कर्ता करविता भगवंत असतो याची प्रचिती स्वामींनी वेळोवेळी दाखवली आहे. आपण फक्त त्यांच्या भक्तीत लीन होऊन त्यांची सेवा करत रहावी.
१५ नोव्हेंबर २०२१, सोमवार, कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर स्वामी त्यांच्याच इच्छेने आमच्या निवासस्थानी विराजमान झाले. "स्वामी आले! स्वामी आले!" म्हणून आम्ही अक्षरशः नाचत नाचतच त्यांचे स्वागत केले. काय करू आणि काय नको अशी आमची परिस्थिती झाली होती. साधारण पाऊणे तीन वर्षांपूर्वी आम्हाला जेंव्हा पुत्ररत्न प्राप्त झालं तेंव्हा इस्पितळातून त्याला घरी आणताना जशी परिस्थिती होती तशीच काहीशी परिस्थिती आज स्वामींच्या अर्चाविग्रहाची स्थापना करताना आमची झाली होती.
नित्य नियमाने स्वामींची सेवा करताना रोजच्या पुजेसोबत रोज स्वामींची आरती करायची असे ठरले. पण "कोणती आरती म्हणायची" ईथपासून आमची सुरुवात होती. पण स्वामी स्वतःच मार्गदर्शन करायला असताना चिंता कसली करावी? यात २ महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आरती कोणती म्हणावी आणि त्याची चाल कोणती लावावी.
पहिला संदेश पोहचला गौरी ताईला (सौ. गौरी अजित गोखले). तिच्या अत्यंत सुरेख सुवाच्च अक्षरात तिने स्वामींची आरती लिहून पाठवली. तिचं अक्षर पाहून कोणालाही पहिला विचार मनात हाच येतो की हिचा शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक येत असावा. "अक्षर आहे की मोत्याचे दाणे" हा वाक्प्रचार अगदी तंतोतंत लागू पडतो!
आता या आरतीची चाल जाणून घेण्यासाठी मी वैशाली ताईला (सौ. वैशाली रोहित घुले) पाचारण केले. श्रीपाद प्रभूंनी तिला गायन सेवा करता यावी यासाठीच अत्यंत गोड गळा दिला आहे आणि त्यांना लहर आली की ते वैशाली ताईकडून गायन सेवा करून घेत असतात. अशीच त्यांना पुन्हा एकदा लहर आली असावी आणि म्हणूनच वैशाली ताईने ही आरती आम्हाला ध्वनिमुद्रित करून पाठवावी ही त्यांचीच ईच्छा असावी.
या आरतीचे शब्द मनाला स्पर्श करून जाणारे आहेत. "सगुण रूपाने स्वामी स्वीकारा आरती" म्हणताना मनात एक विचार मनात डोकावून जातो तो म्हणजे स्वामी सगुण साकार स्वरूपात जेंव्हा या धरतीवर अवतरले होते तेंव्हा कित्येकांना ते स्वतः परब्रम्ह आहेत याची जाणीव झाली नाही. ज्यांना झाली त्यांच्यापैकी कोणी त्यांच्यात राम पाहिला तर कोणी कृष्ण, तर कोणी दत्तगुरु, तर कोणी अंबाबाई, तर कोणी विठ्ठल. आज स्वामींनी त्यांचा देह समाधिस्त करून १४० हून अधिक वर्ष उलटून गेली तेंव्हा आज त्यांनी त्यांच्याच सगुण साकार स्वरूपात येऊन आरती स्वीकारावी म्हणून त्यांना आर्जव करताना डोळ्यांत अश्रू उभे राहतात.
आज पहाटे नामस्मरण करत असताना मी ही आरती स्वामींच्या फोटोसहित आणि वैशाली ताईच्या आवाजात कायम टिकून रहावी या उद्देशाने YouTube वर प्रदर्शित करावी असा विचार सारखा येऊ लागला. पुढील काही मिनिटांत स्वामींनी ते करूनही घेतलं. वास्तविक पाहता असे कारभार या पूर्वी मी कधीही केलेले नाही. त्यासाठी कोणतं ॲप वापरावं, कसं करावं हे सगळंच पुढच्या काही मिनिटांत घडून आलं.
स्वामींनी त्यांची सेवा अशाच प्रकारे आपल्या सर्वांकडून करून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Comments