top of page
Writer's pictureNayanesh Gupte

भोग नंदिश्र्वर मंदिर

गेले काही दिवस उज्जैनच्या महाकालेश्वरचा नंदी सारखा दिसत होता. काहीतरी सांगत होता. पूजा करताना "काय नंदिश्र्वर महाशय!" असं त्याला खूप वेळा हाक मारली आहे पण त्याने कधी ओ दिली नव्हती पण गेले काही दिवस त्याच बोलणं जाणवत होतं. काहीतरी खुणावत होत.

साधारण ९व्या - १०व्या शतकात बांधलेलं हे शिव मंदिर. आमच्या घरापासून साधारण ६७ किमी अंतरावर "नंदी हिल्स" च्या पायथ्याशी वसलेले.

आज अचानक जाण्याचा योग आला. सकाळची न्याहारी आटोपून दुपारी १ वाजेपर्यंत मंदिरात पोहोचलो. ढगांनी सूर्याला व्यापून आमच्या डोक्यावर छत्री धरली होती. भर दुपारची वेळ असली तरी उन्ह बोचत नव्हतं. ढगा आडून येणारे ते कवडसे हवेहवेसे वाटतात होते. आज महिन्याभरानंतर घराबाहेर पडलो होतो. बोलक्या निसर्गाशी परत जोडली गेलेली नाळ खूप सुखावत होती.

मंदिरात अगदी तुरळक गर्दी बघून आम्ही निःश्वास सोडला. आत शिरताच नक्की कुठून गाभाऱ्यात प्रवेश करायचा आहे ते शोधतच होतो इतक्यात एक वयस्कर व्यक्ती आम्हाला त्याच्यासोबत मंदिरातील सर्व गाभाऱ्यांत क्रमा क्रमाने घेऊन गेली. तिथली सर्व माहिती तोडक्या मोडक्या हिंदी - कन्नड भाषेत सांगून मग तो बाहेर निघून गेला. पैश्याची अपेक्षा त्याला होती की नाही सांगणं कठीण आहे. कारण आम्हाला सोडून नंतर त्याने कोणाला तशी माहिती सांगितली नाही. शांत जाऊन मंदिराच्या कार्यालयात जाऊन बसला. तरी मी त्याच्या हातात काही पैसे टेकवलेच. काही न बोलता त्याने ते शांतपणे घेतले. कोविड नसता तर महाप्रसाद मिळाला असता असं समोरच्या सभागृहाकडे बोट दाखवत म्हणाला.

एकंदर प्रत्येक गाभाऱ्यात साष्टांग दंडवत घालता आला आणि मनसोक्त दर्शन घेता आले यामुळे आम्ही समाधानाने परतलो. विशेष म्हणजे असे गाभाऱ्यात प्रवेश करायला मिळणारे आम्हीच होतो. बाकी सर्व जण बाहेरूनच हात जोडून पुढे सरकत होते.


एव्हना २ वाजून गेले होते. भूकेने पोटात कावळे ओरडू लागले होते. एवढा वेळ रस्त्याला दिसणारे धाबे अचानक बंद झाले. हैद्राबादच्या दिशेने जाणारा लांबच्या लांब रस्ता आम्ही झपाझप मागे टाकत होतो. मनात विचार आला "महाराज किमान डोसा तरी खायला मिळावा!". इतक्यात एका पेट्रोल पंपाजवळ एक छान, स्वच्छ 'फूड मॉल' दिसला. गाडी वळवून तिथे लावली, गाडीतून बाहेर पाय टाकला तसा "ओम जय जगदीश हरे"चे मधुर स्वर कानावर पडले. आतमध्ये खरंच छान डोसा सुद्धा खायला मिळाला. मनोमन कृष्णाला धन्यवाद दिले आणि गाडी पुढे रेमटवली

साधारण अजून ३०-३५ किमी पुढे भैरसागर नावाचा तलाव गाठला. त्याच्या नितळ स्तब्ध पाण्यावर आकाशाच प्रतिबिंब आणि ढगा आडून डोकावणारी सूर्यकिरण पाहून रात्रभर चार्जरला राहिलेल्या मोबाईल सारखा एकदम चार्ज झालो. त्या शांत स्तब्ध निसर्गाचं रूप आजमावण्यासाठी भर उन्हाच घरापासून १०० किमी लांब गाठलेला पल्ला सार्थकी लागल्याच जाणवत होतं. कितीवेळ त्या तलावाच्या वेगवेगळा बाजूंना जाऊन तेच तेच दृश्य डोळ्यांत साठवून ठेवत होतो. जेवढं अंतर्मुख होत होतो तेवढा निसर्ग जास्त बोलत होता. पक्षांचे किलबिलाट मंत्रमुग्ध करत होते. सुकलेल्या आणि ओल्या दोन्ही गवताचा सुगंध नाकपुड्या फुलवून साठून ठेवत होतो. भर उन्हात लांब पसरलेल्या त्या अखंड पाषाणावर स्वस्थ बसून राहायची वेगळीच अनामिक ओढ जाणवत होती.

परत गाडीत येऊन बसलो. अभंग वाणी सुरू झाली. कसलीही घाई न करता ४०-५० च्या संथ वेगाने गाडी चालवत परतीची वाट धरली. मनात विचार घोळत होते. परत चार्ज व्हायला लौकरच बाहेर पडायला हवं. निसर्गाचा वेणुनाद खुणावतोय...कृष्ण बासरी वाजवतोय....

श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽

90 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Aishwarya Kamath
Aishwarya Kamath
Jan 31, 2022

Om Namaha Shivaay 🙏☘🌹. May God Bless you with many more spiritual trips and keep us in the loop too.. I'm enjoying the temple visits and beautiful nature through your eyes.🙏🌹.

Like
bottom of page