आज तो अजानुबाहू परमात्मा पुनः एकदा सदेह रूपात अवतीर्ण झाला. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे कोण? याच उदाहरण म्हणून कधी कधी श्रीकृष्णापेक्षा श्रीरामच जास्त जवळचे वाटतात. कारण श्रीकृष्ण आणि त्याची निती अजूनही एक सामान्य व्यक्ती म्हणून आकलन व्हायला कठीण जाते. कृष्ण समजून घ्यावा आणि राम आचरणात आणावा अस म्हणतात. त्याला कारणही तशीच आहेत. रामाने सर्व काही मर्यादेत राहून आपलं आचरण कसं असावं हे स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं, तर कृष्णाने वेळ आली तेंव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या आणि आपणच पुरुषोत्तम असल्याचे दाखवून दिले. कृष्णाचा जन्म भर मध्यरात्री तर रामाचा मध्यान्ही. सगळाच विरोधाभास. सगळी उहापोह त्याने गीतेमध्ये दिलेलं "यदा यदा हि धर्मस्य..." वचन पूर्ण करण्यासाठी.
यावर अलीकडे वाचनात आलेल्या दैवज्ञ श्री सूर्य कवि विरचित रामकृष्णविलोमकाव्यम् मधील हे पहिले कडव. पहिली ओळ ही प्रभू श्रीरामांची स्तुती तर दुसरी ओळ श्रीकृष्णाची. पहिली ओळ उलट बाजूने वाचली की दुसरी ओळ तयार होते.
तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्री:।
धरणी पुत्री (सीता माईची) सुटका करणाऱ्या, गंभीर हास्य असणाऱ्या, भव्य असा अवतार असणाऱ्या, व ज्याच्यापासून सर्वत्र दया व शोभा प्राप्त होतात अशाला(त्या प्रभू रामचंद्रांना) मी वंदन करतो.
श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम्॥
भव्यप्रभा असणारा, सूर्य चंद्र यांनाही त्यांचे तेज ज्याच्यापासून लाभते अशा त्याला, संहार करणाऱ्या (पूतने)लाही मुक्ति देणाऱ्याला, आणि, सृष्टीतले प्राणभूत तत्त्व असणाऱ्या त्या यदुनंदनाला (श्रीकृष्णाला) मी वंदन करतो.
पण सामान्य व्यक्ती म्हणून ज्याला आई वडील, भाऊ-बहिण, एक पत्नी आहे अशा कोणासाठीही प्रभू श्रीराम एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून कायम समोर उभे राहतात.
प्रारब्ध कोणाला चुकलं आहे? म्हणून परिस्थितीला दोष न देता 'आलिया भोगासी असावे' सादर म्हणून प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोरे कस जावं सांगतात ते श्रीराम. आई वडिलांचा, बंधूंचा, प्रजेचा विरह सहन करतात, वडिलांच्या दिलेल्या वचनाला वचनबद्ध राहतात, वनवासात सगळं ऐश्वर्य मागे सोडून एका वनवासी प्रमाणे राहतात. संसारात राहूनही केवढं ते वैराग्य!
पत्नीच्या प्रेमाखातर मृगया करायला बाहेर तर पडतात पण संसारी मनुष्याला समोर दिसणारी प्रलोभन कशी फसवी असतात हे दाखवून देतात. कारण ज्या सुवर्णमृगच्या मागे निघतात तो निघतो मायावी मरीची जो मरता मरता सुद्धा त्याच्या मायेने लक्ष्मणाला फसवतो पण दयाश्री श्रीरामांच्या हातून त्याचाही उद्धार होतो.
तुम्ही कितीही मोठे असलात तरी समाजात वावरताना तुम्हाला बंधू प्रेम, मित्र प्रेम, सहकाऱ्यांचे प्रेम अशा कित्येक आपुलकीच्या नात्यातून वाहणारा प्रेमयोगच तुम्हाला तुमच्या लक्ष्या पर्यंत नेण्यास मदत करतो. तुमच्या समोर कितीही मोठा प्रश्न, संकट असले तरी या प्रवासात तुम्हाला स्वार्थीपणा बाजूला ठेऊन तुमच्या या आप्तेष्टांची काळजी घ्यावीच लागते. सुग्रीवाची वानरसेना प्रभू श्रीरामांच्या पाठी उभी राहण्याआधी प्रभूंनी सुग्रीवाची त्याचा बंधू वाली पासून सुटका करून त्याला त्याचे राज्य मिळवून दिले. त्याची पत्नी मिळवून दिली.
पण हे सांगताना हे सुद्धा दाखवून देतात की बंधू लक्ष्मणासारखाही असू शकतो आणि वाली सारखाही. फक्त रक्ताचे नात म्हणून नाती कवटाळून बसण्यात तथ्य नाही. रामासारखा मित्र हा वाली सारख्या बंधू पेक्षा कित्येक पटींनी सरस आहे.
कृष्णाच्या बालपणीच्या लीला जेवढ्या प्रसिद्ध झाल्या तेवढ्या श्रीरामांच्या बाललीला ऐकिवात येत नाहीत. पंचवटी ते लंका या मार्गात आपले सीतेला शोधायचे कार्य तूर्तास बाजूला ठेऊन वाटेत जे कोणी पीडित भेटत गेले त्यांचा उद्धार करत पुढे जात राहिले. हेच त्यांचे जीवनकार्य होते जे रामायण म्हणून प्रसिद्ध झाले! त्यातल्या अशा कित्येक कथा आळवाव्यात आणि बोध घ्याव्या! आपल्या शिवाजी राजेंनी सुद्धा आई जिजाऊंकडून राम आणि कृष्णाच्या आचरण आणि नीतीचे धडे घेतले आणि गेल्या सहस्त्र वर्षातले सर्वप्रिय राजे झाले. त्यातली एक आठवणीतली गोष्ट म्हणजे रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’ तसेच अफजलखानाचा वध केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याची कबर बांधली होती आणि मुस्लिम पद्धतीने त्याचा अंत्यसंस्कार केला होता. अशी कित्येक उदाहरणं सापडतील. असे सर्व असताना मग आपण त्या प्रभू श्रीरामांच्या आचरणास आदर्श ठेवण्यात का मागे रहावे?
जेंव्हा जेंव्हा मला वाटत आपली काही चूक होते आहे तेंव्हा एक विचार मला स्पर्शून जातो ते म्हणजे माझ्या कृष्णाला हे काही आवडायचे नाही किंवा आवडले नसावे. तर कधी कधी विवेक ढळतो आणि राम आठवतो! मनात सगळी खळबळ उडते. पण राम कृष्णाचे नाव आठवले त्याचे काय ते समाधान वाटते. पूजेला स्वामींच्या मूर्तीसमोर बसलो की स्वामी म्हणायचे ते आठवते - "मीच राम होतो मीच कृष्ण होतो बरे!" आठवून आठवून चेहऱ्यावर हास्य उमटते!
घरात श्रीरामांची मूर्ती किंवा प्रतिमा नाही पण तरी मुखात येणारे नाव एकच गोष्ट सांगते -
राम से बड़ा राम का नाम!
श्री राम जय राम जय जय राम।
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Comments