गेल्या २ आठवड्यांत बँगलोर - मुंबई - बँगलोर मध्ये ३००० किलोमीटर हून अधिक प्रवास घडला. या प्रवासात स्वामी फक्त हात धरुन आम्हाला फिरवत नव्हते, तर आमचं प्रारब्ध घडवत होते! जोपर्यंत या स्थानांबद्दल काही माहिती नव्हती तोपर्यंत स्वामींनी तिथे पाऊलही ठेऊ दिले नाही आणि गेल्या काही महिन्यांत वाचनात आलेल्या या सर्व तीर्थक्षेत्री आम्हाला नतमस्तक व्हायची संधी दिली. या तीर्थक्षेत्रात आणि देवस्थानांत खालील स्थानांचा समावेश आहे.
बँगलोर ते अंबरनाथ -
कलावती आई समाधी मठ, बेळगाव
त्रिपुरसुंदरी मठ, बेळगाव
चिले महाराज समाधी, कासव मंदिर, पैजारवाडी
स्वयंभू पादुका मठ, दाभोळे
श्री शंकर महाराज समाधी मठ, धनकवडी, पुणे
एकवीरा आई, कार्ला
स्वामी भवन, लोणावळा
वाघजाई देवी, खंडाळा
बापूजी बुवा, सावरसई - पेण
अंबरनाथ मधील वास्तव्याच्या काळात -
श्री स्वामी समर्थ मठ, अंबरनाथ
हेरंब मंदिर, अंबरनाथ
श्री दत्त मंदिर, अंबरनाथ
श्री सिद्धिविनायक मंदिर, टिटवाळा
श्री शंकर महाराज मंदिर, टिटवाळा
श्री स्वामी समर्थ मठ, टिटवाळा
श्री रितेश वेदपाठक यांच्याकडील स्वामी पादुका, स्वामी, शंकर महाराजांचे आणि देवीचे दर्शन, वसई
अंबरनाथ ते बँगलोर -
जुने दत्त मंदिर, सोलापूर
श्री शुभराय महाराज मठ, सोलापूर
श्री सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर
वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट
गुरु मंदिर - बाळप्पा मठ, अक्कलकोट
मुरलीधर मंदिर, अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट
श्री क्षेत्र गाणगापूर
आमच्या अंबरनाथ मधील वास्तव्याच्या काळात आम्ही यावेळी रितेश दादांकडील पादुकांचे दर्शन घेण्यास आवर्जून जायचे ठरवले होते. आम्ही ज्या दिवशी जायचे ठरवले त्या दिवशी काही जाणे झालेच नाही. आम्ही ठरवून तसही काही होत नाही. सगळं काही स्वामीच ठरवतात. त्या नंतर मधले काही दिवस जाऊ शकलो नाही. त्यानंतरचा दिवस जो ठरला तो ११/११/२०२१, गुरुवार, कार्तिक शु. दुर्गाष्टमी, शंकर महाराज प्रकट दिन. ठरल्याप्रमाणे ३ वाजता रितेश दादांकडे पोहचायचे होते. वसई तसे लांब असल्यामुळे आम्ही ११ वाजता निघालो. स्वामींसाठी धूप अगरबत्ती घेतली. पुढे प्रसाद म्हणून काय घ्यावं पाहत होतो. केशर पेढे दिसले. स्वामींना आवडतील का? असा विचार चालूच होता. केशर पेढे आणि चितळेंची बाकरवडी घेऊन रितेश दादांकडे पोहचलो. आत शिरल्या शिरल्या समोर स्वामींची मोठ्ठी फ्रेम पाहिली आणि तिथेच हात जोडले. तोपर्यंत आकांक्षा रितेश दादांच्या पाया पडणार इतक्यात रितेश दादा टुणकन उडी मारून बाजूला पळालेच आणि म्हणाले - "माझ्या नाही! ते आत बसले आहेत ना! त्यांच्या पडा". पाया पडताना आमचा उद्देश एवढाच होता की आपण घरात कोण्याही थोरा मोठ्यांच्या पाया पडतो ना तसाच. पण त्यांच्या तेवढ्या कृतीतून त्यांनी आपण कोणीही नसतो, जे काही मोठेपण आहे ते स्वामींचे आहे हे दाखवून दिलं. आम्ही आत स्वामींना, शंकर महाराजांना आणि माईला दंडवत घातला. स्वामींसमोर प्रसाद ठेवला. रितेश दादांनी आमच्या डोळ्यादेखत तो स्वामींच्या मुखाशी लावला आणि स्वामींनी तो ग्रहण केला! हो! स्वामींनी प्रसाद ग्रहण केला!!! त्या केशर पेढ्याला पद्धतशीर दातांनी प्रसाद ग्रहण केल्याच्या खुणा होत्या. मला काहीच कळत नव्हतं. मी अक्षरशः वेड्यासारखा रितेश दादा आणि आकांक्षाकडे तोंडावर हात ठेवून बघत राहिलो. रितेश दादांनी प्रसाद म्हणण्या एवढाच प्रसाद स्वामींसमोर ठेवला आणि बाकी आम्हाला परत दिला आणि म्हणाले- "आमच्याकडे हीच पद्धत आहे. सगळं परत द्यायचं! आमची झोळी रिकामीच!". त्यांचं वाखडण्याजोग वैराग्य मनाला भिडलं!
त्यांनतर स्वामींसमोर "शांत" बसलो. हो "शांत" मुद्दाम तसं लिहिलं. कारण माझ्या आयुष्यात हा पहिलाच अनुभव होता जेंव्हा २ मिनिट शांत बसलो होतो आणि मनात कोणताच विचार नव्हता. अशी अवस्था मी आजतागायत कधीही अनुभवलेली नाही. त्यांनतर रितेश दादांशी छान गप्पा झाल्या. प्रश्न न विचारताच त्यांच्याशी बोलता बोलता काही कोडी सुटली. कदाचित स्वामींनी त्यासाठीच आम्हाला पाठवलं असावं. रितेश दादा म्हणतात तसं - "बाबा के खेल बाबाही जाने!"
निघता निघता मनात होतं "दत्त अनुभूती" आणि अनुभूती "दत्त अनुभूतीची" लिहिणारे आनंद कामत दादा पण भेटावे आणि आम्ही निघणार इतक्यात त्यांची पण भेट झाली.
पुढे परतीच्या प्रवासासाठी शनिवारी पहाटे ५ वाजता अंबरनाथहून घर सोडायचं ठरलं होतं. गेल्या खेपेस अक्कलकोट मध्ये समाधी मंदिराजवळ जिथे मुक्काम होता, यावेळी सुद्धा तिथेच मुक्काम करू असं "आम्ही" मनातच ठरवलं होत. पण नेहमीप्रमाणे स्वामींनी मात्र काही वेगळंच ठरवलं होतं.
कोणत्याही ट्रॅव्हल पोर्टलवर नसलेल्या या हॉटेलच आरक्षण त्यांना फोन करूनच करावं लागतं. गेल्या वेळी सहज आरक्षण मिळालेल्या या ठिकाणी आम्ही शुक्रवारी सायंकाळी फोन केला असता एकही रूम शिल्लक नसल्याचं कानावर आलं. आम्ही इतर जी काही ठिकाणं इंटरनेटच्या माध्यमातून सापडली तिथे सगळीकडे फोन लावण्यास सुरुवात केली. सगळीकडे हीच परिस्थिती. स्वामी काहीतरी मार्ग सुचवा म्हणून मनातून धावा सुरू झाला. इतक्यात एक शेवटचा पर्याय म्हणून एका लॉजचा नंबर मिळाला. त्यांनी एकच रूम उपलब्ध असल्याची खात्री दिली. आम्ही नक्की येत आहोत असं कळवून निःश्वास सोडला.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ५ वाजता घर सोडले आणि ८ वाजेपर्यंत आम्ही पुणे सोलापूर मार्गाला लागलो. मिसळ खायची राहिलेली इच्छा वाटेत महाराजांनी पूर्ण करून घेतली. झणझणीत मिसळीवर ताव मारून आम्ही १२ च्या सुमारास सोलापुरात जुन्या दत्त मंदिराच्या दारात उभे होतो. दत्त महाराजांचे दर्शन घेतले. त्यांना दंडवत घातला आणि प्रार्थना केली. बाहेर पडलो तेंव्हा दारा बाजूला लिहिलेली पाटी वाचली - "मंदिर १२ ते ५ दरम्यान बंद राहील." १२ तर वाजून गेले होते.
दत्त मंदिराच्या बाजूलाच श्री शुभराय महाराज मठ आहे. स्वामी आणि शंकर महाराज दोघांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. शंकर महाराजांचे तर इथे वास्तव्य होते आणि कित्येक लीला त्यांनी इथे केल्या आहेत. शंकर महाराज जसे प्रकट झाले होते त्याची खूण आणि महाराजांची इच्छा म्हणून असावं म्हणा इथे तान्ह्या बाळाला लोक सोडून जातात आणि या बाळांचे संगोपन पाखर संकुल नावाची संस्था श्रीमती शुभांगी बुवा यांच्या देखरेखी खाली करते.
आम्ही तिथून बाहेर पडलो तेंव्हा आता दत्त मंदिराची दारं बंद झाल्याचे लक्षात आले. आम्ही तिथून ताबडतोब सिद्धेश्वर मंदिराकडे कूच केले. मनात कित्येक विचारांनी गर्दी केली होती आणि आभाळात नभांनी. पण त्या नभांना पाझर फुटला होता. आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या दारात पोहचलो आणि पाऊस धो धो कोसळू लागला. सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूचा तलाव, त्यातील पाण्यावर तरंगणारी कमळं यामुळे मंदिर आणि त्याचा परिसर प्रसन्न दिसत होता. हा तोच तलाव आहे जो शुष्क पडला तेंव्हा स्वामींनी तिथे लघुशंका केली आणि नंतर तिथे पडलेल्या पावसाने तो भरून गेला होता. वर दाटून आलेले मेघ मल्हारावर करत असलेला तो अभिषेक आम्ही अनुभवत होतो. एकीकडे मनातल्या मळभांना मोकळं होऊ द्यायचा प्रयत्न करत होतो. सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन तिथेच बाहेर बसलो. मग परत एकदा मंदिरात प्रवेश केला. आसपास फार कोणीच नव्हतं. बाजूला फोटो काढू नका फलक दिसत होता. त्याच्या समोर बसलेल्या गुरुजींना तरीपण एकदा परवानगी मागितली, फोटो काढू का? ते एक क्षण थांबले आणि म्हणाले आत या ना. बाहेरून का काढता? ते असं बोलतील हे आजिबात अपेक्षित नव्हतं. मी फाटक उघडुन आत शिरलो. आधी नंदी आणि मग सिद्धेश्वर महादेवा समोर नतमस्तक झालो. फोटो घेतले आणि गुरुजींना धन्यवाद देऊन बाहेर पडलो. आता पाऊस थांबला होता.
अक्कलकोटचा रस्ता धरला. वाटेत परत पावसाने न्हाऊ घातलं. कसली शुद्धी करून घेत होता त्याचं त्यालाच माहीत. अक्कलकोट मध्ये शिरलो तेंव्हा लक्षात आलं की या वेळी सगळं चित्र वेगळंच आहे. जणू जत्राच भरली होती. लोकांचा लोंढाच्या लोंढा स्वामींच्या चरणी दर्शनासाठी वटवृक्ष मंदिरापाशी चालला होता. आम्हाला मिळालेली मुक्कामाची व्यवस्था ही वटवृक्ष मंदिरच्या पश्चिम द्वाराच्या अगदी समोरच होती. १२ ते १५ खोल्या असलेल्या त्या श्रीराज लॉजला फाटकाच्या आत एकच गाडी बसू शकेल अशी पार्किंगची व्यवस्था होती, जी मोकळी होती. बाहेरचा रस्ता तसा चिंचोळा होता त्यामुळे बाहेर गाडी लावणं तसं शक्य नव्हतं. आम्ही सामान उतरवलं. ताजेतवाने होऊन दर्शन घेण्यासाठी वटवृक्ष मंदिराकडे निघालो. तिथे उसळलेली गर्दी पाहून आम्हाला काही सुचेनासे झाले. अशा गर्दीत कसे दर्शन घ्यायचे म्हणून मन अगदी हिरमुसले होते. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि बाळप्पा मठ किंवा गुरू मंदिर नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्वामींच्या मठाकडे पावलं वळली. गूगल मॅप हा रस्ता सरळ सरळ दाखवत नाही. आजू बाजूला चौकशी करत आम्ही मठापाशी पोहचलो.
गुरु मंदिर म्हणजे स्वामींची गुरू परंपरा पुढे चालत आलेला मठ. शांत, प्रसन्न ! स्वामींच्या पादुका, बाळप्पा महाराजांची समाधी, त्यांचे शिष्य गंगाधर महाराजांची समाधी आणि गंगाधर महाराजांचे शिष्य अक्कलकोटचे गजानन महाराजांची समाधी आणि या गुरुपरंपरेचा पदस्पर्श झालेला, पवित्र ऊर्जेने उसळणारा मठ. इथे २०१७ मध्ये डागडुजी करताना स्वामींच्या पावलांचे ठसे उमटले होते. ते फर्शीवर अजूनही दिसतात. त्यामुळे फरश्या बदलण्याचं काम रद्द करावं लागलं होतं. तसेच इथे स्वामी ज्या पलंगावर आराम करत तो पलंग सुद्धा पहावयास मिळतो. मठाच्या परिसरात श्रीरामांचे मंदिर आणि गोशाळा आहे. तिथे मठ सांभाळणाऱ्या काही जणांशी गप्पा झाल्या. त्यांनी अचानक अनपेक्षित प्रश्न विचारला. "तुम्ही तुमच्या मुलाचा येता वाढदिवस इथे करू शकता का? स्वामींची इच्छा. आमची नाही." मी पुढच्या क्षणालाच सहमती दर्शविली. त्याचबरोबर ७ वाजताच्या आरतीला आणि त्यानंतर ८ वाजता महाप्रसादासाठी आम्ही तिथेच थांबाव असा आग्रह धरला. खरंतर तर त्यात आग्रह धरण्यासारख काहीच नव्हत. उलट ते आमचंच भाग्य होतं की हा स्वामीकृपेचा आमच्यावर वर्षाव होत होता. आमचं दुपारचं जेवण झालं नव्हतं. गर्दीमुळे बाहेर कुठेही जेवणासाठीसुद्धा गर्दी उसळणार होती आणि इथे स्वामी आम्हाला महाप्रसादाच जेवण आग्रहाने जेवू घालत होते. आता तिथे मिळणाऱ्या प्रत्येक घासाच महत्त्व कोणत्याही पंचपक्वांनाहून अधिक होतं.
त्यानंतर पुढे जे झालं त्यामुळे मला तर कसतरीच झालं. तिथल्या गजानन महाराजांच्या समाधीच्या खोलीत आम्हाला शाल, श्रीफळ, गजानन महाराजांची फोटो फ्रेम आणि पुस्तक देण्यात आले. ते सर्व तसं का चालू होतं आम्हाला माहिती नाही.
मधल्या वेळेत परत पाऊस कोसळू लागला. स्वामींनी तिथेच बसवून ठेवलं. आग्रहाचा चहा झाला. सायंकाळी ५:४५ वाजता सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्र म्हणजे काय? आणि ते कसं करतात? हे सुद्धा अनुभवलं. एकीकडे आम्ही पाऊस थांबायची वाट पाहत होतो. कारण ७ ची आरती व्हायच्या आधी तेथील मुरलीधराच्या मंदिरात जाऊन यायचं होतं. ६ वाजता पाऊस थांबला तसं आम्ही दर्शन घेऊन परत गुरुमांदिरात दाखल झालो. आमची मुक्कामाची व्यवस्था, वटवृक्ष मंदिर, मुरलीधर मंदिर, गुरुमंदिर ही सगळी ठिकाणं २००-३०० मीटरच्या परिसरात वसलेली. परत आल्यावर मठात एका खांबाजवळ जागा पकडून फतकल मारून बसलो. अयांश माझ्या मांडीवर बसून झोपी गेला. आकांक्षा ध्यानात गेली आणि माझं नामस्मरण चालूच होतं. आरती सुरु झाली तशी आमची आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली!
आरती आटोपली आणि आम्ही महाप्रसाद ग्रहण करायला पंगतीत बसलो. वाढपी वाढत होते तोपर्यंत स्वामींच्या नामाचा गजर झाला. सामूहिक नामस्मरणात आम्ही नाहून निघालो. ६०-७० स्वामीभक्त त्या ठिकाणी जेंव्हा स्वामींच्या नावाचा गजर करत होते तेंव्हा जे काही जाणवत होतं ते शब्दातीत आहे!
महाप्रसाद ग्रहण करून आम्ही निघत तेंव्हा आम्ही स्वामींच्या समाधी मठात केदार गुरुजींना संपर्क केला. आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता काकड आरती घेऊन लगेच गाणगापूर मार्गे बँगलोरकडे कूच करणार आहोत म्हणून कळवले. त्यांना तसे कळवण्यामागे कारण असे होते की आकांक्षाच्या मामा-मामीने आम्हाला एक अत्यंत मौल्यवान भेट दिली होती. ती म्हणजे स्वामींची संगमरवरी मूर्ती! ती मूर्ती पण चमत्कारिकरित्याच वेळेवर पोहचली होती. कारण आम्ही भाऊबीजेच्या दिवशी मामा-मामीकडे पोहचलो त्याच्या आदल्या दिवशी पर्यंत ती मूर्ती मुंबईत दाखल होणं सुद्धा कठीण आहे म्हणून कळविण्यात आलं होतं. पण आम्ही ज्या दिवशी दुपारी मामा-मामीकडे पोहचलो त्या दिवशी त्यांच्या घरी मूर्ती पोहचली होती. मामा-मामीने आम्हाला तशी पूर्वकल्पना देऊन ठेवली होती पण ती मूर्ती स्वीकारतानाच्या सुवर्ण क्षणाची इतर कोणत्याही गोष्ट स्वीकारताना होणाऱ्या क्षणाशी तुलना करता येणार नाही. ही मूर्ती आम्हाला स्वामींच्या समाधीस स्पर्श करून मग घरी जाऊन स्थापन करायची इच्छा होती आणि त्यासाठी आकांक्षा ही गोष्ट केदार गुरुजींना सांगत होती, तेंव्हा त्यांनी आम्हाला काही द्यायचे आहे म्हणून सांगितले आणि ती गोष्ट स्वामींची पूजा करूनच देऊ म्हणून सांगितले. काही तर्क वितर्क न लावता आम्ही आमच्या मुकामाच्या ठिकाणी जाऊन शांत झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी पहाटे हॉटेल सोडून आम्ही पहाटे ४:४५ वाजता स्वामींच्या समाधी मठात हजर होतो. झाडलोट सुरू झाली. आम्ही पण केरसुणी घेऊन स्वामींच्या सेवेस हातभार लावला. इतक्यात केदार गुरुजींनी आवाज दिला. चोळप्पा महाराजांच्या वाड्यात येऊन मला तिथे कपडे बदलून सोवळे नेसण्यास सांगितले. वाड्यात शिरताच शेखर सानेंनी २००६ मध्ये साकारलेले चोळप्पा महाराज आणि स्वामींचे चित्र पाहून मन हरपून जाते. स्वामींच्या डोळ्यातील करूणा चोळप्पा महाराजांसाठी ओसंडून वाहत असल्याचे दिसून येते. त्या चित्रातले भाव स्वामींनी शेखर सानेंकडून काय शब्दातीत अप्रतिम रेखाटून घेतले आहेत. तिथे चहा झाला. स्वामींचा मठ कुठलाही असो तिथे मिळणारा चहा म्हणजे अमृत!
तिथल्या स्वयंभू गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत मठात स्वामींचा अभिषेक करण्यास येऊन बसलो. केदार गुरुजींना आम्ही सोबत आणलेली स्वामींची मूर्ती दाखवली. त्यांनी ती स्वामींच्या समाधीवर ठेवून घेतली. आता पुढे जे घडलं त्यानंतर आम्ही रडून स्वामी चरणी कोसळायचेच बाकी होतो! अभिषेकासाठी आम्ही बसलो. गुरुजींनी समोर चांदीच्या ताटात स्वामींच्या खडावा आणि त्यावर स्वामींची मूर्ती ठेवली. त्यासोबत त्यांनी अजून २ खडावा ताटात ठेवल्या आणि म्हणाले - "स्वामींनी तुम्हाला द्यायला सांगितल्या आहेत!" आम्ही निःशब्द! केदार गुरुजींना आम्ही येणार आहोत वगैरे हे आदल्या रात्रीच सांगितलं होतं पण स्वामींनी सगळी पूर्वतयारी करून ठेवली होती. आता दुसरा धक्का! गुरुजींनी एक डबी काढली. त्यात दोन रुद्राक्ष होते. आम्हाला म्हणाले की - "हे रुद्राक्ष गिरनारी दत्तप्रभुंच्या पादुकांना स्पर्श करून आणले असून तुम्हाला देण्यास सांगितले आहे!"
मी मागच्या लेखात म्हणालो तसं, भगवंतावर आपण जीव ओवाळून टाकावा असे प्रेम करावे आणि त्याने त्या प्रेमाखातर त्याहून कित्येक पटींनी प्रेम त्याने आपल्यावर करावे, याहून दुसरे कोणतेही शाश्वत प्रेम या ब्रम्हांडात अस्तित्वातच नाही. याच प्रेमाखातर तो अवतार घेतो आणि खूप काही शिकवून जातो. देह समाधिस्त करतो पण "हम गया नही जिंदा है!" ची प्रचिती देत राहतो!
U r blessed.. felt very good reading your experience.. got this link through SwamiSamartha whatsapp group. After going through some real bad news in our family, got connected to Shreepad Shreevallabh Chakri Parayan group through 1 of my friend and later Swami Samartha group. After completing parayan all adhyays , myself and my husband got a chance to visit all the mentioned places in the book, thanks to an advt by a sadguru travels. So yes I BELIEVE that only by Sadgurus blessings we completed our darshan of Akkalkot, Ghangapur, Kuravpur, Mantralaya and Pithapur. + various other temples and places mentioned in the book.
I too am praying and looking forward to meet Ritesh dada and Anand dada and visit…