"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥४-७॥”
भाषांतर :
जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्या वेळी हे भारता! मी स्वतः अवतीर्ण होतो.
रुख्मिणीच स्वयंवर ठरलं होतं. पण खर तर स्वयंवर म्हणायला तिच्यापुढे स्वतःचा वर निवडण्याचा पर्याय तिचाच स्वतःचा भाऊ रुक्मी याने ठेवलाच नव्हता. कंसाच्या वधाने आणि त्याचा एक दोन नाही तर तब्बल १७ वेळा मथुरेच्या यादवांकडून पराभूत झालेला कंसाचा सासरा मागध सम्राट जरासंधाच्या प्रभावाखाली तो रुख्मिणीच लग्न श्रीकृष्णाचा आत्येभाऊ आणि श्रीकृष्णाला मनोमन शत्रू मानणाऱ्या शिशुपालाशी लावू पाहत होता. रुख्मिणीने मात्र कधीच मनोमन श्रीकृष्णालाच वरलं होतं. तिच्या मनाविरुद्ध होणारं हे लग्न हा अन्याय होता!
रुख्मिणीने तिच्या विश्वासातल्या सुशील नामक पुरोहिताकडून आपल्या मनातल्या भावना श्रीकृष्णा पर्यंत पत्राद्वारे पोहचविल्या. पत्र वाचून श्रीकृष्णाच्या मनातलं जन्मोजन्मीच रुख्मिणीबद्दलच प्रेम आता उफाळू लागलं होतं. तिच्या सौंदर्या इतकंच तीच बुद्धीचातूर्य श्रीकृष्णाच्या मनाला भावल होतं. श्रीकृष्णाला कधीही न भेटता सुद्धा कृष्ण आणि श्रीकृष्ण यातला भेद तिने जाणला होता. तिने हृदयस्थ कृष्ण जाणला होता!
श्रीकृष्णाने लागलीच रुख्मिणीला तिच्या विवाहाच्या दिवशी हरण करून घेऊन द्वारकेला घेऊन यायची सर्व व्यवस्था केली. रुख्मिणीने श्रीकृष्णाला मनोमन वरले असल्याने क्षत्रिय धर्मास अनुसरून हे रुख्मिणी हरण शास्त्रसंमत होतं.
तो दिवस उजाडला! पांढऱ्या शुभ्र अश्र्वांना जुंपलेला गरुडध्वज घेऊन आणि आपला सारथी दारुकाला मागे ठेवून श्रीकृष्ण कौंडिण्यपुराच्या सीमेवर येऊन त्याच्या रुख्मिणीची वाट पाहत सज्ज झाला. रुख्मिणी सर्व लवाजम्यासह त्या सीमेवरच्या अंबिका मातेच दर्शन घेण्यास येणारच होती. मधल्या काळात श्रीकृष्ण सुद्धा त्या मंदिरातील अंबिकेच दर्शन घेऊन परत सोनचाफ्याच्या सावलीत उभ्या त्याच्या रथात येऊन वाट पाहत उभा होता. घोड्यांच्या टापांचा आवाज कानी पडू लागला. वाढत जाणाऱ्या त्या आवाजाच्या सोबत त्याला जोडलेला रुख्मिणीचा उंच रथ आता श्रीकृष्णाच्या दृष्टिक्षेपात येऊन ठेपतो. रुख्मिणीने पत्रात आधीच श्रीकृष्णाला आपल्या हृदयातल्या भावना व्यक्त करताना हे अगदी स्पष्टच सांगितलं असतं की जर तीच लग्न श्रीकृष्णाशी होऊ शकलं नाही तर प्राणत्याग करणे हाच एकमेव मार्ग तिच्यासमोर राहणार आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे याच ठिकाणाहून तिचं हरण करण्यासाठी श्रीकृष्ण आला आहे आणि तो जिथे उभा आहे ती नेमकी जागा रुक्मिणीच्या दृष्टिपथात आणणं आवश्यक होतं. तो आपल्या शेल्यात सांभाळून अडकवलेला पांचजन्य शंख बाहेर काढतो. श्र्वासभरून घेतलेल्या त्या मुखातून, टराटर फुगलेल्या गळ्यातील धमन्यांवर जोर देऊन तो पांचजन्य शंख जोरात फंकतो! रुख्मिणी लागलीच आपला पदर बाजूला सारत तिच्या श्रीहरिच्या गरुडध्वजाकडे नजर टाकते. तिचे मन हर्षाने उल्हसित होऊन तिचे सुंदर मुख आरक्त होऊन जाते. अंबीकेच दर्शन ठरल्याप्रमाणे आटोपते खरे पण लावजमा परतायला निघतो तेंव्हा रुख्मिणी आपल्या काही निवडक सखिंसोबत लवाजम्याला चुकवून कधीच गरुडध्वज गाठते. श्रीकृष्ण आणि रुख्मिणी यांची ती या अवतारातील पहिलीच नजरानजर असते. श्रीकृष्णाचे ते मनमोहक नीलवर्णी रूप पाहून ती अगदी लाजतेच!
पुढे जास्त वेळ न दवडता श्रीकृष्ण स्वतः तो रथ हाकत द्वारकेच्या दिशेने प्रयाण करतात. इथे रुख्मिणीचा भाऊ रुक्मी मद्य प्यायलेल्या सांडासारखा चवताळतो. रागाने लालबुंद होऊन तो श्रीकृष्णाचा पराभव करून "रुख्मिणीला घेऊन परत येईन! नाहीतर प्राणत्याग करेन!" अशी प्रतिज्ञा करूनच निघतो! त्या रागाच्या आवेशात उधळणारे त्याच्या रथाचे घोडे शेवटी गरुडध्वजाला गाठतातच! आता श्रीकृष्णाला थांबावच लागतं. सुडाच्या भावनेने चेकाळलेला रुख्मी श्रीकृष्णाला आपल्या हातातील गदा गोल गोल फिरवत द्वंद्वाचं आव्हान देतो. श्रीकृष्ण ते आव्हान स्वीकारून आपली कौमुदी गदा हातात घेऊन त्या गोपालपूराच्या कुरणात द्वंद्वासाठी सज्ज होतो. दोघांत घनघोर युद्ध जुंपते. दोघेही गदेच्या प्रहाराने रक्तबंबाळ होतात. चेपलेल्या, वाकलेल्या गदा बाजूला पडतात. आता तलवारी उपसल्या जातात. वेळ येऊन ठेपलेली असते. श्रीकृष्णाच्या तलवारीने रुक्मीच्या तलवारीचे पाते तुकड्यांत विखुरून जाते. आता या द्वंद्वाचा निकाल लागण्यासाठी श्रीकृष्णाची तलवार रुक्मीच्या मस्तकास धडापासून वेगळी करण्यास सज्ज होते. पण मागून तिला रुख्मिणीने हाती धरल्यामुळे तिच्यावर आता रक्ताची धार लागते. "आपण मला द्वारकेला घेऊन जाताना माझ्या भावाला माझ्यासमोर धारातीर्थी पाडून नेणार का?"
या तिच्या प्रश्नाने रुक्मीला श्रीकृष्णाकडून जीवदान प्राप्त होते. जणू काही त्याचा दुसरा जन्मच! आता त्याला प्राणत्याग करायची आवश्यकता नसते पण रुक्मी परत कधीही कौडिण्यपुरात परतून जात नाही.
इथे पदोपदी श्रीकृष्णाच्या लीला पहावयास मिळतात. बारकाईने पाहिल्यास अजून लीला दिसून येतील पण त्यातील काही इथे मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न. धर्माचं रक्षण करण्यासाठी तो रुख्मिणी हरण रचतो. शिशुपालाच मरण श्रीकृष्णाकडून होणारच असतं. पूर्व जन्मातील रावणच तो! पण त्याचे १०० अपराध माफ करीन अस वचन श्रीकृष्णाने शिशुपालाची आई आणि त्याची आत्या श्रुतश्रवाला दिलेलं असतं. त्याच्या या कृतीमुळे त्याच्याही पापांचा घडा आता भरत येत होता. एक सर्व शक्तिशाली परमेश्वर नाही तर एक क्षत्रिय योद्धा म्हणून तो रुख्मिणीच हरण करतो. खरा क्षत्रिय धर्म काय आहे याची जाणीव करून द्यावी म्हणून रूक्मीला त्याच्यापर्यंत पोहचू देतो आणि बाकी सैन्याची जीवितहानी होऊ नये म्हणून रुक्मीला द्वंद्व करावं म्हणून त्याच्या मनातून प्रेरणा पण तोच देतो. क्षणात रुक्मीला हरवू शकत असतानाही घनघोर युद्ध रचतो कारण "आपल्या बहिणीसमोर आपण असे सहज हरलो" ही भावना त्याच्या मनात सलत राहिली असती. त्याला जीवदान द्यायचं आहे हे तर ठरलेलं होतंच. त्यासाठी रुख्मिणी निमित्तमात्र ठरली. "द्वंद्वात प्रतिस्पर्ध्याला यमसदनी धाडले जाते!" हाच क्षत्रिय धर्म असला तरी वेळीच शरण आलेल्या शत्रुसाठी दया हा त्याहून श्रेष्ठ धर्म आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं. धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी म्हणून तर तो आला. तुम्ही समजता तो धर्म आणि त्याला अपेक्षित असलेल्या धर्मात आजही ती तफावत आहे. वेळ आली की तो पुन्हा तारण्यासाठी खाली येणार आहे. (अवतार - अव : खाली तार: तारण्यासाठी ).
कृष्णाचं आयुष्य ही एक वेगळी गीता आहे. कृष्ण गीता! ऐकाल - वाचाल, त्याला समजून घ्याल तेवढं तो अजून जवळ ओढून घेतो. तोच तर अर्थ आहे त्याच्या नावाचा. कृष्ण - सर्वांना आकर्षून घेणारा!
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏
Comments