवसांसाठी रोज एक सुंदर प्रवचन आहे. बोध आहे. नामाच महत्त्व सांगितलं आहे. कारण इतर कडक नियम आणि अटी पाळून उपासना करणाऱ्या व्यक्तींकडे पाहून मनात नक्कीच शंका येते की हे कसे शक्य आहे की नुसतं नामस्मरण करून आपण आपल्या आराध्य देवतेपर्यंत पोहचतो ? आणि म्हणून आपण एक तर नामस्मरण सोडून तरी देतो किंवा इतर मार्गांना भरकटत जातो. म्हणून नामस्मरणाचा प्रवास सुरू जरी झाला असेल किंवा नसेलही, तरी त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल, तर जे नामात दंग होऊन, नामाच महत्त्व सांगत, नामरूपी भगवंतात विलीन झाले त्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या संकलित प्रवचनांहून अधिक मूल्यवान ते काय?
नवीन वर्ष येण्याच्या मार्गावर आहे. या येत्या वर्षात माझी नियत कर्म करताना मला शक्य तितकं नामस्मरण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासोबत नामस्मरण करण्यास प्रोत्साहन मिळावं म्हणून मी या ग्रंथातून रोज एक प्रवचन म्हणजे फक्त एक पान वाचायचा प्रयत्न करणार आहे. संकल्प शब्द मुद्दाम टाळला आहे. कारण मी फक्त प्रयत्नच करू शकतो. त्यांना यश देणं न देणं भगवंताच्या हातात आहे.
हा अतिशय मूल्यवान ग्रंथ मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत माझ्या मावशीला निमित्तमात्र करून माझ्यापर्यंत पोहचवला त्याबद्दल त्या श्रीकृष्णासमोर मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्यालाच काय ती काळजी!
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Comments