पुणेकर, मुंबईकर किंवा नागपूरकर होण तूर्तास तरी शक्य झालेलं नाही कारण पु. लं. म्हणतात तसं तिथे स्थायिक होण्याच्या अटींमध्ये मला बद्ध होता आलं नसावं. पण बँगलोरकर व्हायला नक्कीच जमतंय. म्हणूनच ३.५ किमी अंतरावर असलेल्या ऑफिस मध्ये जायला सायकल बरी पडेल असं म्हणतोय तरी.
त्या ३.५ किमी मधला २ किमी रस्ता तर नवीन मेट्रोच्या कामाने व्यापला आहे. त्यात सायकल चालवून "आपल्याला पर्यावरणाची किती काळजी आहे!" असं दाखवून ट्रॅफिकचा पुरता खोळंबा करण्याची पुरेपूर लक्षण आहेत. अहो! बँगलोर आणि ट्रॅफिकच नातच आहे ते! बँगलोरकर व्हायचं म्हणजे ट्रॅफिक जॅम नको का करता यायला! वरून नंतर आमच्या चार चाकी मध्ये बसून चालवताना म्हणायचं - "साला! हे २ व्हीलर वाले कसले चालवतात! कुठूनही घुसतात! बघ! बघ! त्या स्विगी आणि झोमॅटो मध्ये कशी पुढे जायची चढाओढ लागली आहे. आणि इथे दोन्हीकडचा पाव्हणा उपाशी! सायकल वाल्यांना तर अशा रस्त्यावर बॅन केलं पाहिजे!". त्यात कोणी गाडीला घासून चरा पाडून गेला की राग शांत व्हावा म्हणून घेतलेले सगळे धडे राहतात बाजूला आणि मुखातून स्तुती सुमनांची सरबत्ती सुरू होते ती वेगळीच. तेच सायकल किंवा ॲक्टिवावर बसून म्हणायचं "च्यायला! IT मधल्या सगळ्यांना इथे एकटं बसून गाड्या चालवायच्या आहेत! २ व्हीलर ने जायला काय होतं!". आणि मग ऑफिस मध्ये जाऊन "मी नवीन स्टार्टअप ट्रॅफिक चा प्रोब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काढला पाहिजे!" अशा विचारावर फिल्टर कॉफी घेत उगाच आपल्या सहकाऱ्यांसोबत अर्धा तास काढायचा!. अर्ध्या तासानंतर आमची गाडी पुढची प्रोजेक्ट डिलिव्हरी वेळेवर होते? की ट्रॅफिक मध्ये अडकली आहे? आणि तिला हिरवा कंदील मिळवून देण्यास काय करता येईल हा प्रश्न सोडवण्यात कितीतरी सिग्नलवर अडकून बसते. दुसऱ्या दिवशी ये रे माझ्या मागल्या. तर असं दोन्ही बाजूने ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर त्रागा करता आला म्हणजे तुम्ही बँगलोरकर होण्याची पाहिली पायरी यशस्वी झालात असं म्हणायचं!
आज अयांशसाठी सायकल घ्यायला म्हणून दुकानात शिरलो आणि माझ्यासाठी पण घेऊन आलो. भर उन्हाच बाहेर जाऊन आलो म्हणून डोक थोडं सुन्न झालं होतं. पण अचानक सायकल वरून पु.लं. च्या "पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर" मधला खालील भाग आठवला आणि उन्हाने आलेला सर्व क्षीण क्षणात उतरला - "पुणेकर होण्यासाठी सायकल चालवणं, ही क्रिया एक खास कला म्हणूनच शिकायला हवी. सायकलवर बसता येणं, म्हणजे पुण्यात सायकल चालवता येणं, हे नाही. "चालवणे" इथे हत्त्यार चालवणे, किंवा चळवळ चालवणे, अशा अर्थाने वापरलं पाहिजे. सायकलचा मुख्य उपयोग, वाहन म्हणून न करता वाहत्या रस्त्यात मध्यभगी कोंडाळे करून गप्पा मारताना 'टेकायची सोय' म्हणून करायला हवी. यातूनच पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचे शिक्षण मिळते! त्याचप्रमाणे, पाहुणे नामक गनीम येतात, त्यांना वाड्यामध्ये सहजासहजी एकदम प्रवेश मिळू नये, यासाठी मुख्य प्रवेशद्वारात सायकलींची बॅरीकेड रचता यायला हवी. त्या ढिगाऱ्यातून नेमकी आपलीच सायकल बाहेर काढता येयला हवी. सायकल, हे एकट्याने बसून जायचे वाहन आहे, हे विसरायला हवे. किमान तिघांच्या संख्येनी, रस्त्याच्या मधून गप्पा मारत मारत जाता आले पाहिजे. नजर समोर न ठेवता, फुटपथावरील चालत्या बोलत्या आणि इतर प्रेक्षणीय स्थळांच्या तिथे येणे जाणे चालू असतं तिथे असंल पाहिजे. सायकल ला घंटी, दिवा, ब्रेक हे वगैरे असणं, हे म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे."
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Comments