निराकार तो निर्गुण ईश्वर । कसा प्रगटला असा असा विटेवर ।। उभय ठेवले हात कटीवर । पुतळा चैतन्याचा ।।
ऋषीकेशला यायच्या आधीच ठरलं होतं की विठ्ठल रुख्मिणी मंदिरास भेट द्यायची आहे. पण तो खरंच पुतळा चैतन्याचा म्हणून प्रकटेल हे कल्पनातीत होतं!
जगन्नाथ कुंटे यांच्या "नित्य निरंजन" मध्ये सर्वप्रथम या "श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर" आणि आश्रमाचा उल्लेख वाचला आणि तेंव्हापासूनच ऋषीकेश आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जायचे वेध लागले होते. ऋषीकेशला आल्यापासून तर आकांक्षाच्या डोक्यात "कानडा राजा पंढरीचा..." वाजतच होते!
ऋषीकेशला भटकंती करताना काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि ते पाहून स्मिता काकीने ( स्मिता कारखानीस ) व्हॉट्सॲप वर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाण्याचे सुचवले. त्याच बरोबर ज्या अण्णा चिटणीसांचा "नित्य निरंजन" मध्ये उल्लेख आहे ते तिचे दीर असून त्यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या संबंधांबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्यांनीच हा आश्रम एकेकाळी स्थापन केला आहे.
काल ठरल्याप्रमाणे आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी आश्रमात पोहचलो. बाहेरून बंद दिसणाऱ्या दरवाजाबाहेर कोविडमुळे आश्रम बंद असल्याची सूचना लावली होती. आम्ही गाडी वळवली पण आश्रम किंवा मंदिर बंद असल्याचे बुद्धीला पटत नव्हते. गाडी थांबवून मी आणि आकांक्षा त्या आश्रमाच्या आत शिरलो. जरा वेळ इकडे तिकडे नजर टाकली आणि एका छोट्याश्या खोलिशी काही बांधकाम चालू असल्याचे निदर्शनास आले. तिथे चौकशी केली असता एक ८० ते ९० च्या दशकातले एक आजोबा समोर आले. त्यांनी स्वतःची जगदाळे अशी ओळख करून दिली. त्यांना स्मिता काकीचा निरोप सांगितला.
ताबडतोब ते मंदिराची चावी घेऊन आमच्या सोबत आले. रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या मंदिराचा जिना त्यांनी आमच्यापेक्षा कितीतरी जलद गतीने चढला. त्यांच्या मागोमाग आम्ही पण धावत धावत जिना चढत होतो. त्या एक मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रशस्त सभागृहात पोहचलो पण भगवंत काही दिसेना. जगदाळे आजोबा कोणतीतरी चावी राहिली म्हणून परत जिना उतरून तरतर खाली उतरून गेले आणि चावी घेऊन आले. कुलूपाला चावी लागली आणि अंगात चैतन्याची लहर येऊन गेली. दार उघडले तरी सर्वत्र काळोख दिसत होता. दुसऱ्या क्षणाला आजोबांनी दिवे लावले आणि "तो" पुतळा चैतन्याचा असा काही लक्ख प्रकाशाने उजळून निघाला की आमचे डोळे दिपून गेले. आम्ही आ वासून त्याच्याकडे पाहतच राहिलो. दुसऱ्या क्षणाला त्याच्यासमोर लोटांगण घातले.
त्या क्षणाला आम्ही जे काही अनुभवलं ते वर्णन करण्यासाठी माझ्याकडचे शब्द तोकडे पडतात. त्याच रूप, तिथल पावित्र्य, शांतता त्याच्या डोळ्यांना समोर दिसणारी गंगा नदी आणि तिच्यावरचा राम झुला सगळंच अद्भुत, अतर्क्य आणि अवर्णनीय !
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏