२०१० मध्ये इंजिनिअर झालो तेंव्हा हातात पदवी आली पण नोकरी नव्हती. हातात पदवी यायच्या आधीच या परिस्थितीची कल्पना होती त्यामुळे आयुष्यात पुढे नक्की काय करायचं आहे याचा आराखडा बांधायला सुरुवात केली होती आणि त्या दिशेने पावले पण उचलली होती.
आज लोक अँड्रॉइड फोन सर्रास वापरतात पण त्यावेळी अँड्रॉइड हे नाव सॉफ्टवेअर इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा तितकसं परिचयाचं नव्हत. इतर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणारे स्वतः शिकण्याचा प्रयत्न करत होते. अँड्रॉइडच भवितव्य किती उज्ज्वल आहे याची खात्री त्यावेळी कोणी नक्की देऊ शकलं असतं की नाही सांगता येणं कठीण आहे. अशातही इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनिअरिंग करूनही या क्षेत्रात उडी मारली आणि अँड्रॉइडमध्ये ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटच प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली त्याला काल परवाच ११ वर्ष उलटली.
प्रशिक्षण पूर्ण व्हायच्या आतच नोव्हेंबर २०१० मध्ये प्रभादेवी, मुंबई येथील एका कंपनीचा इंटरव्ह्यू साठी कॉल आला. इंटरव्ह्यूची प्रोसेस पटापट आटोपली आणि दुसऱ्या दिवशीच लगेच रुजू होण्यास सांगण्यात आले. महिना १०,०००/- पगारावर नोकरी सुरू करायची होती पण "अनुभव नाही म्हणून नोकरी नाही आणि नोकरी नाही म्हणून अनुभव नाही" या चक्रव्यूहातून सुटका होणार होती याचा अगणित आनंद होता!
हातात ऑफर लेटर घेऊन बाहेर पडलो आणि तडक सिद्धिविनाकाच मंदिर गाठलं. तो दिवस होता २३ नोव्हेंबर, २०१०, मंगळवार. ऑफिस पासून चालत ५ मिनिटांच्या अंतरावरच असल्याने जेंव्हा त्याच्या समोर उभा राहिलो तेंव्हा रोज ऑफिसला यायच्या आधी मंदिरात येऊन दर्शन घेऊन जायचा संकल्प सोडला. अंबरनाथहून सकाळी ६:३० ची फास्ट ट्रेन पकडून दादरला ७:४५ पर्यंत पोहचायचं. नंतर बस मिळाली तर मिळाली नाहीतर चालत सरळ ८:१५ पर्यंत सिद्धिविनायक मंदिर गाठायच. दर्शन घ्यायचं आणि ८:४५ पर्यंत ऑफिस. हा दिनक्रम पाळत राहिलो. इंस्टाग्राम नावाचा प्रकार पण त्यावेळी नुकताच आला होता. ऑफीसला येता जाता बरेच वायफळ फोटो काढले पण इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला पहिला फोटो आहे तो त्याचाच! नंतर नोकरी बदलली आणि त्याची आणि माझी ताटातूट झाली. आता तर अंबरनाथ आणि पर्यायाने मुंबईपण सोडली. आता मुंबईला येणं झालं आणि त्या बाजूला जाणं होणार असेल तर त्याला आवर्जून भेट देतो. पहिली नोकरी मिळाली तो दिवस डोळ्यात तरळतो.
मध्यंतरी कधीतरी त्याच्याशी फेसबूक वरून परत कनेक्ट झालो. त्याचे फोटो येत राहतात आणि मी लाईक करत राहतो. आणि म्हणूनच बहुतेक त्याची जेंव्हा सायंकाळी ७ ची आरती सुरु होते तेंव्हा तो "मी live आलोय रे!" म्हणून आजकाल नोटिफिकेशन पाठवतो. डोळे भरून दर्शन देतो. बंगलोर मधील आमच्या निवासस्थानी बसल्या बसल्या त्याची आरती करताना मी फक्त शरीराने इथे असतो. मन प्रभादेवीच्या त्याच्या मंदिरात पोहचेलेल असतं. तू आयुष्य किती सुंदर आणि सुकर केलंस म्हणून पुनः पुन्हा कृतकृत्य होतो.
आज मी नोकरीला रुजू झाल्याच्या बरोब्बर ११ वर्षांनी अयांशचा शाळेत पहिला दिवस आहे !
Comments