जन्म मुंबईत झाला असला तरी लहानपण अंबरनाथ मध्ये गेलं. लहानपापासूनच मुंबईच्या खेपा ट्रेन ने घालण्याची सवय लागली कारण जवळपास सर्वच नातलग मुंबईत! ट्रेन मध्ये चढल्यावर लोकांना धावत जाऊन जागा पकडायची घाई असायची आणि मला खिडकीत उभ रहायची जागा पटकवायची!
टाचा उंचावून खिडकीतून बघायला लागायचं तेंव्हापासून, ते डोक खाली वाकवून खिडकीबाहेर डोकावण्यापर्यंतचा काळ लोटेपर्यंतच नव्हे, तर नंतर नोकरीची पहिली दोन अडीच वर्ष मुंबईत होतो तोपर्यंत खिडकीच कुतुहूल कायम राहिलं. तेंव्हा बाहेर काही विशेष सौंदर्य बघायला मिळायच अशातली गोष्ट नव्हती. कुतुहूल होत ते वेगाचं, रुळांवर धावणाऱ्या, रस्त्यावर मोटार गाडी जागा बदलते तसे रुळ बदलणाऱ्या गाडीच. मजा तेंव्हा वाटायची, जेंव्हा एखाद्या समांतर जाणाऱ्या गाडीशी शर्यत लागायची किंवा जलद गाडी एखाद्या थांबा नसणाऱ्या स्थानाच्या फलाटाच्या बाजूने जाताना तिथल्या फलाटावरील कचऱ्याचा धुरळा उडवत भरधाव निघून जायची. लहानपणी धिमी गाडी आणि जलद गाडी ही संकल्पना रुळायला फार वेळ लागला होता. कारण ज्या गाडीला धिमी गाडी म्हणतात ती सुद्धा एवढ्या जोरात पळते आहे, तर जलद गाडी किती जलद जात असेल!! आणि जेंव्हा धिमी गाडी जलद गाडीला मागे पाडून पुढे जाताना दिसे तेंव्हा हा काय प्रकार आहे! या विचाराने डोकं सुन्न होई. आता त्या विचारांचं पण हसू वाटतं! मुंबई सोडली आणि ट्रेनशी संबंध जवळपास तुटलाच. पण त्याच दुःख नाही. सुट्टीत मामाकडे जायचं म्हणून ट्रेन पकडायचा आनंद होता. पण निवृत्त होईपर्यंत सकाळ संध्याकाळ त्या खिडकीच्या मागे धावणं जमणार नाही, हे जाणून होतो. वेळ त्याच्या गतीने धावत राहिला आणि त्याच्यासोबत नवीन दिशांना घेऊन गेला.
२०१० सालात पहिला विमान प्रवास घडला. तेंव्हापासून आजपर्यंत जेंव्हा कधी विमानाच्या खिडकीत बसतो तेंव्हा किती तरी वेळ ढग आणि ढगांचे आकार न्याहाळत बसतो. कोणता ढग कोणत्या प्राण्यासारखा दिसतो, हत्ती दिसतो की कुत्रा दिसतो की डायनासॉर हे विचार अजूनही कुठूनतरी डोकावतात. कधी कधी कापूस पिंजून ठेवावा तसा कापसाच्या अथांग खचाकडे आपण डोळे लावून बसलो आहोत असं वाटतं. कधी खूपच पेंगलो असेन आणि विमानात बसताच क्षणी डुलकी लागलीच, तर आपण वर जाता जाता स्वर्ग तर नाही गाठला, असा विचार करत, अर्धवट झोपेत, किलकिल्या डोळ्यांनी त्या मखमली ढगांकडे बघताना या आजूबाजूला फिरणाऱ्या हवाई सुंदरी आहेत, टोपी घातलेल्या अप्सरा नाही, याची जाणीव व्हायला फार वेळ लागत नाही.(आता तर मास्क पण!) असो! ऊन सावल्यांचा खेळ, ढगांचे आकार, अधून मधून दिसणारे डोंगर, नद्या, कुठे शहरी भागातले लांबसडक वळवळत जाणारे रस्ते आणि त्यावर एवढ्या उंचीवरून न दिसणारी माणसं पाहून आपण किती ठेंगणे आहोत याची जाणीव होते. आकाशात कितीही उंच भरारी घेतली तरी पाय परत जमिनीवर टेकवावेच लागतात.
कालही देहरादून सोडलं तेंव्हा खिडकीकडची जागा पकडून बसलो होतो. तसं तर आता अयांशच वेगळं तिकीट काढणं अनिवार्य आहे. पण त्याच्या उंचीला खिडकीतून बाहेर दिसणं शक्य नाही आणि जो खिडकीत बसेल त्याला अयांशची खुर्ची होणं हे पण तेवढचं अनिवार्य आहे. त्या मऊमऊ खुर्चीचा सोफा करून त्यावर उड्या मारण्याचा आनंद मात्र तो पुरेपूर घेतो. अयांश अजून तसा लहान असल्यामुळे आपण ढगांच्या वर पोहचलो हे बघूनच आनंद मानून नंतर त्याच्या मस्तीत रुळतो. मी मात्र उजेड होता तोपर्यंत अधून मधून खिडकीतून बाहेर बघत होतो. बघता बघता निसर्ग या शब्दाची व्याख्या नक्की काय आहे? आणि त्याची पोहोच नक्की कुठपर्यंत आहे ? असाही एक भाबडा प्रश्न डोकावून गेला. ढगांच्या अशा वेड्या वाकड्या त्रिमितीय आकृत्या करून बघणाऱ्याला निसर्ग म्हणायचं की आणि काय ? खरं तर याच्या मागच्या कर्त्याला या क्रियांच काही घेण देण नसतं. मृगजळाच्या मागे धावाव तसं आपण निरर्थक गोष्टींचा अर्थ शोधत बसतो. प्रवास संपत आला, विमान खाली उतरू लागलं. एवढा वेळ कापसासारखे वाटणारे शांत मऊ ढग आता मध्येच छातीत धडकी भरेपर्यंत विमान धडधडवून सोडत होते. लांबून ताऱ्यांसारखे लुकलुकणारे दिवे आता धावपट्टीवर उतरायला खुणावू लागले. नुकतीच स्थिर स्थावर झालेली तर काही परत झेप घ्यायला सज्ज झालेली विमान समोर दिसू लागली. हुश्श ! म्हणून ती खिडकी सोडून उठलो! सुखरूप पोहचलो म्हणून मनातल्या मनात 'त्याला' धन्यवाद दिले आणि नव्या एका खिडकीकडे कूच केले.
Comments