top of page
Writer's pictureNayanesh Gupte

वैराग्य

तारुण्य म्हणजे खरतर घोड्यांसारख गतिशील,चपळ, ताकदवान आणि त्याला काबूत नाही आणलं तर चौफेर उधळणारं!


घोड्याला खर तर बसण्यास कधी शिकवलं जात नाही किंवा तो स्वतः सुद्धा बसण्यास फार उत्सुक नसतो. त्याला शर्यतीच्या मैदानात पळण्यात मात्र खूप रस असतो. वेगवान दौड लावून परत तो त्याच्या मूळच्या जागी येऊन उभा राहतो. जिंकला तर टाळ्या वाजतात आणि हरला तरी त्या टाळ्या त्याला त्या टाळ्या त्याच्यासाठी नाहीत हे कधी उमजतच नाही किंवा नसावं. तो फक्त धावण्याचा आनंद घेत राहतो. जेंव्हा थकतो तेंव्हा या शर्यतीतून कायमचा बाहेर पडतो पण त्याच खडतर आयुष्य संपत नाही. त्याला टांग्याला जुंपल जातं. अंगात बळ आहे तोपर्यंत तो टांगा ओढत राहतो. हळूहळू पायातले त्राण कमी होतात, भार सावरत नाही, पाय लटपटायला लागतात आणि कधी कधी गाडी घसरायला लागते. मालक वैतागतो. त्याच्या तारुण्यातल्या कारकिर्दीवर कधीच पडदा पडलेला असतो. टाळ्यांचे गजर तारुण्यासोबत कधीच विरून जातात. असच कधीतरी भार ओढता ओढता त्याचे गलितगात्र तो रस्त्यावर ठेऊन निघून जातो. त्याचा मालक त्याला पाणी पाजून उठवायच्या प्रयत्नांची शिकस्त करतो पण तो उठत नाही. मालक हतबल होऊन पाहत राहतो.


ही व्यथा सगळ्याच घोड्यांच्या नशिबी येतेच असे नाही. पण या घोड्यांसारखाच आपलं सगळ्यांचं आयुष्य टाळ्यांचा गजर ऐकण्याच्या भरात निघून जात. दौड लावून आपण परत त्याच जागी येतो हे आपण विसरून जातो. एका जन्मा नंतर दुसरा जन्म, तीच पळापळ आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात. आयुष्याची संध्याकाळ झाली तरी भार ओढतच राहतो. आपण मुळातच असं धावलो नसतो तर कोणी आपल्याला शर्यतीत घेतलं असतं का ? शेवटपर्यंत टांगा ओढायची परिस्थिती आली असती का ? कदाचित हो. कदाचित नाही.


भर तारुण्यात असच सगळ सोडून वैराग्य पत्करलेला हा कोणी तरुण. गेले २ दिवस याला गंगेच्या किनारी पाहिलं. नित्य निरंजन, नर्मदे हर हर, कालिंदी मधली जगन्नाथ कुंटे यांची या वळणावरची सफर आठवली. त्याचा आणि त्या घोड्याचा काय संवाद चालला होता मला माहिती नाही पण सूर्योदयापूर्वीच्या त्या प्रहरी दोघं शांत चित्ताने त्या काठावर साधनेचा आनंद लुटत असावेत. सूर्योदय झाल्यावर सुरू होणाऱ्या धावपळीपासून त्यांच्या विचारापासूनअलिप्त! वैराग्ययुक्त!


25 views0 comments

Recent Posts

See All

Comentarios


bottom of page