top of page
Writer's pictureNayanesh Gupte

बाबा लहान होतो तेंव्हा!

परवा अयांशची शाळा सुरू झाली. शाळा सुरू होणार म्हणजे पाठीवरचं दप्तर आणि त्यातला खाऊचा डबा या दोन गोष्टींची कायम खूप ओढ असायची. नवीन इयत्ते बरोबर नवीन दप्तर असायला हवं असा अट्टाहास असायचा आणि डब्यात काय खाऊ दिला असेल आईने याची चुटपुट लागलेली असायची. अयांश एवढ्या मुलांना दप्तर डबा एवढी आवश्यकता नसली तरी शाळेची गंमत अनुभवता यावी म्हणून दप्तर आणि डबा घ्यावा म्हणून आकांक्षा त्याला दुकानात घेऊन गेली खरी आणि मग तिथून वेगळीच गंमत जंमत सुरू झाली.


आजकाल ई-कॉमर्स ॲप्समुळे दुकानात जाऊन खरेदी करणं हा प्रकार तितकासा होत नाही. त्यामुळे अयांशची दुकानात जायची तशी फार वेळी आली नव्हती पण लहान मुलं ती लहान मुलंचं! त्यांना हट्ट करण्यासाठी शिकवावं लागतं नाही. साहेबांची नजर दुकानातील खेळण्यांवर पडली. खेळण्यातल्या गाड्या दिसल्या की त्याचे टपोरे डोळे गाड्यांवर भिरभिरायला लागतात. अलिबाबाला गुहा सापडावी तसचं काहीसं. कोणती गाडी घेऊन खेळू आणि कोणती नाही! आणि नवीन गाडी हातात आली की फक्त दिवसभरच नाही तर रात्री झोपताना डोळा लागेपर्यंत ती घेऊन खेळत बसायचं!

सगळीकडे नजर टाकून शेवटी त्याची नजर एका गाडीवर खिळलीच. हट्ट म्हणजे एवढा की "नाही" सांगून त्याला उचलून नेण्याशिवाय शेवटचा कोणताही पर्याय हातात रहात नाही. कारण तिथेच ठाण मांडून बसणं, अगदी अंग सोडून देऊन तिथेच लोळण घेणं अशा सगळ्या क्लृप्त्या त्याच्या वापरून होतात. बरं नाही का म्हणावं? शक्यतो "नाही" म्हणत नाही पण "नाही" ऐकायची सवय हवी! वेळ येईपर्यंत थांबायची तयारी हवी! पण शेवटी पठ्ठ्याने आईला गळी उतरवलचं!

लोकं म्हणतात की आपल्या आई वडिलांचे आपल्यावर अनंत उपकार असतात. पण कधी कधी आपल्या मुलांकडे बघून उलटा प्रश्न पडतो. आपण या कार्ट्याला गेल्या जन्मात नक्कीच त्रास दिला असावा. आता त्याचे पांग फेडतो आहे! बरं! हे लिहिण्यामागे अजून तरी माझी या बाबतीत तक्रार आहे अशातला भाग नाही. कारण, एक एक काळ होता जेंव्हा त्याचा बाबा अगदी हेच करत होता!!! आणि त्याच्या (अयांशच्या) आजी आजोबांना जेरीस आणत होता. त्याचीच आठवण झाली. मी केलेले बहुतांश हट्ट अजूनही लक्षात आहेत. त्यामुळे त्याच्या हट्टांच विशेष वाटत नाही. उलट त्याचे हट्ट सांभाळता सांभाळता मनातून खूप हसू येतं आणि "जाऊदे रे! घेऊन टाक!!" म्हणून मन पाघळतं! कर्म त्याचा हिशोब चुकता करतं!


गाडी एकच घेतली तरी खालील दोन गाड्यांचा फोटो एवढ्यासाठी की एक त्याची आणि एक माझी. रेसिंग तर झालीच पाहिजे !


12 views0 comments

Recent Posts

See All

Comentarios


bottom of page