भगवद्गीता हे भगवद विज्ञान आहे. अध्यात्म हे शास्त्र आहे. इतर शास्त्रात जसे पारंगत होण्यासाठी अभ्यास करावा लागतो तसेच अध्यात्माचे धडे घेऊन अध्यात्म या शास्त्राचा पण अभ्यास करावा लागतो. वरवरच्या बाता मारून त्यातला गूढ अर्थ जाणून घेता येत नाही. म्हणून भगवद्गीता सांगताना सुद्धा योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात "मी तुला गुह्याहून गुह्य असे ज्ञान सांगत आहे!". कित्येक विद्वानांनी त्यावर चर्चा करून त्यावर ग्रंथ लिहिले आहेत. त्यातील काही विद्वान ज्यांचे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात पण योगदान होते ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ज्यांनी मंडालयच्या तुरुंगात "गीता रहस्य" लिहिले. लिहिले म्हणा किंवा त्यांच्याकडून लिहून घेतले गेले म्हणा. विनोबा भावे यांनी "गीताई" लिहिली, महात्मा गांधी यांनी "अनासक्ती योग" लिहिला, स्वामी विवेकानंद यांनी "कर्म योग", "राज योग", "भक्ती योग", इत्यादी स्वतंत्र ग्रंथ लिहिले.
असाच एक क्षुल्लक वादाचा मुद्दा जो तर्क शास्त्राचे पुरस्कर्ते उठवतात तो म्हणजे भर रणांगणावर दोन सैन्यांच्या मधोमध जाऊन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता कशी काय सांगितली ? आपल्या योग सामर्थ्याने प्राप्त झालेल्या सिद्धींच्या बळावर कितीतरी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवणारे ऋषीमुनी होऊन गेले आणि आताही असे कित्येक योगी पहावयास मिळतात. मग असे असताना या सर्व योग्यांचा ईश्वर आणि काळाचा अधिपती - योगेश्वर श्रीकृष्णाला काळ आणि वेळ यांचा खेळ करून ही भगवद्गीता समजावून सांगणं काही विशेष गोष्ट नव्हती.
खालील छायाचित्र हे इंटरनेट वर प्रसिद्ध झालेले "सापेक्षतावाद म्हणजे काय?" याचे प्रत्यंतर देणारे खरेखुरे छायाचित्र आहे. यात कुठेही दोन फोटो जोडून केलेलं एडिटिंग नाही. इतरांसाठी पळणारा काळ अर्जूनासाठी का स्थिर असावा याचे छोटेसे उदाहरण!
अर्थात हा गहन विषय आहे. माझ्या बुध्दीच्या पलिकडचा! पण पहाटे नामस्मरण करताना या छायाचित्रासह हे सगळं अचानक का डोक्यात आलं ते त्या श्रीकृष्णालाच माहित.
Comments