त्यांच्या एका वेळी इतक्या लीला सुरू असतात की सुरुवात कुठून करावी हा प्रश्नच पडतो. दसऱ्याच्या निमत्ताने या वर्षी ३ दिवस लागून सुट्टी होती. अशा आपसूक आलेल्या संधी प्रवासच्या दृष्टिकोनातून पाहता आम्ही सोडू इच्छित नाही.
श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे देवस्थान असलेले कुरवपूर आमच्या बँगलोर येथील निवासस्थानापासून साधारण ८:३० तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे या तीन दिवसांत फारशी दगदग न करता निवांतपणे दर्शन घेता येईल असा आमचा अंदाज होता. दसरा आणि अर्थात आमची प्रवासाची तारीख जवळ येऊन ठेपली होती. आमच्या उत्साहाला उधाण आले होते. पण श्रीपाद प्रभूंच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक अयांश सर्दी, खोकला आणि तापाने फणफणला. ताप काही उतरता उतरेना. आता मात्र काळजी वाटू लागली. आम्ही त्याला जवळच्या इस्पितळात घेऊन गेलो तेंव्हा त्यांनी आपत्कालीन वैद्यकीय विभागात चाचणी करण्यास सांगितले. अयांशने रडून रडून आकांत मांडला. त्याची ऑक्सिजनची पातळी बघण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. त्यात त्या SpO2 मीटर ने त्याची ऑक्सिजनची पातळी ८०-८५ दाखवल्यामुळे आमचे धाबे दणाणले. दरदरून घाम फुटला. पुन्हा एकदा पातळी पाहण्याचे ठरले. यावेळी तीच पातळी ९८-९९ आल्यामुळे आम्ही स्वामींचे आभार मानले आणि डॉक्टरांची परवानगी घेऊन परत घरी रवाना झालो. एकंदर दसरा घरातल्या घरात थोडक्यात साजरा झाला आणि सीमोलंघन घराची चौकट ओलांडण्यापुरतेच मर्यादित राहिले. मनात एक विचार घोळत राहिला का नाही येऊ दिलं श्रीपाद प्रभूंनी यावेळी ? काही चुकलं का आपलं?
दिवाळी जवळ आली तसा अंबरनाथला घरी जायचा बेत ठरला. आदल्या दिवशी सगळी बांधाबांध करून आम्ही तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता घर सोडायचं नक्की होतं. आकांक्षा आदल्या दिवशी संध्याकाळी गाडी प्रवासासाठी स्वच्छ करून आली. एकीकडे मी आणि संध्या - आमची स्वामीभक्त मैत्रीण हिच्याशी कलावती आईंबदल काही चर्चा करत होतो. तिच्या आईची त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे. योगायोगाने आमच्या अंबरनाथच्या घरासमोरच त्यांचं उपासना केंद्र आहे. जवळपास एक २०-२२ वर्ष तिथे चालणारी भजने माझ्या कानावर पडली आहेत पण मी त्या उपासना केंद्रात कधी फारस गेलो नाही याची मी खंत व्यक्त करत होतो. कलावती आईंचे चरित्र थोड फार माझ्या वाचनात आलं आहे. त्या साक्षात दुर्गा देवीचा अवतार तर त्यांचं श्रीकृष्णावर नितांत प्रेम आणि श्रद्धा. संध्या आणि माझं असं बोलणं चालूच होतं तेंव्हा मी बोलता बोलता तिला सहज बोलून गेलो की - बँगलोर मुंबई रस्त्यात बेळगांव लागतं आणि कलावती आइंची तिथे समाधी आहे. तेच त्यांचं मूळ स्थान आहे. कधीतरी तिथे पण जायची इच्छा आहे.
दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून आम्ही तयार होऊन बरोब्बर ५ वाजता गाडीत बसलो. गाडी चालू व्हायचं नावाचं घेईना. आकांक्षा आणि मी एकेमेकांच्या तोंडाकडे हतबल होऊन पाहत होतो. माझं तर डोकचं सुन्न झालं. आम्ही गाडीत सामान तसेच ठेवून परत घरी आलो. टाटाच्या आपत्कालीन यंत्रणेस संपर्क साधला. त्यांनी ताबडतोब मेकॅनिक पाठवायची व्यवस्था केली. तरी तो येईपर्यंत ७ वाजले. त्याने गाडीचे परीक्षण करून बॅटरीचा बिघाड झाला असून ती शक्यतो बदलण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर एक गोष्ट लक्षात आली की जर आम्ही कुरवपूरसाठी निघालो असतो तर ही वेळ कदाचित आमच्यावर रस्त्यातच आली असती.
नवीन बॅटरी बसवून आता आम्ही निघायला सज्ज झालो होतो. पण तोपर्यंत ११ वाजले होते. आम्ही तब्बल ६ तास उशिरा निघणार होतो. आता काही आपण स्वामींच्या दाभोळे येथील स्वयंभू पादुका मठात आपण पोहचत नाही याची खात्री झाली होती. पण तो दिवस घरीच बसून फुकट घालवण्यात काही अर्थ नव्हता. आपण काळोख व्हायच्या आत जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत जाऊ आणि दुसऱ्या दिवशी तिथून पुढे प्रवास करू असं ठरलं. मधल्या वेळेत, वेळ पुढे ढकलता ढकलता आम्ही न्याहरी आटोपली आणि एकीकडे फेसबुक वरच्या पोस्ट पुढे रेटत होतो. मध्येच माझी नजर थबकली ती कलावती आईच्या फोटोवर. त्या पोस्ट मध्ये काय लिहिलं आहे वाचू म्हणून मी वाचायला सुरुवात केली पण त्या पोस्टचा आणि कलावती आईंचा काडीमात्र संबंध नव्हता.
साधारण ११ वाजता गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही गाडी पळवायला सुरुवात केली. हातात असलेला वेळ बघता आमच्याकडे मुक्कामासाठी तीन पर्याय होते. हुबळी, बेळगांव किंवा कोल्हापूर. हुबळीला आम्ही खूपच लौकर पोहचलो असतो, कोल्हापूर गाठायच म्हणजे तोपर्यंत काळोख झाला असता. तेंव्हा बेळगांव हाच सगळ्यात योग्य पर्याय होता. हॉटेलच बुकिंग वगैरे काही न करता आम्ही तसेच बेळगांव गाठलं. बेळगांव मध्ये शिरलो आणि सूर्यास्त झाला. साधारण ६:३० वाजले असावे. आम्ही मेक माय ट्रीप वर हॉटेल बघून ठेवले आणि गाडी हॉटेलच्या वाहनतळात लावली. त्यांच्या स्वागत कक्षात जाऊन आजची सोय तिथे होऊ शकेल का म्हणून चौकशी करण्यास गेलो. त्यांना हवा असलेला सर्व तपशील पुरवला, भाडं भरलं आणि वळलो तर समोर - श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव !
चित्रपटात नायिकेला पाहून नायकाच्या डोळ्यासमोर व्हायोलिन वाजवे तसे माझ्या मनात हे भजन वाजायला सुरुवात. त्या मोहनाच मनमोहन रूप एवढं भावूक होतं की त्याच वर्णन शब्दात करायचा प्रयत्न पण व्यर्थ आहे. ज्याची मूर्ती एवढी सुंदर आहे तो भगवंत साक्षात किती सुंदर असावा ?
मधल्या काळात माझं माझा कार्यालयातील सहकारी प्रतीकशी संवाद झाला. कोविडमुळे संचारबंदी लागू झाल्यापासून तो त्याच्या कुटुंबासह तिथेच स्थायिक झाल्याचे माहितीच होते त्यामुळे आमचा भेटण्याचा बेत ठरला. बोलता बोलता मी दुसऱ्या दिवशी सकाळी कलावती आईंच्या दर्शनास परमार्थ निकेतन येथे जाणार असल्याचे त्याला कळवले. ते ऐकून त्याला अतिशय आनंद झाला कारण त्याचे घर त्याच्या अगदी बाजूलाच असल्याचे त्याने कळवले. तसेच पूर्वी ते ठाण्यास राहायला असून त्यांनी कलावती आईंच्या सेवेसाठी ठाण्यातील घर सोडून बेळगांवला स्थायिक यायचे ठरवले होते. प्रतीक आणि त्याचे संपूर्ण कुटुंबच कलावती आईंच्या सेवेत गेली १०-१५ वर्षे आहेत. ठरल्याप्रमाणे आम्ही कलावती आईंच्या दर्शनास पोहचलो. सध्या कोविडमुळे आत प्रवेश करून दर्शन घेण्यास परवानगी नाही त्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. पण तेही खूप सुखदायक होते. त्यांची ती लांब ठेवलेली प्रतिमा त्रमितीय असावी बहुतेक. जणू काही त्या समोर बसल्या असल्याचा भास होतो.
ज्या दर्शनाची मी आदल्या दिवशी फक्त इच्छा व्यक्त केली होती ती एवढ्या लौकर पूर्ण होऊ शकेल हा विचार मी स्वप्नात पण नव्हता केला.
त्यानंतर आम्ही श्रीदत्त त्रिपुरासुंदरी मठास भेट देऊन तेथील मनमोहक मूर्ती आणि स्वामींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
योगायोगाने गजानन कुलकर्णी पण सांगलीहून तिथे आले होते. त्यांनी पाहिले जी गोष्ट माझ्या कानावर घातली ती म्हणजे गेले काही दिवस तिथे काही तांत्रिक बिघाडामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली होती. आदल्या दिवशी तर त्यामुळे खूपच त्रास काढावा लागला होता. स्वामींच्या कृपेने आम्ही तिथे पाऊल ठेवायच्या नुकतीच आधी तो बिघाड दुरुस्त होऊन पाण्याची समस्या पूर्णतः मिटली होती. आम्ही "आमच्या" नियोजनाप्रमाणे एक दिवस आधी पोहचलो असतो तर आम्हाला नक्कीच त्या त्रासातून जाणं भाग पडणार होतं.
भगवंता तुझी लीला अगाध आहे. तुला श्रीपाद प्रभू म्हणू की श्रीकृष्ण म्हणू की स्वामी समर्थ म्हणून संबोधू माहिती कळत नाही कधी कधी. कारण सगुण रूप वेगळं असलं तरी तुझ निर्गुण रूप एकच आहे. तू खरोखर माऊली आहेस जी आपल्या बाळांवर खरोखर नितांत प्रेम करतेस 🙏🏼
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏼
Comments