हा लेख, लेख म्हणून नक्की कुठून सुरू करावा हे नक्की होतं नव्हतं म्हणून ते नक्की होतं नाही याच विचारापासून सुरू करू म्हटलं. कारण प्रत्येक विचाराशी जोडलेला आधीचा विचार मला एका नवीन सुरुवातीपर्यंत घेऊन जाई आणि कुठेतरी विचारांचं वर्तुळ पूर्ण झाल्याच जाणवतं होतं. असं मी चकवा लागल्यासारखा परत त्याच विचारांतून फिरता फिरता एका क्षणाला आता लिहायला बसलो.
आम्ही आता ज्या ठिकाणी रहातो, तिथे बाहेरच्या रस्त्यालगत काही वर्षांपूर्वी एका मंदिराचे काम सुरू झाले. तसं तर ते मंदिर बांधायला एक वर्षाहून अधिक काळ लागायची आवश्यकता नव्हती पण काही कारणास्तव एकंदर त्याच काम खोळंबले असल्याचे दिसत होते. मंदिर संपूर्ण ग्रॅनाईट मध्ये बांधताना पाहून एक तर आर्थिक अडचणी येत असाव्यात किंवा ते ज्या जागी बांधले जात आहे, ते पाहून काही कायदेशीर अडचणी असाव्यात, असा माझा अंदाज होता. गेल्या काही महिन्यांपासून कामाने अचानक वेग धरला आणि गेल्या काही आठवड्यांत तर ते काम अगदी युद्धपातळीवर पूर्ण होत असल्याचे दिसले. रोज ऑफिसचा रस्ता हाच असल्यामुळे आणि २ महिन्यांपासून ऑफिस सुरू झाल्याने मला ते कदाचित जास्त जाणवत असावं.
मनात कुठेतरी वेगळा आनंद होता की - "वाह! घराजवळ अगदी छान मंदिर घडून येत आहे." त्यात कोणत्या देवतेची प्रतिष्ठापना होणार आता याची पण वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. इथे बँगलोर मध्ये देवी, कार्तिक स्वामी, वेंकटेश स्वामी, हनुमान, शिव शंकर यांची पुष्कळ मंदिर तशी दिसतात त्यामुळे यापैकीच एखादं असावं असा अंदाज होता. रामनवमी जवळ आली तशी मंदिराच्या आसपासचा परिसर आणि संपूर्ण रस्ताच भगव्या पताकांनी नटला. उत्सवाचं वातावरण तयार झालं. ते पाहून हे मंदिर कदाचित श्रीरामांचचं असावं असं वाटतं होतं पण अजूनही नक्की कळायला मार्ग नव्हता.
रामनवमी होऊन गेली. आता ऑफिसला जाताना मंदिराच्या बाहेर हार तुरे वाले, दिसू लागले, बाहेर गाड्यांच्या रांगा आणि चपलांचे ढीग दिसू लागले. माझी ॲक्टिवा मंदिराच्या दारापर्यंत पोहचताच आरतीचे सुर आणि घंटांचा नाद कानावर पडू लागला. मनातल्या मनात कृष्णाचं/ स्वामींचे/ रामाचे नाव घेऊन रोज पुढे जात राहिलो.
काल संध्याकाळी बसल्या बसल्या मनात विचार घोळत होते. आठवड्याभराने अशी उसंत मिळाली म्हणून मी सुद्धा दिग्मुढ अवस्थेत पोहचलो. गेल्या वर्षी या सुमारास आम्ही रत्नागिरी जवळ दाभोळे येथील स्वामींच्या मठात जाऊन आलो होतो आणि आल्याआल्याच कोविडशी झुंज देत होतो. क्षणाक्षणाला स्वामींच्या तारक मंत्राचा अनुभव घेत होतो. तेंव्हा मी फेसबुक आणि एकंदर सोशल मीडिया पासून तात्पुरती काही महिन्यांची रजा घेतली होती. आता तशी रजा घेतली नसली तरी एकंदर कामाचा व्याप बघता दिवसातून ५ ते ६ मिनिटां पलीकडे सोशल मीडिया किंवा अगदी व्हॉट्सॲपकडे वेळ देणं शक्य होत नाही आणि वेळ मिळालाच तरी उघडताच एवढ्या दिवसांत आलेल्या नोटिफिकेशनचा आकडा पाहून मी त्याला तसच परत बंद करून ठेऊन देतो.
तरी काल संध्याकाळी एका ग्रुप वर प्रभू श्रीरामांच्या अवतार समाप्ती बद्दल लेख वाचला. त्याच सारं मनात घोळू लागल. अवतार कार्य संपलं म्हणून काळ श्रीरामांना घ्यायला आला खरा पण "काळाग्नी काळरुद्राग्नी, देखता कापती भये" तशी अवस्था. हनुमानाला पाहून काळाचे सुद्धा अयोध्येत श्रीरामांचे प्राण घेऊन जाण्यासाठी यायचे धाडस होईना. शेवटी ब्रम्ह देवांनी ही गोष्ट जेंव्हा श्रीरामांच्या कानी घातली तेंव्हा युक्ती लढवून श्रीरामांना हनुमानास त्यांचे काम करण्यास पाठवावे लागले आणि हनुमान दूर जाताच त्यांनी अवतार समाप्ती पूर्णत्वास नेली. ते वाचताना, ते आठवून आणि हे लिहिताना कंठ दाटून येतो. कारण तेंव्हा त्या रघुनंदनाची आणि हनुमानाची एकमेकांना निरोप न घेताच ताटातूट झाली. मनात वाटतं राहील की किती प्रेम आणि भक्ती होती एकमेकांची आणि कसं वाटलं असेल त्यांना हा कठोर निर्णय घेताना? या सगळ्या विचारांत रात्र झाली. काल दुपारपासून चैत्र पौर्णिमा सुरू झाल्याचे मी जाणून होती. गेल्या वर्षी या वेळी पहाटे एक पक्षी त्याच्या मधुर आवाजाने आकांक्षाला उठवत असे आणि ती ज्या खोलीत कोविडमुळे क्वारंटाईन होती तिथे साधनेला बसत असे. या विचारांत माझी आवडती प्रभू श्रीरामांची काही भजन ऐकून आणि शेवटी श्रीकृष्णाची बासरी ऐकत मी झोपी गेलो.
शनिवारचा दिवस म्हणजे अयांश आणि मी बापलेक एकत्र घरी दंगा करतो आणि आकांक्षा तिच्या कामानिमित्त सकाळी तिच्या क्लिनिकला जाते. पण आज मला काही काम आटोपायची म्हणून मी १०-१०:३० च्या सुमारास बाहेर पडायचं ठरवलं. आज बाहेर पडतोच आहोत तर आपण आज "त्या" मंदिरात जाऊनच येऊ अस मनाशी ठरवून बाहेर पडलो. मंदिराजवळ पोहचताच त्याच्या भव्य दरवाजावर लिहिलेलं आणि पताकांमध्ये दडलेल नाव दिसलं - "भक्त अंजनेय स्वामी मंदिर". आत शिरताच मंदिराच्या पायऱ्या चढून आत जाणार तोच वर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्या पायाशी बसलेल्या हनुमानाची मूर्ती त्या प्रवेशावर लावलेली दिसली. आत जाताच समोर हनुमानाची मूर्ती स्थापन केलेली दिसली. "श्री राम जय राम जय जय राम" अखंड जप मुखातून सुरू झाला. तीर्थ घेतलं, प्रदक्षिणा झाली, समोर प्रसाद घेतला आणि मला मिळून झाल्यावर काही क्षणांत तो प्रसाद संपला. प्रसाद खाऊन परत मंदिरात जाऊन बसलो. एक कोपरा पकडला. अजूनही जप चालूच होता. तिथून उठून जायची ईच्छा होतं नव्हती. गर्दी असूनही एक वेगळी शांतता होती.
इतक्यात एक जण सोबत येऊन बसला. माझ्याहून तरुण असावा. जीन्स टीशर्ट, डोक्यावर टक्कल. त्याने फोन वर काहीतरी कन्नड भाषेत लिहिलेला मजकूर उघडला आणि तो पुटपुटू लागला. तो अगदीच माझ्या बाजूला बसला असल्याने त्याचे शब्द आता माझ्या कानापर्यंत पोहचत होते. ती होती संत तुलसीदास कृत हनुमान चालीसा! त्याच्या मजकुरातले शब्द भले कन्नड असतील पण उच्चार तेच, ओळखीचे! त्यावरून एक दुसरा विचार मनाला शिवून गेला - प्रार्थनेला आणि भगवंताच्या स्तुतीला भाषा असते का? तरी आज सकाळी एक महाशय "कर्णकर्कश्श" हनुमान चालीसा भोंग्यावर न लावता मराठी भाषेतील हनुमानाचे सुमधुर काव्य लावावे यावर काहीतरी त्यांच्या फेसबुकच्या भिंतीवर खरडून मोकळे झाले होते. त्यावर आम्ही मराठी नाही म्हणून ती ऐकली सुद्धा नाही कधी असे त्या पोस्ट चे समर्थन करणारे पण पाहिले. "बुद्धीदारिद्र्य" हा शब्द स्वामींची मालिका पाहताना पहिल्यांदाच कानावर पडला होता आज तो अनुभवला!
असो! त्याच हनुमान चालीसा ची सुरुवात खालील या श्र्लोकापासून होते कारण हनुमान फक्त शारीरिक नाही बुद्धीचे बळ देणारे सुद्धा दैवत आहे.
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार। बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस विकार॥
अर्थ :
हे पवनकुमार मी आपले स्मरण करीत आहे. माझे शरीर आणि बुध्दी दोन्हीही अशक्त आहे. कृपा करून मला बळ, बुध्दी आणि ज्ञान देऊन माझे सर्व दुःख, दोष, क्लेश यांचा नाश करा.
"सर्वे जना: सुखीनो भवंन्तु।" असं म्हणून हेच मी आज आपल्या सगळ्यांसाठी मागू ईच्छितो.
श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏽
Commentaires