"विवेक" या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न गेले वर्षभर करतो आहे. आज वर्षभरानंतर जी गोष्ट जाणली ती म्हणजे ज्याने खऱ्या अर्थाने या शब्दाचा अर्थ जाणला त्याने अध्यात्म जाणलं. या शब्दात सगळं काही आहे. म्हणून का लहानपणापासून गणपती बाप्पा समोर उभा रहायचो तेंव्हा - "बाप्पा, मला सद्सद्विवेकबुद्धी दे! अशी प्रार्थना कर." म्हणून मोठ्यांकडून कायम ऐकत आलो आहे.
आपल्यातला हा विवेक जागृत झाला की आजूबाजूच्या जगाच रूपच पालटून जातं. आजूबाजूच जग सुंदर झाल्याचा अनुभव येऊ लागतो. जागा झालेला तो आजूबाजूच्या जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन देतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण ज्या स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दल समुपदेश करतात ती अवस्था प्राप्त करण्याची पहिली पायरी जिथून सुरू होते तोच हा विवेक. श्रीकृष्ण आणि श्रीराम दोघंही पुरूषोत्तमच ! श्रीकृष्ण तथाकथित मर्यादांच उल्लंघन करूनही पूर्ण पुरुषोत्तम भगवान राहिले आणि प्रभू श्रीराम सर्व मर्यादांचे पालन करून मर्यादा पुरुषोत्तम झाले. विवेकाच मूर्तिमंत प्रतीक म्हणजे श्रीराम! जन्मलेल्या प्रत्येकाला हा भवसागर पार करायचा आहे भले मग ते साक्षात प्रभू श्रीराम का असेना. पण आपली मर्यादा ओळखून आपल्या मनाला कसा कुठे आवर घालावा हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध करून दाखवलं. अश्वमेध यज्ञ केला तो पण खरा तर नाममात्र. अश्वमेध यज्ञ म्हणजे ज्या यज्ञात सोडलेला घोडा सर्व राज्यांच्या सीमा उल्लंघन करून ज्या ज्या राज्यात प्रवेश करतो ती सगळी राज्ये यज्ञ करणाऱ्या राजाच्या अधिपत्याखाली येतात. ज्याने लढाई न करताच मनावर रामराज्य चालवलं त्यांना अशा यज्ञाची आवश्यकता ती काय?
...आणि तोच विवेक ढळला की? ...की जन्मतो तो रावण ! रावण हा खरा तर जन्माने ब्राम्हण होता. पण खरा ब्राम्हण तोच ज्याने ब्रम्ह जाणल आणि ती अवस्था येत नाही तोपर्यंत सगळेच क्षुद्र. पण रावण ज्ञानी होता. त्याच्या दश मुखांचा एक अर्थ त्याला अवगद असलेले ४ वेद आणि ६ शास्त्रे हा पण होता आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, घृणा, ईर्ष्या, द्वेष आणि भय हा पण होता. यांच्याच जोरावर त्याने वरदान पण मिळवलं आणि आक्रमण करून त्याने दहाही दिशा दणाणून सोडल्या.
पण स्वतःला मायावी म्हणवणाऱ्या रावणाला पण बाधली ती मायाच! जी गोष्ट विवेकाने जिंकू शकला नाही तिथे त्याची बुद्धी कपट कारस्थानं रचण्यात गुंतली. काम जिंकता आला नाही आणि क्रोध बळावला, त्याने सोन्याच्या लंकेचा लोभ दाखवून, जी स्वतःच मोह आहे त्या सीता माईच मन वळवायचा आटोकाट प्रयत्न केला. पण राम असो वा कृष्ण. मायेचा अधिपतीच तो! त्या मायेच्या प्रभावाखाली त्याला हे कधी कळलंच नाही की राम आणि सीता हे इतके एकरूप आहेत की सोबत जिला घेऊन आला आहे ती त्या सीतामाईचे फक्त भौतिक स्वरूप आहे. रावणाची बुद्धी म्हणायला फक्त शाबूत होती पण विवेकशून्य झालेली. घृणास्पद कर्म तर हातून आधीच घडलं होतं. आता फक्त वाट पहायची होती ते पापाचा घडा भरायची. सीता माईचं मन वळत नाही पाहून त्याची ईर्ष्या त्याला स्वस्थ बसू देईना. द्वेष बळावत चालला होता.
वेळ आली होती. परशुरामाने जनक राजाला दिलेलं शिवधनुष्य ज्याने दोर लावताना एका क्षुल्लक तृणाच्या काडीप्रमाणे सहज मोडून टाकलं होतं आणि २१ वेळा नि:क्षत्रिय करणाऱ्या आपल्याच पूर्व अवतराचा सुद्धा ज्याने अहंकार मोडून काढला त्या प्रभू श्रीरामांनी पुन्हा एकदा आपल्या धनुष्यावर तीर चढवला आणि त्या ज्ञानी पण अविवेकी दशाननाचा देह ज्या मातीतून आला त्या मातीत मिसळून गेला.
रावणाचा विवेक ढळला नसता तर रामायण घडलं असतं का ?
गेल्या काही महिन्यांपासून शंकर महाराजांचा एक विचार डोक्यात घुमतोय. विचार करून बोलणं एकवेळ जमेलही पण विचार करून विचार करायला शिक! तोच आहे विवेक! जो वेळ येईल तेंव्हा तुझ्या विचारांच्या घोड्यांना लगाम सुद्धा घालेल आणि योग्य वेळी वैचारिक शक्तीला सुलभ वाहू सुद्धा देईल. ती लगाम द्यायची आहे श्रीकृष्णाच्या हातात ज्याने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केलं आणि शक्ती वाहू द्यायची आहे ती शिवाशी एकरूप करण्यासाठी.
कारण… तुझ्यात रामही आहे आणि रावणही। तुझ मन आहे त्या द्वंद्वाची रणभूमी। तुझा विवेक राहू दे जागृत नेहमी। होऊदे त्या रामाचा विजय आणि पाठव रावणास यमसदनी। तीच आहे खरी विजयादशमी ।।
Comments