ऋषीकेशच्या दऱ्या खोऱ्यात भटकंती करताना आम्ही भेट दिलेले एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे "वसिष्ठ गुहा".
सखाराम आठवले काकांनी आम्ही शक्य झाल्यास या ठिकाणी साधनेचा अनुभव अवश्य घ्यावा असे सुचवले. अर्थात त्याला कारणही तशीच आहेत. सप्त ऋषींपैकी एक ऋषी म्हणजे वसिष्ठ. त्यांनी आणि त्यानंतर कित्येक सिद्ध व्यक्तींनी "तप" करून अध्यामिक ऊर्जेने भरून टाकलेले हे तपोवन. त्या सिद्ध व्यक्तींचा इथे सूक्ष्म रूपाचे अजूनही इथे तापामध्ये मग्न वास्तव्य आहे असे मानण्यात येते.
आमच्या होटेलपासून साधारण ३० मिनिटांच्या अंतरावर हे स्थान होते. (भारतात अंतर वेळेत मोजले जाते हे ध्यानात ठेऊन मुद्दाम मिनिटांत दिले आहे.) तिथे पोहचलो तेंव्हा त्या गुहेच्या विशाल विस्तीर्ण दगडाची रचना, त्याच्या बाहेर वाढलेला अवाढव्य वडाचा वृक्ष, जवळच्या पात्रातून खळखळाट करत भरदाव वेगाने वाहणारी गंगा हे सगळं दृश्य पाहून तिथे गुहेत साधना करण्याच्या इच्छेस अजून उधाण येतं.
आम्ही गुहेच्या मुखाशी उभे होतो. आत अंधारच अंधार दिसत होता. आत कोणी साधक साधना करण्यास बसले असल्यास त्यांच्या साधनेत बाधा येणार नाही अशी काळजी घेत मोबाईलच्या मंद प्रकशात आणि दबक्या पावलांनी आम्ही गुहेत प्रवेश केला. आत डाव्या बाजूला साधकांसाठी चटया मांडून ठेवल्या होत्या. आम्ही जसे जसे पुढे गेलो तसा आतमध्ये तेवत असलेल्या दिव्याचा प्रकाश आता स्पष्ट दिसू लागला. त्यासमोर आपल्या मोबाईलचा प्रकाशझोत उगाच त्या सात्विक प्रकाशाचे खंडन करतो आहे म्हणून आम्ही तो बंद करून पुढे सरसावलो.
बेलपत्र, फुलं, फळांनी सजलेलं ते शिवलिंग त्या दिव्यांनी आणि तेथील तपाच्या सात्विक ऊर्जेने उजळून निघाले होते. आम्ही त्या शिव आणि शिवशक्तिसमोर नतमस्तक झालो आणि काही क्षण तिथे साधनेस बसलो. विचारांचं वादळ क्षमल. मन एकाग्र झालं. पुढे साधनेत आलेले अनुभव हे ज्याची जशी साधना तसे येतात त्यामुळे मी इथे मांडणं फारसं उचित समजत नाही. कारण दुसऱ्याच्या साधनेशी आपल्या साधनेची तुलना करून आपण साधना करून जे कमावलं आहे त्याचा विचका करू नये. साधना या शब्दाचा अर्थ पण प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. कोणासाठी नामस्मरण तर कोणासाठी निर्विकल्प समाधी अवस्था.
साधनेचा आनंद घेऊन आम्ही बाहेर पडलो तेंव्हा आमच्यासारखे एक कुटुंब तिथे साधनेच्या ओढीने आलेले दिसले. पती पत्नी आणि त्यांचा तीन एक वर्षांचा मुलगा आणि त्याची आजी. तिथल्या उर्जने प्रभावित झालेल्या त्या स्त्री मधली कुंडलिनी जागृत झाली. तिच्या बेंबीच्या देठापासून ॐकार बाहेर पडला आणि आसमंतात पोहचला. शिवाच्या मिलनासाठी आतुर झालेल्या त्या शक्तीने ॐकार स्वरूपात आरोळी ठोकून साद घातली होती! तिच्या टाचा उंचावल्या होत्या, हाताच्या मुठी गच्च वळलेल्या, डोळे घट्ट बंद झालेले. मुलाधार चक्रापासून सरळ उर्ध्व दिशेला उसळी मारू पाहणारी ती ऊर्जा तिच्या चक्रांना भेदू पाहत होती. म्हणून कुंडलिनी जागृत करू इच्छिणाऱ्यांना आधी इतर चक्रांवर काम करून त्यांना स्वस्थ करून कुंडलिनीला वाट करून देण्याची तयारी करणं अत्यंत आवश्यक असतं म्हणजे असे त्रास सहन करावे लागत नाही. कुंडलिनी शरीरात खेळती ठेवायची असेल आणि साधनेचा आनंद अनुभवायचा असेल तर ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
नंतर आम्ही पुढे दगड धोंड्यातून वाट काढून गंगेच्या पात्रा जवळ पोहोचलो. तिथे एका मोठ्या शिळेवर वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती हिच्या गुहेजवळ जाण्याचा मार्ग दाखवला होता. पण चिखलात रुतलेल्या दगड धोंड्यांतून तो मार्ग खूपच खडतर होता आणि आम्ही त्या तयारीनिशी आलो नसल्याने असे एडव्हेंचर करणे आम्ही टाळायचे ठरवले.
तरी अयांशच्या जन्मानंतर ही पहिलीच वेळ होती जेंव्हा आम्ही दोघेच असे बाहेर पडलो होतो, त्याला त्याच्या आजी-आजोबांसोबत झोपवून. या लेखाच्या विस्तारभयास्तव सगळेच तपशील मांडणं शक्य नाही पण कर्ता करविता भगवंत सगळं काही घडवून आणत आहे याची अनुभूती पदोपदी जाणवत होती. आम्ही कृतकृत्य झालो. 🙏🏽
आख्यायिका
वसिष्ठ ऋषी हे ब्रम्हदेवांचे मानसपुत्र म्हणून मानले जातात. ज्या कुळात प्रभु श्रीरामांनी जन्म घेतला अशा सूर्यवंशी राजांच्या कुळाचे ते कुलगुरू होते. त्यांच्याबाबत अशी एक आख्यायिका आहे की, त्यांचे १०० पुत्र विश्वमित्रांच्या मायावी नरसंहारात मारले गेले. ते दुःख सहन न झाल्याने त्यांनी नदीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु दैवी कृपेने त्यांना नदीच्या दुसऱ्या तीरावर सुखरूप सोडण्यात आले, जिथे त्यांची पत्नी अरुंधती त्यांची वाट पाहत होती. आपल्या पतीस या दुःखापासून दूर नेण्यासाठी तिने दक्षिणेकडे प्रवास करण्याचे सूचित केले. या प्रवासा दरम्यान वाटेत त्यांनी गंगा नदीच्या किनारी एका गुहेत १०० वर्ष तप केले. ती गुहा आज वसिष्ठ गुहा म्हणून ओळखली जाते.
येथील आश्रम आणि गुहेबद्दल अधिक माहितीसाठी खाली हिंदी भाषेतील प्रत जोडत आहे. त्यावर क्लिक करून ती डाउनलोड करून वाचता येईल.
तप
देह, इंद्रिय व मन यांचे पावित्र्य वा आध्यात्मिक शक्ती संपादन करून त्याच्या योगे मोठे उद्दिष्ट साधण्याकरिता आवश्यक असे श्रम वा कष्टकारक आचरण उदा., उपवास, ध्यानधारणा, इंद्रियसंयम, जप, यात्रा इत्यादी. तप (संस्कृत–तपस्) हा शब्द ‘तप’ म्हणजे तापणे, तापविणे या धातूपासून सिद्ध झाला आहे. अर्थात मूलतः तो उष्णतेचा निदर्शक आहे. वेदांमध्ये उष्णता या अर्थाने जसा वापरला आहे तसा वरील अर्थानेही वापरला आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी वा अन्य अभिप्रेत वस्तू संपादण्यासाठी प्रजापतीने तप केल्याचे निर्देश ब्राह्मणग्रंथांत वारंवार आढळतात. उपनिषदांमध्ये तप या शब्दाचा वरील अर्थ स्पष्ट झाला आहे. कोणतेही सत्कर्म दीर्घकाल कष्ट सोसून करणे, असाही तप शब्दाचा अर्थ आहे. कोणतेही ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आत्मशुद्धी करणे म्हणजेही तप होय. ब्रह्मज्ञानासाठी तपाचरणाची आवश्यकता प्राचीन उपनिषदांत प्रतिपादिली आहे. उदा., स्वाध्याय आणि प्रवचन म्हणजे तप होय अनशन तप होय दम, शांती, सत्य, अध्ययन, दान, यज्ञ, उपासना, इ. म्हणजे तपच होय, असे तेथे म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदात वानप्रस्थ हा अरण्यात तप आचारण्याचा आश्रम आहे, असे म्हटले आहे. सत्त्वगुणांचा परिपोष म्हणजे तप किंवा मन व इंद्रिये यांची एकाग्रता हे परमतप होय, असे महाभारतात सांगितले आहे. भगवद्गीतेत तपाचे कायिक, वाचिक आणि मानसिक तसेच सात्त्विक, राजस आणि तामस असे भेद केलेले आहेत. धर्मशास्त्रात तप शब्दाचा प्रायश्चित्त असा अर्थही सांगितला आहे. तपाने म्हणजे प्रायश्चित्ताने पाप नाहीसे होते, असे धर्मसूत्रे सांगतात. आपापल्या वर्णाश्रमधर्माचे पालन हेच तप, असे मनुस्मृतीत म्हटले आहे. तपामध्ये शारीरिक व मानसिक शुद्धी अंतर्भूत आहेत. तपश्चर्येचा उपयोग निरनिराळ्या लहान मोठ्या कामनांच्या पूर्तीसाठी सांगून तशी पूर्ती झाल्याची अनेक उदाहरणे पुराणांत सांगितली आहेत.
तप आचरून पूर्वीची कर्मे नष्ट करावी, असे बौद्ध धर्मात सांगितले आहे तथापि आत्यंतिक आत्मक्लेशाचा मार्ग गौतम बुद्धाला पसंत नव्हता. जैन धर्मात मात्र आत्मक्लेशाला महत्त्वाचे स्थान आहे. बाह्य आणि आभ्यंतर असे तपाचे मुख्य भेद जैन धर्मात सांगितले आहेत. बाह्य तप म्हणजे शारीरिकक्लेश आणि आभ्यंतर तप म्हणजे चित्तशुद्धीचा प्रयत्न. या प्रत्येकाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. पूर्वजन्मार्जित कर्म नष्ट करणे म्हणजे निर्जरा तिच्यासाठी तपाची आवश्यकता मानली आहे. ग्रीक लोकांमध्ये अध्यात्माच्या आणि तपाच्या कल्पना दृढमूल झाल्या होत्या. ग्रीक ख्रिश्चन (ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च) चर्चमध्येही या कल्पना प्रसृत आहेत. रोमन कॅथलिक चर्च व प्रॉटेस्टंट चर्च हे दोन्हीही त्या कल्पनेपासून दूर रहिले तथापि पापाची कबुली देऊन (कन्फेशन) त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करून क्षमायाचना करणे आणि योग्य प्रायश्चित्त घेणे, या स्वरूपात तपाची कल्पना सामान्यतः ख्रिस्ती धर्मात रूढ आहे. मुहंमद पैगंबरांपूर्वी अरब लोकांना ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांचा परिचय झाला होता. त्यामुळे ख्रिस्ती संतांच्या तपोमय मार्गाची त्यांना माहिती होती तथापि इस्लाम धर्मात तपाच्या कल्पनेचा आढळ होत नाही. मात्र मध्ययुगीन काळात त्या धर्माच्या सूफी पंथात ही कल्पना रुजली होती.
Comments