आपल्यावर खरोखर कोणी अफाट प्रेम करणारं असेल तर तो आहे स्वतः भगवंत. आपण स्वतःला त्याच्या चरणी समर्पित करण्याचं ठरवलं की तो हे प्रेम भरभरून देतो. बँगलोर ते अंबरनाथ त्याने थक्क करून टाकणाऱ्या लीला रचल्या!
१ नोव्हेंबर २०२१, सोमवार आणि रमा एकादशीचा दिवस. आकांक्षा आणि माझा दोघांचा उपास. त्यामुळे सकाळी फक्त चहा घेऊन ७:४५ च्या सुमारास आम्ही दाभोळे येथील स्वामींच्या मठातून सिनकर काकांचा निरोप घेऊन निघालो.
आता वेध लागले होते ते पुण्यातील धनकवडीच्या शंकर महाराजांच्या मठात पोहचायचे. गूगल मॅपवर दाखवल्याप्राणे आम्ही दुपारी १२ च्या सुमारास मठात पोहचू असा अंदाज होता. तिथून पुढे लोणावळा येथील स्वामींच्या मठात आणि पुढे आमची कुलदेवी वाघजाई देवी, खंडाळा इथे भेट देऊन अंबरनाथला घरी सायंकाळी ७-८ वाजेपर्यंत पोहचू अशी "आमची" योजना होती. पण त्या परमेश्वर माऊलीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अर्थात कर्ता करविता भगवंत असतो याची पुन्हा एकदा प्रचिती घ्यायची वेळ आली होती.
साताऱ्यापासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर खंबाटकी बोगद्याच्या ५००-६०० मी. अलीकडे आम्ही पेट्रोल भरण्यासाठी म्हणून थांबलो. तेंव्हा साधारण ११ वाजले होते. पुणे तासभर दूर राहिले होते. पेट्रोल भरून झाल्यावर जरा पाय मोकळे करून तोंडात काहीतरी टाकून पुढे जावे म्हणून गाडी बाजूला घेतली. कोणाच्या मध्ये येऊ नये म्हणून एका बाजूला दगडाच्या समोर जाऊन गाडी लावली. दोन दिवसांपूर्वी परमार्थ निकेतन मध्ये कलावती आईंच्या दरबारी मिळालेले राजगिऱ्याचे लाडू अजून खाल्ले नव्हते. उपास म्हणून आईंनी तेवढी सोय आधीच करून ठेवली होती. तेवढं खाऊन पिऊन होईपर्यंत १०-१५ मिनिटं गेली असावीत. गाडीत बसलो. समोर रस्ता मोकळा दिसत होता. गाडी सुरू केली आणि समोरच्या दगडावर जाऊन छानपैकी आदळली. उतरून पहिली तर बंपरला चांगलाच तडाखा बसला होता. गाडी रेडिएटरचा पाईप तुटल्याने त्यातील कूलंट सगळं झिरपले होते. आम्ही कपाळाला हात लावला. टाटा मोटर्सशी संपर्क साधून गाडी टोव करून जायची व्यवस्था केली. जवळील सर्व्हिस सेंटरला म्हणजे परत ४५ किलोमीटर मागे जाऊन गाडी दुरुस्तीसाठी द्यावी लागणार होती. मध्येच डोक्यात विचार आला की मागे ४५ किलोमीटर जाण्यापेक्षा पुढे ६० किलोमीटर पुण्यात जाऊन दुरुस्त करावी. टोविंग गाडी येईपर्यंत दीड तास सहज निघून गेलेला. पुढे पुण्यात वाकड येथील सर्व्हिस सेंटरला जाईपर्यंत अजून तीन एक तास गेले. त्यांनी गाडीची अवस्था पाहून गाडी दिवाळी नंतर मिळेल असं सांगून मोकळे झाले. जेंव्हा त्यांना मी सांगीतल की मी बँगलोरहून येत आहे आणि मुंबईला चाललो आहे आणि तुम्ही गाडी जेंव्हा परत द्यायची गोष्ट करत आहात तोपर्यंत कदाचित मला परत बँगलोरला पोहचणं आवश्यक आहे तेंव्हा त्या सगळ्यांनी एकमेकांची तोंडं पहायला सुरुवात केली. ताबडतोब गाडी उघडुन दुरुस्ती सुरू झाली. साधारण ६:३० पर्यंत गाडी हातात मिळेल की नाही हे कळणार होते. शंकर महाराजांचे दर्शन राहिले होते. ते घेऊनच पुढे जायचे म्हणून त्या रात्रीचा मुक्काम पुण्यातच करण्याचा निर्णय झाला. "योगायोगाने" टाटाचे सर्व्हिस सेंटर सयाजी हॉटेलच्या अगदी मागेच असल्यामुळे टाटा मोटर्सने आम्हाला तिथपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली. आमच्या सामानाने तुडुंब भरलेली आमची गाडी तिथेच सोडून सामान घेऊन आम्ही हॉटेल सयाजी मध्ये जाऊन पहुडलो. डोक्यात चक्र चालूच होती. वैशाली ताई आणि गौरी ताईशी संपर्क झाला. "योगायोगाने" दोघीही कोथरूडमध्ये एकमेकांपासून १० मिनिटांच्या अंतरावर राहतात. वैशाली ताईकडे जाऊन तिच्या घरी असलेल्या गोंडस अशा श्रीपाद प्रभूंच्या मूर्तीचं (किंवा त्यांचंच म्हणा ना) दर्शन घ्यायची मनापासून इच्छा होत होती. गाडी आज मिळणार नाही हे कुठेतरी आधीच जाणवलं होतं आणि तसच झालं. ७:३० पर्यंत आम्ही वैशाली ताईच्या घरी पोहचलो. थोड्या वेळात गौरी ताई पण पोहचली. श्रीपाद प्रभूंच्या मनमोहक छबीच दर्शन झालं. छान गप्पा रंगल्या. यात कुठेही आम्ही सर्व स्वामीभक्त पहिल्यांदा भेटत आहोत याची जाणीव नव्हती. शरीर बदलली असतील पण या आत्म्याने त्या आत्म्याला ओळखले होते. श्रीपाद प्रभू आणि स्वामींच्या लीलांचा गोडवा गाताना वेळ कधी जातो कळतच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गाडी मिळाली तर मिळाली अशी परिस्थिती असल्यामुळे आम्ही गाडी मागेच सोडून पुढे अंबरनाथला जायची सोय आदल्या दिवशीच करून झोपी गेलो. सकाळी हॉटेल सोडायचे आणि शंकर महराजांच्या समाधीस्थानी जायचे ठरले. आम्हाला अशा कित्येक प्रसंगी देवस्थानं फिरविणारे वेदक दादा अंबरनाथहून गाडी घेऊन सकाळी ७ वाजता हॉटेल सयाजी मध्ये हजर झाले होते. हॉटेल सोडलं. ८ वाजेपर्यंत आम्ही शंकर महाराजांच्या मठात दाखल झालो. पावलं त्यांच्या समाधीच्या दिशेने पडत होती. कदाचित पहिल्यांदा होती. कदाचित यापूर्वी सुद्धा ती वाट धरली होती. कंठ दाटून आला. कारण सांगू शकतं नाही कारण आम्हालाही ते माहीत नाही. गुरू द्वादशी आणि धनत्रयोदशी एका दिवशी आली होती. महाराजांसमोर डोकं टेकवल. काही कळत नव्हत काय चाललंय. मनात एक प्रश्न थैमान घालत होता. "महाराज आम्हाला सोडून का गेलात ?" कितीतरी वेळ तिथेच घुटमळत त्यांच्याकडे पाहत होतो. थोड्या वेळाने पावलं पुढे पडली. काही पुस्तक घ्यावी आणि अन्नदान करावं म्हणून तिथल्या स्टॉलवर गेलो. व्यवहार आटोपला आणि कार्ड परत घेताना तिथला चारमिनार सिगारेटच्या पाकिटावर नजर पडली. महाराज सोबत असल्याची जाणीव होत होती. मागे वळलो तर खिचडीचा प्रसाद वाटप होत होता. एका बाजूला भजन करणाऱ्यांची मांदियाळी जमली होती. सुश्राव्य भजनाचा आणि खिचडीचा आस्वाद घेत आम्ही तिथेच थोडा वेळ काढला.
निघालो तोपर्यंत ९:३० वाजले होते. वेळ कसा पळत होता कळतच नव्हत. सर्व्हिस सेंटरला जाऊन गाडीतून उरले सुटलेले सामान घेऊन पुढे जावं ठरलं. वेदक दादा आम्हाला नेहमीच फिरवत आले आहेत त्यामुळे यावेळी सुद्धा जाताना नेहमीच्या देवस्थानांना भेट द्यायची इच्छा व्यक्त केली. पुरेसा वेळ हातात असल्याने या सर्व ठिकाणी भेट देणं सहज शक्य होतं. पण तरीही कुलस्वामिनी एकवीरा आई आणि कुलदैवत बापूजी बुवा "आमच्या" नियोजनात पकडलं नव्हतं. एकवीरा आई कार्ल्याच्या डोंगरावर वसली आहे. त्यामुळे भर दुपारी तिथे १००-१५० जिने चढून जाण जमेल की नाही आणि तिथे ऐनवेळी पार्किंग मिळेल की नाही हा विचार करून आम्ही या खेपेस एकवीरा आईच्या दर्शनास जाणं "जमणार नाही" हेच पकडून आम्ही चाललो होती आणि तीच गोष्ट मी वेदक दादांना बोलून दाखवली. त्यांनी सुद्धा आधी सहमती दर्शविली. थोडा वेळ गेला. मी सावरसई,पेण येथील आमचे कुलदैवत श्री बापूजी बुवा येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. वेदक दादांनी तिथेही जायची तयारी दाखवली. त्यानंतर काय नक्की झालं माहिती नाही पण वेदक दादा आम्हाला स्वतःहून म्हणाले की - "आता इथपर्यंत आला आहात, तर एकवीरा देवीला जाऊनच या! आज मंगळवार आहे. (देवीचा वार). पार्किंग मिळेल. होईल हे दर्शन." ही गोष्ट त्यांनी एक - दोन वेळा बोलून दाखवली. आता मात्र मला एकवीरा आईला न भेटता पुढे जाणं काही उचीत वाटलं नाही. तेवढ्यात आम्ही सर्व्हिस सेंटरला पोहचलो. तेंव्हा समोर आमची गाडी धुवून पुसून तयार होत असलेली दिसली. गाडी आत्ताच मिळणार या आनंदात आम्ही नाचायचेच बाकी होतो. कारण पुढच्या बऱ्याच योजना त्यावर अवलंबून होत्या. वेदक दादांचं काम आता झालं होतं. त्यांना निमित्त करून आम्हाला आता पाहिले कुठे जायचं आहे हे ठरवून दिलेलं होतं.
वेदक दादांना मोकळं करून आम्ही गाडी घेऊन थेट एकवीरा आईचा डोंगर गाठला. गाडी गडावर चढवली. कोणताही विलंब न लावता आमच्या गाडीच्या पार्किंगची सोय झाली होती. दुपारचे १२ वाजले होते. सूर्य माथ्यावर तळपत होता. आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. पहिल्या ८-१० पायऱ्या अयांश माझ्यासोबत चढला. नंतर त्याने माझ्यासमोर हात वर केले. त्याला कडेवर उचलून गड चढत होतो. मध्ये मध्ये दम घेत आम्ही एकवीरा आईच्या चरणी पोहचलो. गडावर गर्दी तशी पुष्कळ दिसत होती पण प्रत्यक्ष रांगेत आम्हाला १०-१५ मिनिटांच्या पलीकडे वेळ लागला नसावा. मनसोक्त दर्शन झालं. डोळे भरून दर्शन घेतलं. प्रसाद घेऊन बाहेर पडलो. झपाझप गड उतरायला सुरुवात केली. अजूनही अयांश कडेवरच होता. वाटेत २-३ पेले भरून उसाचा रस रचवला. आता एकदम तरतरी आली होती.
गाडी काढली. पुढच्या २० मिनिटांत आम्ही स्वामींच्या मठात पोहचलो. तिथे २ स्थानं आहेत. पहिल्या ठिकाणी आम्हाला स्वामींच्या दर्शनासोबत श्रीपाद प्रभूंचे पण दर्शन झाले. त्याच दिवशी त्यांनी कुरवपूर येथे अवतार समाप्ती केली होती. तिथे ध्यानकेंद्र आहे. त्या ध्यानकेंद्रात शिरलो तेंव्हा स्वामींची प्रतिमा सोडून अजून कोणीही नव्हत. स्वामींसमोर बसून थोड्यावेळ नामस्मरण केलं. तिथल्या काही वयस्कर मंडळींसह गप्पा मारून आम्ही पुढील गल्लीत प. पू. मुकुंद (नाना) करंदीकर यांनी बांधून घेतलेल्या स्वामींच्या मठात जाऊन आलो. डोळ्याचं पारणं फिटंणारी स्वामींची मूर्ती पाहून आम्ही थक्क झालो. मुखात अखंड श्री स्वामी समर्थ जप चालूच होता.
तिथून बाहेर पडलो तेंव्हा साधारण ३ वाजत आले होते. जेवण बाकी होतं. कोकणात जाताना जागोजागी "जेवण तयार आहे" अशा पाट्या पाहायला मिळतात. आम्ही दाभोळे गावी जाताना अशा पाट्या दिसल्या होत्या तेंव्हा मी आकांक्षाला प्रश्न विचारला होता - "ही पाटी पाहून तुला डोळ्यासमोर काय येत?" माझं उत्तर ताबडतोब मनात तयार होतं - "पिठलं भाकरी" आणि दुसऱ्या क्षणाला आकांक्षा म्हणाली "पिठलं भाकरी"! आम्ही नवरा बायको असे आज एकाच गोष्टीवर सहमत आहोत पाहून खदखदून हसलो ! पण प्रत्यक्षात पिठलं भाकरी काही तेंव्हा आमच्या नशिबात आली नव्हती. स्वामी सगळं ऐकत असतात. हट्ट, लाड पुरवत असतात. लोणावळ्याच्या मठातून निघून थोड अंतर गाठलं आणि एका छान मचाणं सदृश्य हॉटेल समोर बाहेरच बसून एक आजीबाई भाकऱ्या थापत होती. आम्ही गाडी तिथेच लावली. मचाणावर जाऊन बसलो. पिठलं भाकरी मागवली आणि मनसोक्त खाल्ली. शरीर,आत्मा सगळं काही तृप्त!
पुढे २० मिनिटांत आम्ही वाघजाई देवी मंदिरात पोहचलो. तोपर्यंत अयांश झोपी गेलेला. आम्ही एक एक करून दर्शन घेऊन यायचं ठरवलं. जणू काही आमचा इंटरव्ह्यू. एकावेळी एकालाच आत प्रवेश. कारण मी गाभाऱ्यात प्रवेश केला तेंव्हा न मंदिरात कोणी होतं न गाभाऱ्यात. तिला नमस्कार करून तिच्या समोर थोडा वेळ तिचं रूप न्याहाळत बसलो. जणू काही तिच्या डोळ्यातून करुणा ओसंडून वाहत होती. शांत वाटलं. "माई, येतो ग!" म्हणून बाहेर पडलो. (तिला मी माई म्हणतो)
पुढचं आणि या खेपेतलं शेवटचं देवस्थान बाकी होतं ते म्हणजे बापूजी बुवा. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी शांततेत ते तिथे कधीपासून कालिका माता आणि काही रुद्रगणांसोबत ध्यानस्थ बसले आहेत. दर्शन घेऊन आम्ही साधारण ८ वाजेपर्यंत अंबरनाथ येथील आमच्या निवासस्थानी पोहचलो.
डोक्यात अजूनही चक्र फिरत आहेत की चक्रधारी भगवंताने कशी काय चक्र फिरवली, त्याची त्यालाच माहीत! आम्ही फक्त कथपुतळ्याच्या बाहुल्यांसारखे त्याच्या तालावर नाचत राहिलो, बागडत राहिलो. धन्य तुझ्या लीला!!
वरवर बघता गाडी ठोकली याचं वाईट वाटायला हवं. पण राजगिऱ्याचे लाडू सोबत देणं, गुरू द्वादशी / धनत्रयोदशीच्या दिवशी दर्शन देणं, खिचडी खाऊ घालणं, मंगळवारी गडावर दर्शनाला बोलावून घेणं, या सगळ्यात अयांशला उचलून न हात दुखले न गड चढून पाय. त्या आदिशक्तीने स्वतःच आवश्यक तेवढं बळ देवू केलं होतं. मला न भेटता जाऊ नकोस म्हणून बोलावून घेतलं होतं. भूक लागली तेंव्हा पिठलं भाकरी खाऊ घातली होती. आणि सगळं आटोपून वेळेत घरी सुखरूप पोहचवल पण होतं. एक माया तुझी गोंधळात टाकणारी आणि एक उदंड प्रेम करणारी.
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Chhan lihita tumhi.
Tumchi shraddha afat aahe.
Shekhar Kulkarni