आमच्या हॉटेल पासून गंगेच्या किनारी जाणाऱ्या आणि पावसाच्या पाण्याने वाहून गेलेल्या त्या ओबड धोबड रस्त्याच्या किनारी एक छोटीशी पायवाट झाडा-झुडपातून खाली गंगेच्या किनारी चालली होती. गूगल मॅप वर "संखर महाराज" नावाचे दाखवलेले एक ठिकाण याच झाडाझुडपात कुठेतरी दडलेले दिसत होते.
खरं तर गूगल मॅप वर विश्वास ठेऊन ही पायवाट उतरून खाली जाणं म्हणजे मूर्खपणाच! पण खाली उतरल्यावर समोर दिसणाऱ्या कुटीच दृश्य आणि त्यासमोर असणार भव्य दिव्य शिवलिंग पाहून या तपोवनात अनादी काळापासून तप करून पवित्र झालेल्या या देव भूमीच पावित्र्य आणि गूढ माझ्या सूक्ष्म बुध्दीच्या पलीकडे आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली.
कुटीमध्ये लांबूनच डोकावून पाहिलं. कोणी एक संन्यासी झोपडीत एका यज्ञकुंडाच्या मागे समाधिस्त अवस्थेत पहुडलेले आणि बाहेर दोन पेहेलवान दगड धोंडे उचलून व्यायाम करण्यात मग्न होते. जणू काही समाधिस्त रुद्र आणि त्यांचे रुद्रगण. त्यांच्याशी मी थोडक्यात संवाद साधला आणि त्यांनी पण वरचेवर उत्तर दिली.
मी पुन्हा एकदा आजूबाजूला कटाक्ष टाकला. शिवलिंगास डोकं टेकवून नमस्कार केला, काही फोटो घेतले आणि माघारी वळलो. आम्ही बाजूच्या सुखसोयींनी युक्त रिसॉर्ट मध्ये राहत असलो तरी अजून मनात घोळते आहे ती संन्याश्याची कुटी!
Comments