आपल्याकडे "भटक भवानी" नावाचा अत्यंत विचित्र शब्द आहे. तो कोणत्या संदर्भात वापरला जातो या खोलात सध्या तरी माझी जायची इच्छा नाही पण भवानी मातेने आम्हाला मात्र छान भटकवले!
हो छानच म्हणाव लागेल! का ते सांगतो. तर ऐका (वाचा)...
कुंजापूरी हे ५२ शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ. दक्ष राजाच्या यज्ञात आपले पती भगवान शंकरांचा अपमान सहन न झाल्याने, सती ( दाक्षायणी - दक्ष राजाची कन्या) मातेने जेंव्हा स्वतःला दहन करून घेतले, त्यानंतर तिच्या त्या मृतदेहाचे श्रीहरींनी सुदर्शन चक्राने ५२ तुकडे केले आणि ते सर्वत्र विखुरले. हे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठ तयार झाले. याच तुकड्यांपैकी तिच्या छातीचा भाग जिथे पडला ते स्थान म्हणजे हे कुंजापूरी शक्तीपीठ. या शक्तिपीठाशी आमचा परिचय पण सखाराम आठवले काकांकडूनच झाला.
ऋषीकेशच्या दौऱ्यात हे स्थान पण भेट द्यायचे आहे असे आम्ही निश्चित करून, देहरादून येथील माझ्या सासुरवाडीतून आम्ही सकाळी घर सोडले, तेंव्हा पहिली भेट इथेच द्यायची या उद्देशाने. देहरादूनहून नरेंद्र नगरच्या दिशेने (तुमच्या डोक्यात जो नरेंद्र आला त्यांच्याशी या गावचा काही संबंध नाही.) घाट चढून आम्ही मूळ कुंजापूरी देवस्थान मागे सोडून किमान ४० एक किलोमीटर तरी पुढे गेलो असू. सगळी गूगल मॅपची कृपा. पण विनोदाचा मुद्दा (जो आमच्यावर झाला) वगळता, ती भवानी माताच आम्हाला भटकवत होती असा काहीसा प्रसंग होता.
माणसाने डोंगर पोखरून कितीही कठीण जागेतून रस्ते बांधले असले तरी त्यांचा टिकाव निसर्ग साथ देतो तोपर्यंतच आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणात डोंगर पोखरून बांधलेले रस्ते त्या निसर्गाला आणि तिचे नियमन करणाऱ्या त्या "शक्तीला" फार काही रुचले नसावेत. जागोजागी दरड कोसळली होती. रस्ते खचले होते. काही ठिकाणी भला मोठा रस्त्याचा भाग खचून पुन्हा एकदा त्या डोंगरांच्या मातीशी पूर्णतः एकरूप होऊन गेलेला. इतका!! की, इथे रस्ता होता!? हे मान्य करणं पण कठीण! त्या रस्त्याने प्रवास करताना जर तुमच्या गाडीवर दरड कोसळली नाही म्हणजे तुमची "वेळ" अजून आली नाही एवढी भयाण अवस्था. पण तरीही आम्हाला त्यातून जे दिसत होत ते त्या डोंगर दर्यांमधलं सौंदर्य. दरड कोसळून आपलं काही बर वाईट होऊ शकतं असा विचार सुद्धा आसपास फिरकला नाही. सासूबाई तर स्वामींना सोबत घेऊनच लांबचा प्रवास करतात. भीतीने नाही तर कुतज्ञते पोटी!
त्या रस्त्याने दरड कोसळलेली ठिकाणं मागे सोडत डोंगरावर वर वर जात होतो. रस्ता निमुळता होत होता. आता एका विशिष्ट उंचीनंतर दिसणारे पाइन वृक्ष दिसू लागले होते. निसर्गाची प्रगल्भता वर्णन करावी तितकी कमीच. मध्ये मध्ये गोडया निर्मळ पाण्याचे झरे वाहत होते. कुठे कुठे त्यांच्या बाजूला हौद बांधून पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. शहरातल्या "वॉटर फिल्टर" च्या पाण्याला त्या गोड पाण्याची सर येणं कधी शक्यच नाही. मजल दरमजल करत आम्ही एका दुसऱ्याच कुंजापूरी देवस्थानी पोहचलो. अपेक्षित जागी पोहचलो नसलो तरी ते सुद्धा तिचंच मंदिर. डोक टेकवलं. तिथल्या ग्रामस्थांनी सरळ रेषेत दिसणारे ३ डोंगर पलीकडे असणारे मूळ "कुंजापूरी" शक्तीपीठ दाखवले. छान लाँग ड्राईव्ह आणि रोडट्रीप झाली अस म्हणून आम्ही यावेळी मूळ शक्तीपीठाकडे कूच केले.
ढगांच्या आणि धुक्याच्या पांढऱ्या शुभ्र मखमली रजईच्या वरती बसली होती ती कुंजापूरी माय. गाडी जाऊ शकते तिथपर्यंत नेली आणि पुढच्या ३०० पायऱ्या अयांशला कडेवर घेऊन धापा टाकत चढलो. तिच्या दारातल्या घंटेचा मोठा घंटानाद करून तिला म्हटलं "पोहचलो गं माय! लई भटकवलस बघं!"
गाभाऱ्याची दार उघडली. त्या शक्तिसमोर आम्ही नतमस्तक झालो. ओटी भरली, मंत्रांचं पठण झालं. आकांक्षाला स्वामींनी मी "इथेपण" आहे, "तुझ्या पाठीशी आहे" म्हणून जाणीव करून दिली. स्वामींच्या "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" यामागे दडलेला एक अर्थ असा की, आपल्या पाठीतल्या मेरुदंडात आपल्या शरीरातील षटचक्रांचे स्थान आहे आणि त्याचा कुंडलिनी शक्तीची घनिष्ठ संबंध आहे. स्वामींनी कित्येकांची कुंडलिनी जागृत करून त्यांच्या समक्ष त्या भक्तांची समाधी अवस्था घडवून आणली होती.
त्या पवित्र स्थानीं तिथल्या ऊर्जेचा आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही काही क्षण घालवले आणि चहाच्या भुरक्या घेऊन ऋषीकेशला प्रस्थान केले....
श्री स्वामी समर्थ 🙏