आज स्वामींच्या प्रकट दिनी स्वामींनी श्री दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती चे पारायण अवघ्या दीड तासात घडवून घेतले.
स्वामींचे चरित्र जाणून घ्यायचा प्रयत्न करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की स्वामींना कृपाळू का म्हणतात ते! कारण आपल्याला आपल्या अध्यात्मिक प्रगतीची काळजी असो वा नसो जगद्गुरु म्हणून ते आजही कार्यरत आहेत. या भूतलावर सदेह वावरत आहेत. त्यांच्या कृपेचा वर्षाव करत आहेत. आपला आळशी स्वभाव जाणूनच त्यांनी एवढ्या संक्षिप्त चरित्र ग्रंथाची रचना त्यांनी केली असावी. "अरे! किमान एवढा अक्षरसत्य ग्रंथ तरी वाच! माझी वरचेवर का होईना ओळख तरी करून घे. पुढे तुला मला जाणून घ्यायची ईच्छा होईलच आणि योग्य वेळ आली की योग्य मार्गदर्शन करायला मी तुझ्या पाठीशी समर्थ आहेच!" हे त्यांचे गुरू म्हणून प्रेम आणि शिष्यांबद्दलची कळकळ जाणवते.
त्यांच्या अनंत लीला वर्णन करताना दत्तावधूत म्हणतात संपूर्ण पृथ्वीचा कागद केला आणि सप्त समुद्राची शाई करून साक्षात सरस्वती माई जरी त्या लीला लिहायला बसली, तरी त्या पूर्ण व्हायच्या नाहीत.
माझ्या मनाला त्यातला सर्वात भावलेल्या दोन गोष्टी आहेत.
त्यातली एक गोष्ट म्हणजे स्वामींनी शंकर महाराज, श्रीकृष्ण सरस्वती महराज, साई बाबा, गजानन महाराज, रामकृष्ण परमहंस, स्वामीसुत, बाळाप्पा महाराज अशा जवळपास ३०० योगी, सिद्ध पुरुषांच्याद्वारे आपलं गुरुतत्व अध्यात्मिक प्रबोधनाच्या कार्यास लावलं होतं. अर्थातच आजही यातल्या वेगवेगळ्या रूपाकडे आकर्षणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही.
दुसरी म्हणजे अध्यात्मिक प्रगतीची वाटचाल ही सगुण साकार रुपाच चिंतन करण्यापासूनच सुरू होते. स्वामी भूतलावर सदेह वावरत असताना त्यांचं ते रूप त्यांच्या कोणत्याही भक्ताला "त्याच्या कल्पनेसारख दिसत नाही" अशा एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून स्वतःपासून दुरावू देत नाहीत. ज्याला ज्या सगुण रुपावर प्रेम स्वामींनी त्याला त्या रूपात दर्शन घडवून आणले. मग ते कोणासाठी राम तर कोणासाठी कृष्ण, तर कधी विठ्ठल तर काही हनुमान तर कधी काली आणि दुर्गा तर कधी शंकर पार्वती. द्वारकेचा श्रीकृष्ण असो वा काशीचा विश्वनाथ स्वामी सर्वच काही आहेत कारण भक्ताच्या हृदयात वास करणार परब्रम्ह तत्त्वच ते आहेत. त्यामुळे त्यांचा मनकवडे पणा ही काही त्यांची सिद्धी नाही तर तो मुळपुरूष म्हणून त्यांचा गुणधर्मच आहे!
हे सगळं चिंतन चालू असताना श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगताना दिलेली सर्व वचन कलियुगात स्वामींच्या रूपात ते पूर्ण करून दाखवतात याची जाणीव होते. भगवद्गीतेत कुठेही "श्रीकृष्ण उवाच" असा उल्लेख न करता "भगवानुवाच" का केला आहे हे सुद्धा अगदी स्पष्ट जाणवते.
हे सर्व घडत असताना मी कोणी विशेष नाही आणि त्यांच्या असंख्य भक्तांपैकीच एक जरी असलो तरी स्वामींचे त्यांच्या सर्वच भक्तांकडे सारखेच लक्ष असते याची प्रचिती स्वामीच देतात. वर उल्लेख केलेली श्री स्वामी समर्थ सप्तशती ही पोथी मला माहिती नव्हती. गेल्या वर्षी अशाच काही लिखाणाच्या माध्यमातून दीप्ती राणे या गुरू भगिनिशी मी जोडला गेलो. आणि त्यानंतर काही क्षणांतच आमच्या विचारांची देवाण घेवाण झाली. ताईने पत्ता मागून घेतला. संक्षिप्त गुरूचरित्र आणि श्री स्वामी सप्तशती या दोन्ही पोथी मला कुरिअर ने पुण्याहून आमच्या बँगलोरच्या निवासस्थानी पाठवल्या. त्या ज्या दिवशी घरी पोहोचल्या तो दिवस म्हणजे दत्त जयंती! शंकर महाराजांचे सुद्धा मूर्ती रूपाने त्याच दिवशी घरी आगमन झाले.
अलीकडेच मंदार शिधोरे दादा या गुरुबंधूशी सुद्धा जोडला गेलो. तो सध्या अमेरिकेत असला तरी स्वामींनी त्याला निमित्त करून त्यांच्या भक्तांचा छान समूह जुळवून आणला आहे. त्याद्वारे समोरासमोर प्रत्यक्ष भेटून किंवा व्हॉट्सॲप, गूगल मीट द्वारा स्वामी आणि शंकर महाराज भक्तांचा छान सत्संग घडतं असतो. या समूहाच्या निमित्ताने कित्येक स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचे पारायण करणार आहेत असे वाचण्यात आले आणि आजच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून स्वामींनी इतरांसोबत माझेही पारायण घडवून घेतले.
संपूर्ण समर्पण अजून तरी मला जमलेले नाही पण हे पारायण करण्याच्या प्रक्रियेत "मी" काय केले? काहीच नाही! पोथी माहिती करून देणारे, माझ्यापर्यंत पोहचविणारे, त्याचे पारायण कधी करायचे ठरवणारे, त्यासाठी वेळ काढून देणारे, शारीरिक, मानसिक स्थिती प्रदान करणारे, वाचनाची बुद्धी देणारे आणि शेवटी मुखातून शक्य तितक्या स्पष्ट उच्चारातून वदवून घेणारे स्वामीच नाहीत काय ?
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Commenti