आज पासून बरोब्बर ७ महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा भगवद्गीता वाचायला घेतली. पण यावेळी रोज ४ ते ५ श्लोकांचेच अध्ययन करायचे असा संकल्प सोडला होता. त्याचबरोबर रोज ज्या श्लोकांचे अध्ययन करत होतो ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करण्याचे पण ठरवले होते. उद्देश एवढाच होता की, १८ अध्याय, ७०० श्लोक आणि ६०० हून अधिक पानं असलेली भगवद्गीता वाचून त्याचे अध्ययन करणं ही सोपी गोष्ट नाही असं खूप जणांचं मत असले, तरी पण रोज थोडा थोडा प्रयत्न केल्यास ६-७ महिन्यांच्या कालावधीत का होईना पण संपूर्ण भगवद्गीता आयुष्यात किमान एकदा तरी वाचून होणं नक्कीच शक्य आहे हे पटवून देणे. श्रीकृष्णाच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने त्यानेच आज तो संकल्प पूर्ण करून घेतला.
पुढची एकादशी ही १४ डिसेंबर रोजी असून ती "मोक्षदा एकादशी" / "मौनी एकादशी" आणि "गीता जयंती" म्हणून ओळखली जाते. याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता समजावून सांगितली. गेल्या वर्षी साधारण याच वेळी जेंव्हा पहिल्यांदाच भगवद्गीता वाचायची संधी श्रीकृष्णाने दिली होती होती तेंव्हा या एका वाचनानेच आयुष्याला कलाटणी मिळाली. तेंव्हा श्रीकृष्णाने साधारण १५-२० दिवसांत हे अध्ययन पूर्ण करून घेतले होते. आता दुसऱ्यांदा वाचायची संधी मिळाली तेंव्हा ती अजून उलगडत गेली. येत्या गीता जयंतीच्या दिवशी पुन्हा एकदा भगवद्गीतेचे अध्ययन करण्यास घेणार आहे. तेंव्हा ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकास मी आवाहन करू ईच्छितो की तुम्ही देखील श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याने तुम्हाला भगवद्गीतेच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे अशी विनंती करावी आणि भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न करावा.
हरे कृष्ण 🙏🏽
Comments