त्या शेष शय्येवर पहुडलेल्या श्रीहरीच्या मुखावर स्मित हास्य उमटले. डोळे मिटून स्मित हास्य करणाऱ्या त्या मुखकमलाकडे पाहून लक्ष्मी माई पुन्हा एकदा चमकली. तिकडे त्यांच्या नाभीस्थानातून निघालेल्या पद्मावर विराजमान ब्रह्मदेव पण अशाच काही अवस्थेत. कैलासावर पण काही वेगळी परस्थिती नव्हती. कारणच तसं होतं. कान्हा क्षणाक्षणाला वसुंधरेवर अखंड लीला करत होता. त्याच्या अगम्य लीला त्यालाच माहीत पण कधी कधी त्याची वर्दी आधीच पोहचली असायची. कारण या नुसत्या लीला नाहीत तर न भूतो न भविष्यती असा सोहळा असायचा. देव-गंधर्व सर्वांच्या साक्षीने तो पार पडायचा. श्रीकृष्ण हे श्रीहरी आहेत हे माहीत असूनही, माहीत असून नसल्या सारखं असायचं. कोणाची छाती दडपून जाई तर कोणाचा उर भरून येई. आज आपण देव-गंधर्व असण्यापेक्षा त्या गोकुळात एक गुराखी असतो किंवा गोपी असतो तर किती बरं झालं असतं म्हणून हळहळ त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी नक्कीच वाटायची. पण आपण या सोहळ्याचे साक्षीदार होणार याचा आनंद पण तेवढाच असायचा.
"आज काय करणार आहे हा कान्हा? कोणाला छळणार आहे?" म्हणून लक्ष्मी माई तिरक्या नजरेने त्या श्रीहरींच्या मुखाकडे अजूनही बघतच होती. इतक्यात गलका झाला! "चेंडू पाण्यात गेला! चेंडू पाण्यात गेला!" पोरं यमुनेच्या डोहाकडे डोळ्यात पाणी आणून बघत होती. ही कालिंदी आहे कालिंदी! त्या कालिंदीच्या पोटात गेलेली कोणतीही गोष्ट अशी परत मिळत नसते हे त्यातल्या अगदी शेंबड्या पोराला सुद्धा कळतं होतं. कान्हा एक हात कंबरेवर आणि दुसरा त्याच्या लाडक्या दादाच्या खांद्यावर टाकून प्रश्नार्थक नजरेने त्या डोहाकडे पहात होता. आपल्या खेळाचा खेळखंडोबा झाला आणि चेंडूही गेला म्हणून डोळ्यातली आसवं आता गालावर ओघळू लागली होती. कान्हा सज्ज झाला. ती गुरख्याची पोर कुणी साधी सुधी नव्हती. कित्येक जन्मांची भक्ती आणि पुण्याई म्हणून आज कान्हा त्यांचा सखा सवंगडी म्हणून उभा होता. तो भृगू सारख्या महर्षींची लाथ छाताडावर खाईल पण त्याच्या सुहृदाच्या डोळ्यातली आसवं नाही पहायचा! कोणाला काही कळायच्या आत परत धपकन आवाज आला. कान्हाने त्या डोहात उडी घेतली होती. बाळ गोपाळ आक्रोश करू लागले. गाईंनी हंबरडा फोडला. एवढ्या वेळ वाहणारा मंद वारा पण स्तब्ध झाला. पक्षी होते तिथेच यमुनेच्या तीरावर झाडावर बसले. संपूर्ण निसर्गच बावचळला!
गंभीर परिस्थिती सगळी. कारण त्या कालिंदीचा डोह फक्त खोलच नव्हता तर एका शापित परिस्थितीमध्ये अडकलेला. कालिया या अत्यंत भयंकर सर्पाच ते आश्रयस्थान होतं. त्याच्या नुसत्या फुत्काराने डोळे पांढरे होत समोरच्याचे. कान्हाने तर त्याच्या निद्रिस्त समयी त्याची निद्रा भंग करण्याचाच नाही तर काही औरच बेत केला होता. बराच वेळ लोटला तरी पाण्यावर काहीच हालचाल नाही. साधा तरंग सुद्धा नाही. अवघं गोकुळ आक्रंदून आक्रोशत होतं. गोपिकांच्या डोळ्यातलं काजळ गालावर ओघळून त्यातल्या काळोखात त्या बुडून गेल्या होत्या. त्यातील प्रत्येकाच्या डोळ्या समोर तरळत होतं ते मोहात पाडणार मनोहर मोहन रूप. "कृष्णा! आमचं सगळं लोणी तूच घेऊन जा! पण आता अंत नको पाहुस बघ! ये ना रे बाहेर!" "नाही रागावणार तुला ! नाही बांधणार उखळीला तुला! ये ना रे कान्हा!" यशोदा माईला काही सुचत नव्हत. ती तर बिचारी त्या पाण्याकडे धाव घेऊ पाहत होती. राम शांत उभा होता.
आता आकाशात मेघ मल्हारी भरून आला. त्या आक्रोशाने त्याला सुद्धा पाझर फुटला. पाण्यावर तरंग दिसू लागले. चेंडू टुणकन उडून जमिनीवर येऊन पडला. एका क्षणाकरता शांतता. काहीच कळेना. पाण्याचा उंच फवारा उडाला. त्या फवाऱ्याने सगळ्यांना न्हाऊच घातलं जणू. आकाशात मान उंचावून बघावं लागेल एवढ्या प्रचंड उंचीचा तो कालिया सर्वांच्या समक्ष पाण्यावर मोठा फणा काढून उभा होता. त्याचे डोळे रागाने लालबुंद झालेले. भडकलेल्या ज्वालमुखी सारखे आग ओकत होते. त्याच्या विषाने भरलेल्या काळ्याकुट्ट असंख्य जिव्हा फुत्कार करत होत्या. त्याचं ते अक्राळ विक्राळ रूप पाहून संपूर्ण गोकुळ वासियांची पाचावर धारण बसली. पण एका क्षणाकरता सुद्धा कान्हा त्यांच्या हृदयातून निसटला नव्हता. राम गालातल्या गालात हसला आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला. "बघा तरी कोण उभा आहे त्या कलियाच्या डोक्यावर!" आसवांनी भरलेले डोळे कसेबसे पुसत, कंठाशी आलेल्या प्राणाला तसचं गिळून धीर धरत सर्वांनी माना अजून थोड्या उंचावल्या. ते मोराचं पीस फडफडत होतं. जसं काही त्याला त्या पाण्याचा स्पर्शच झाला नव्हता. "त्याच्या" त्या खोडकर चेहऱ्यावर हसू होतं. एक पाय त्याच्या दुसऱ्या पायाच्या बाजूला टाकून त्याने त्याची कंबरेला खोचलेली बासरी हातात घेतली आणि संपूर्ण गोकुळाला "मला काहीही झालं नाही! हा बघा मी आलो!" म्हणून साद घातली! समोर उभ्या ठाकलेल्या त्या कालिया सारख्या मूर्तिमंत मृत्यूला पण सगळे विसरून त्या सुरांमध्ये मावळून गेले. भय, चिंता सर्व काही तो हरी हरण करून घेऊन गेला होता. आता त्या हृदयात राहिला होता तो फक्त आणि फक्त श्रीहरी श्रीकृष्ण!
त्याने परत एकदा बासरी कंबरेला खोचली. आता सुरू झाली ती देव गंधर्वांची मैफिल. दाही दिशांना स्वर वाजत होते कान्हा त्या कालिया च्या एका डोक्यावरून दुसऱ्या डोक्यावर उड्या मारत होता. नाही नाही!!! त्या नुसत्या उड्या नव्हत्या. त्या उड्यांमध्ये एक ताल होता. लयबद्धता होती. बघणारा प्रत्येक त्या नृत्यामध्ये हरवून गेला होता. मृत्यूच्या डोक्यावर एवढं सुरेख नृत्य अनादी काळापासून कोणी कधी पाहिलंच नव्हत. अनाकलनीय सोहळा रंगला होता. आकाशातून पुष्पवृष्टी होत होती. कालियाच्या दोन्ही बाजूस उभ्या राहून त्याच्या पत्नी आज आपल्या पतीच्या मस्तकास साक्षात श्रीकृष्णाने पदस्पर्श करून आशीर्वाद दिला म्हणून त्या धन्य झाल्या होत्या. आता कालिया दमला होता. "आज आपला जीव जाणार की काय!!" म्हणून काकुळतीला आला. शरणागती तर त्याने कधीच पत्करली होती बाकी होतं ते समर्पण! आत त्याची शेपटी एका हातात धरून कान्हा त्याच्या मधल्या मस्तकावर पुन्हा एकदा एका पायाच्या आड दुसरा पाय टाकून उभा होता. त्या कालियाच्या सुद्धा ह्रुदयात वास करणाऱ्या त्या मुकुंदाने त्याचा आर्त स्वर ऐकला होता. भयाचा नायनाट झाला होता. आता झालं होतं ते समर्पण!
तिथे कैलासावर भगवान शिव पण म्हणाले, "बघितलंस उमा, म्हणून हसू आलं मला मगाशी! खर तर नटराज म्हणून माझी पूजा केली जाते! माझं तांडव म्हणजे साक्षात प्रलय स्वरुपी मृत्यूची वर्दीच देत! पण बघ कसा नाचतोय हा कान्हा त्या मृत्यूच्या डोक्यावर. आणि नुसता नाचत नाहीये! तर नाचवतोय त्या मृत्युला!" गळ्यातला वासुकीला उद्देशून ते पुढे म्हणाले, "बघ बघ! माझ्या नीळकंठा भोवती विळखा घालून तू कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त करतोस ना! तो कालिया बघ! आज त्याचा उद्धार झाला! आज हा नृत्याचा आविष्कार आणि त्याच नाव कायमच जोडलं जाणार आहे त्या कृष्णाशी! कालिया मर्दन आहे हे!"
श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏🏽
वाह ! अप्रतिम वर्णन.