आज वर्षातली शेवटची एकादशी - सफला एकादशी. या वर्षात कोण्या एका एकादशी पासून एकादशीचा उपवास करण्यास सुरुवात झाली. का आणि कशी याच उत्तर माझ्याकडे सुद्धा नाही आणि शोधावं असं गरजेचं कधी वाटलच नाही. पण गंमत अशी आहे की काही न पडलेल्या प्रश्नांची उकल पण तोच स्वतः सोडवत असतो. एकादशीच महत्त्व पौराणिक कथांमधून विषद करण्यात तर आलच आहे पण भगवंताची खेळी एवढी सहज सोपी नसते. त्याच्या एका विचारात साध्या सोप्प्या आणि गुढाहून गूढ अशा कित्येक गोष्टी दडलेल्या असतात. वेळ आली की त्यातल्या काही कळतात तर बहुतांश कळण्या एवढी आपल्या बुद्धीची मजलच नसते.
एकादशीचा उपवास सुरू केले तेंव्हा उपासाचे पदार्थ म्हणून यथेच्छ ताव मारून खाल्ले आहेत. पण जस जसा वेळ दवडत होता त्या बरोबरच्या भावना बदलत होत्या. आधी पित्ताचा त्रास होता त्यामुळे भूक सहन व्हायची नाही. चिडचिड व्हायची. पण उपवास करताना मी माझ्या कृष्णासाठी उपवास करतो आहे ही भावना त्या चिडचिड होण्याला हळू हळू मारक बनू लागली. उपवासाच्या पदार्थांवर ताव मारणं कमी होत गेलं. खाण्यातली आणि विचारांतील सात्विकता बदलत गेली. अजूनही विकार आहेत आणि ते राहतील पण तरीही उपवास का करावा याचं कोड न विचारताच उलगडत होत.
श्रीकृष्णाला काय आवडत ?
निरपेक्ष भावनेने केलेलं प्रेम आणि निष्काम कर्म. "निष्काम कर्म" हा खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे कारण भगवद्गीता सोडून त्या आधी कोणत्याही शास्त्रात याचा उल्लेख आढळत नाही. बरं त्याच्या खोलात आता जात नाही पण सहजच त्याने विचारांचं बीज पेरल की - "अरे तुला दोन वेळेचंच काय तर तीन आणि चार वेळेचं पण पोठभर अन्न मिळतं. पण कित्येक जण असे आहेत की त्यांची एका वेळेची पण अन्न अन्न दशा झाली आहे. या पोटात पडलेली आग त्यांना दुष्कृत्य करण्यास प्रोत्साहन देत आहे. कोण स्वतः साठी तर कोण बायका पोरांसाठी दोन वेळेचं अन्न मिळावं म्हणून जीव तोडून मेहनत करतो आहे. कोण योग्य मार्गाने तर कोणी अयोग्य. एका वेळेनंतर पोटात पडलेली ही आग योग्य आणि अयोग्य मधली रेषाच मिटवून टाकते. विवेक लोप पावतो. देह फक्त माणसाचा राहतो पण मन पशुवृत्तीने पार ग्रासून जात. दोष कोणाला द्यायचा ?"
"तू उपवास उपवास म्हणून नको करुस. तो श्रीकृष्णार्पणमस्तु म्हणून मला अर्पण करतोस तेंव्हा तो एक यज्ञ समज. या यज्ञाचा परम भोक्ता मी आहे! भुकेच्या स्वरूपातील जठराग्नी मी आहे! तू उपवास करून तुझ्या वाट्याला आलेलं अन्न मला अर्पण केलंस ना आता त्याने कोणाचा जठराग्नी क्षमावयचा ते मी बघतो. आज कोण्या भुकेल्याचा जठराग्नीत अनपेक्षित पणे अन्न स्वरूपात आहुती अर्पण होणार आहे. तुझा उपवास रुपी यज्ञ संपन्न होणार आहे. हाच सृष्टीचा नियम आहे. तराजूच पारडं समतोल करावच लागतं. सगळी लेकरं माझीच आणि मी त्यांची माऊली!"
करकटावरी ठेवून तो उभा राहतो आणि मी त्या माऊलीकडे नुसता पहात राहतो!
विठ्ठल विठ्ठल!
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Comments