खरं तर आज अमावस्या आणि खग्रास सूर्यग्रहण. माझा कालचा "देव देव्हाऱ्यात नाही" हा लेख वाचून एका जवळच्या शुभचिंतक मित्राने मला हे शुभकार्य सोमवारी करण्याचे सूचित केले. पण अंतिम निर्णय घेणारे स्वामीच! आपण कोण आहोत काही ठरवणारे? त्यांनी वेळ काळ सगळं काही निश्चित केलं होतं. त्या श्रीकृष्णाच्या हातात आमच्या आयुष्याचं सारथ्य दिलंय म्हंटल्यावर सगळ्या लगाम ओढणारा तो सूत्रधार बरोबर सगळी चक्र वेळच्या वेळी फिरवतो!
गेल्या शनिवारी देव्हारा बनविण्यास दिला तेंव्हा त्या फर्निचरवाल्याने किमान १०-१२ दिवस तरी लागतील म्हणून कळवलं होतं. त्यांनी शक्य तितकं लवकर करावं म्हणून विनंती केली. त्याला कारणही तसच होतं. आकांक्षाची मासिक पाळीची तारीख पण जवळ येऊन ठेपली होती. आपण कोणी याबाबत कितीही प्रगत झाल्याचं म्हंटल तरी एकंदर त्यावेळी होणारा त्रास बघता आकांक्षाला स्वतःलाच आपण शुचिर्भूत असल्याची जाणीव होत नाही. आणि तिच्याशिवाय घरात स्वामींचे शुभकार्य होऊच शकत नाही त्यामुळे मग पुढचे काही दिवस थांबणं आलं. त्यात घरात देव्हारा आणून स्वामींना त्यात विराजमान होण्यास अडवणारे आपण कोण? वर वर बघता असा सगळाच गुंता!
त्यात आम्हाला या नवीन देव्हाऱ्याची सोय ज्या खोलीत करायची होती तिथं काही डागडुजीची कामं कोव्हिड मुळे कधीपासून खोळंबली होती. दोन तीन ठिकाणी विचारून त्यांच्या मागे लागूनही ती कामं काही केल्या होता होत नव्हती. शेवटी आता व्हायची तेंव्हाच होतील म्हणून मी पण कंटाळून त्याचा पाठपुरावा करणं सोडून दिलं होतं.
काल दुपारची वेळ. मी ऑफिस मधली काम सांभाळण्यात व्यस्त होतो. एका मागोमाग एक मीटिंग होत्या. त्यातली कोणतीही मीटिंग पुढे मागे ढकलता येण्याची फारशी काही शक्यता नव्हती. इतक्यात एवढे दिवस ज्या कारागिरांच्या मागे मी हात धुवून मागे लागलो होतो त्याचा फोन आला. "येऊ का आता?". काही झालं तरी दुसऱ्या दिवशी महाराज देव्हाऱ्यात विराजमान होणार आहेत याची मनात कुठेतरी खात्री होती. फक्त आमची परीक्षा घेणं चालू होतं. मी त्याला ये म्हणून कळवलं. आकांक्षा आणि अयांश घरी नव्हते त्यामुळे ते कारागीर आल्यावर मलाच काय ते बघावं लागणार होतं. तरी त्या कारागिरांना या म्हणून मी कळवून मोकळा झालो. त्याचा फोन ठेवतो न ठेवतो तोच फर्निचर वाल्याने फोन केला. "येऊ का आता?". त्याला पण "ये बाबा! तू पण ये! आत्ताचं ये!" सांगून मोकळा झालो. दुसरीकडे मीटिंग सुरू झाली. कानाला हेडफोन. हातात फोनवर मीटिंग ट्रान्स्फर करून. एक कान मीटिंग मध्ये आणि एक कान त्या करागिरांकडे करून काम करून घेतली. त्याचं काम संपवून तो बाहेर पडला आणि फर्निचरवाला देव्हारा घेऊन हजर! मधल्या वेळात आकांक्षा पण आली होती. म्हणता म्हणता रखडलेली काम आटोपली आणि देव्हारा पण आला. त्या वेळेत ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष झालं होतं असही नाही. ते माझं नियत कर्म आहे आणि कर्म हे पार पाडावचं लागतं. नाहीतर श्रीकृष्णाला काय तोंड दाखवू मी ? कर्म करताना चुकू नकोस हे त्यांनी बजावलेल आहेच!
आता वर म्हणालो त्याप्रमाणे राहिला प्रश्न तो मासिक पाळीचा, अमावास्या आणि खग्रास सूर्यग्रहणाचा. पाळीची तारीख उलटली तरी अजून माईने ती येऊ दिली नव्हती. पण सोमवार पर्यंत यायची थांबेल याची खात्री कशी द्यावी? त्यामुळे उद्या नवीन देव्हाऱ्यात स्वामींना सर्व देवी देवतांसह विराजमान होण्याचे आवाहन करायचे ठरवून आम्ही झोपी गेलो.
पहाटे ३:३० च्या सुमारास मला जाग आली. भुकेने माझी चुळबुळ सुरु झाली. अशी अवेळी खरंतर कधी भूक लागतं नाही. आकांक्षा पण तेंव्हा रोजच्या सवयी प्रमाणे ध्यानासाठी उठली. मी पण तिथेच "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" म्हणत नामस्मरण करत बसलो. इतक्यात डोक्यात वेगळ्याच विचारांची चक्र फिरली. सूर्योदयापूर्वी पूजा आटोपून घ्यावी म्हणून संकेत मिळाले. सकाळी ६:४७ चा सूर्योदय होता. मी ताबडतोब उठलो. लादी वगैरे पुसून घर स्वच्छ करून मी स्वतः पण शुचिर्भूत झालो आणि माझ्या मागोमाग आकांक्षा पण. स्वामींसमोर हात जोडले. देवांना अभिषेक करणार म्हणून त्यांना ताम्हणात काढण्यास सुरुवात केली. नेहमी प्रमाणे त्यांची खूण म्हणून डोक्यावरचा दिवा फडफडला आणि मग आधीपेक्षा अजून लख्ख प्रकाशित झाला. आता सोहळ्याला सुरुवात होणार होती. आज ते सगळे फक्त ताम्हणात नव्हते. आज ते सगळे पाठीशी उभे राहून पूजा अर्चा करण्यात सहभागी होणार होते. अभिषेक करण्यास सुरुवात झाली. श्रीकृष्णाचे पाद प्रक्षालान करून सर्व देवी देवांचा अभिषेक पार पडला. नवीन देव्हाऱ्यात स्वस्तिक काढून त्यावर वस्त्र हंतरली गेली. जणू पायघड्या पडल्या. सर्वप्रथम स्वामी विराजमान झाले आणि त्या मागोमाग दत्तगुरु, सत्यनारायण, शिवलिंग, श्रीकृष्ण, गणपती बाप्पा, अंबाबाई, श्रीपाद प्रभू त्यांच्या पादुका समवेत, बाळकृष्ण, अन्नपूर्णा, कुलदेवी वाघजाई देवी, एकवीरा देवी, कुलदैवत बापूजी बुवा, श्री यंत्रासहित कुबेर. अष्टगंध, हळद, कुंकू लावून सगळे सुशोभित होऊन आपापल्या जागी विराजमान झाले. स्वामींच्या पादुकांचे अत्तरलेपन झाले. हीना अत्तराचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्यावर झेंडू आणि गुलाबाच्या फुलांची आरास झाली. दिवे प्रज्वलित झाले. अगरबत्ती लागली. इतक्यात अयांश उठून दुडूदुडू धावत आला. त्याला तयार केल्याशिवाय आरती करायची नाही असं स्वामींनी आधीच बजावलेलं आहे. त्यामुळे त्याला अगदी वेळेवर उठवून आमच्या समोर उभं केलं होतं. तो ही शुचिर्भूत होऊन आमच्या सोबत येऊन उभा राहिला. धनकवडीच्या मठातून आम्ही शंकर महाराजांची फोटो फ्रेम घेतली होती खर पण त्यांनी स्वतःच ती अंबरनाथच्या घरीच ठेवून घेतली. आम्ही आकांक्षा कडून घडवून घेतलेली शंकर महाराजांची फ्रेम देव्हाऱ्यावर लावली. आता सगळ कस परिपूर्ण दिसत होतं. घड्याळ पाहिलं, ६:४५ झाले होते.
जय देव.. जय देव... आरतीचे स्वर उमटले... आजची पूजा स्वामींच्या ईच्छेने अगदी अभूतपूर्व पार पडली. स्वामी आणि श्रीकृष्ण भिन्न नाहीत. ते परब्रम्ह स्वरूप आहेत. हे सूर्य, चंद्र तारे आणि अवघं ब्रम्हांड ज्यांनी गोटी म्हणून चिमटीत पकडलं आहे त्यांना या अमावस्या आणि खग्रास सूर्यग्रहणाच विशेष ते काय ?
श्री स्वामी समर्थ 🙏🏽
हरे कृष्ण 🙏🏽
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Kiti sundar lihilay...
Swaminchi krupa...
Agadi samor ghadtay asa watale...
🌷श्री स्वामी समर्थ🌷ॐ श्री एकविरा देव्यै नमः🌷 🙏🙏
Wow.. so divine. I could picturize every scene as it is.. U r blessed.